आज गुड फ्रायडे त्यानिमित्त ... कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.' (बायबल जुना करार).
येशूचा प्रमुख शिष्य पेत्र (पिटर) याने येशूच्या मृत्यूबद्दल खुलासा करताना बायबलच्या जुन्या करारातील वरील वचनाचा आधार घेतला. येशूला वधस्तंभावर मरणे हे क्रमप्राप्त का होते? याचा खुलासा त्याने केला. तो म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्याद्वारे देवाने जी महाकृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली त्यावरून देवाने तुमच्याकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता. याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले. कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहाणे अशक्य होते. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्यानी हे निश्चपूर्वक समजून घ्यावे की, येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभू ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
पेत्राच्या वरील भाषणावरून असे सिद्ध होते की, येशूला वधस्तंभावर खिळण्यात यावे, असा देवाचा ठाम संकल्प होता. म्हणून बायबलच्या जुन्या करारात यासंबंधी अनेक भविष्ये लिहून ठेवली आहेत. या भविण्यांची पूर्तता नव्या करारात झाल्याचे दिसून येते. त्यानुसार येशूचा जन्म, मृत्यू व पुनरुत्थान हे सर्व पूर्वनियोजित होते. पेत्र पुढे म्हणतो, तुम्ही बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही कारण त्याच्याद्वारे आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. देव पक्षपाती नाही, हे मला ठाऊक आहे. तर प्रत्येक मराष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. कारण असा शास्त्रलेख आहे. पाहा निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी येरूशलेममध्ये बसवतो. तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्यांना ती मूल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना बांधणार्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात. त्यासाठी ते नेलेही आहेत.
पेत्राच्या या सांगण्यानुसार पुष्कळ यहुद्यांचा येशूच्या बलिदानावर विश्वास नव्हता. त्यामुळे ते गोंधळात पडले व अडखळले. पेत्र पुढे म्हणतो, कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही. तर आम्ही त्याचा गौरव प्रत्यक्ष पाहाणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला. तेव्हा ऐर्श्वयुक्त गौरवाद्वारे अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. याचविषयी मी संतुष्ट आहे. त्याचबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्यांचे वचन (जुना करार) आमच्याजवळ आहे. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेले आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता. परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत आला आहात.
अशाप्रकारे येशूबद्दल व त्याच्या या बलिदानाबद्दल प्रत्यक्षदर्शक असलेल्या पेत्राने लिहून ठेवले आहे व त्याने मानवांचे वर्णन भटकणारी मेंढरे असे केले आहे. मानव अज्ञानी असल्यामुळे देवापासून दूर जातो व भटकतो. त्या हरवलेल्या मेंढरासाठीच येशूने वधस्तंभावर आपला प्राण दिला.