Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अधिकमास माहात्म्य अध्याय पाचवा

अधिकमास माहात्म्य अध्याय पाचवा
, गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (18:01 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ जयजयाजी गुरुराया ॥ मोरेश्वरमहाराजया ॥ नमन तुमचियां पायां ॥ करा छाया कृपेची ॥ १ ॥
तुमचिया कृपेची नौका ॥ परतीरा न्यावें बालका ॥ मनीं धरिला जो आवंका तो ॥ तो सिद्धि नेई का दयानिधी ॥ २ ॥
ऐका आतां श्रोतेजन ॥ कथा हे पुण्यपावन ॥ जे ऐकतां वैकुंठभुवन ॥ लक्ष्मीनारायण संवाद हा ॥ ३ ॥
श्रीविष्णुरुवाच ॥ एकदोपवनं देविजग्मुर्यदुकुमारकाः ॥ विहर्तुं सांब प्रद्युम्न चारुभानु गदादयः ॥ १ ॥
क्रीडित्वा सुचिरं कालं विचरंतः पिपासिताः ॥ जलंनिरुदके कूपे ददृशुः सत्वमद्‍भुतं ॥ २ ॥
कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ॥ तस्यचोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
ऐका हो श्रोते सर्व ॥ ब्राह्मणाचें माहात्म्य अपूर्व ॥ मागें कथिलें तुम्हातें सर्व ॥ आतांही अपूर्व आकर्पिजे ॥ ४ ॥
श्री विष्णु स्वयें आपण ॥ लक्ष्मीप्रती करीतसे श्रवण ॥ तेंची ऐका सावधान ॥ करूनि मन एकाग्र पै ॥ ५ ॥
एकदां मिळोन सर्व कृष्णकुमर ॥ खेळत होते तेव्हां अपार ॥ खेळत खेळत प्रवेशले दूर ॥ एका अरण्यामाजी ते ॥ ६ ॥
तंव तेथें खेळतां चेंडू उसळला ॥ तो जाऊन एका कूपामाजी पडला ॥ तंव तेथें पातला अर्भकमेळा ॥ पाहती कूपालागीतें ॥ ७ ॥
तेथें आश्चर्य देखिले नयनीं । तया कूपामाजी तक्षणीं ॥ कृकलास देखिला तयांनीं ॥ कृकलाश म्हणजे सरड तो ॥ ८ ॥
तो सरड पर्वता ऐसा ॥ कांती सुवर्णमय सहसा ॥ म्हणती आजवरी सरड ऐसा ॥ न देखों निजदृष्टीं ॥ ९ ॥
मग समग्र मिळोन एके ठायीं ॥ प्रवर्तक जाले त्याचि डोई ॥ सर्व मिळोन ते समयीं ॥ कर्षिते झाले तयातें ॥ १० ॥
चर्मबंधनीं बांधिला दृढ ॥ तंव बोलता जाला तो सरड ॥ हे मूलहो सर्वही मूढ ॥ तुम्हांमाजी प्रौढ तो कवण ॥ ११ ॥
मनुष्यवाणी तो बोले पाही ॥ आश्चर्य करूं लागले सर्वही ॥ मग सांब-प्रद्युम्न ते समयी ॥ बोलते जाले तयातें ॥ १२ ॥
म्हणती चतुरपणें बोलशी भाषा ॥ तरी तूं आहेस कवण महापुरुषा ॥ तुझी तंव व्हावया ऐशीदशा ॥ कारण काय निवेदीं ॥ १३ ॥
मग तो सरड ते काळीं पाहीं ॥ वदता जाला तयाते देहीं ॥ म्हणे मूलहो ऐका सर्वही ॥ पूर्वकथन माझें हें ॥ १४ ॥
पूर्वी मी नृग राजेंद्र देख ॥ इक्ष्वाकुवंशीं असे एक ॥ राज्यभार चालविं विवेक ॥ धर्मन्याय प्रतापी ॥ १५ ॥
दान करितसें अपार ॥ अमित माझा कारभार ॥ वयसा सुवर्णमय साचार ॥ देखुनि सुरवर मानवती ॥ १६ ॥
ऐसें असतां एकेकाळीं ॥ मलमासाचिया पर्वकाळीं ॥ पाचारून विप्रमंडळी ॥ गोदानें तोषवितसें ॥ १७ ॥
सलक्षणीं सालंकारयुक्त ॥ सहस्र गोदानें देतसे नित्य॥ पुढें परिसिजे वृत्तांत ॥ वर्तला तो अवधारा ॥ १८ ॥
एका ब्राह्मणातें धेनु दिधली दान ॥ तंव ते कळपांत आली पळून ॥ दुसरे दिनी सेवकीं धरून ॥ उभी केली दानार्थ ॥ १९ ॥
मी संकल्पयुक्त पाहीं ॥ दान दिधलें ते समयीं ॥ ब्राह्मण घेऊन जातां स्वगृहीं ॥ पूर्व दिवशींचा भेटला द्विजवर ॥ २० ॥
तयानें ते धेनु ओळखिली ॥ म्हणें मज हे काल दान आली ॥ येरू म्हणे रायें आतांचि दिधली ॥ मजलागुनी स्वामियां ॥ २१ ॥
मी तो न देई तुम्हातें ॥ येरू जाऊं न देई तयातें ॥ कलह मांडिला उभयतांतें ॥ आले धांवत मजलागीं ॥ २२ ॥
मग मी समजावीं दोघांतें ॥ नेणोनि अपराध घडला मातें ॥ म्हणे हिचेनि पालटे तुम्हातें ॥ धेनु देतों दुसरी मी ॥ २३ ॥
ऐसें तयातें समजावितां ॥ तंव ते नायकती उभयंता ॥ मग सहस्र गोदानें तत्वतां ॥ द्यावया सिद्ध जाहालों ॥ २४ ॥
एका धेनूचे पालटें ॥ सहस्र द्यावया नेटें ॥ सिद्ध जहालोसे हटें ॥ परी नायकती उभयतां ॥ २५ ॥
मज ते सांगती शास्त्राधार ॥ संकल्पें बद्ध झाला तो द्विजवर ॥ तया पालटें अन्य विचार ॥ तरी पाप अघोर तें असे ॥ २६ ॥
गोविक्रया समान जाण ॥ पाप घडे हो तेणें दारुण ॥ म्हणोन शापिलें मजलागून ॥ कृकलास होईं पापिष्ठा ॥ २७ ॥
विनाकारण हा शाप त्याणीं ॥ दिधला हो मजलागुनी ॥ मग प्रार्थिता जालों मधुरवाणी ॥ मग उश्शाप वाणी बोलिले ॥ २८ ।
कृष्णकुमाराची दृष्टी पडतां ॥ तैं उद्धार होय तुझा नृपनाथा ॥ तोची प्रसंग जाण आतां ॥ सिद्धनिरुता पातलासे ॥ २९ ॥
पुढें कालांतरें करून ॥ देह झाला विसर्जन ॥ यमदूत येऊनि जाण ॥ नेले मज लागून यमलोका ॥ ३० ॥
यमानें माझा सत्कार ॥ केला तेथें अति आदर ॥ विप्रशाप परम दुर्धर ॥ गांठींस असें माझें पैं ॥ ३१ ॥
तयायोगें करूनि जाण ॥ मज बोले सूर्यनंदन ॥ तूं नृपपुण्य पावन ॥ परी विप्रवचन न चुके ॥ ३२ ॥
यालागी नृपवर्या पाहीं ॥ मज भोगणे लागे सरड देहीं ॥ म्हणोन प्राप्त झालें तिये समयीं ॥ तेंची पाहीं भोगूं आतां ॥ ३३ ॥
तरी तुम्हीं आतां ऐकावें ॥ कृष्णदर्शन मज करवावे ॥ जाऊन तयातें निवेदावें ॥ वृत्तांत माझा हा ॥ ३४ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ धांवत गेले कृष्णकुमर ॥ करून देवातें नमस्कार ॥ समाचार सांगितला ॥ ३५ ॥
वृत्तांत ऐकतांच देवें ॥ धांव घेतली यदुपुंगवें ॥ दर्शन होतांची रमाधवें ॥ उद्धार केला तात्काळीं ॥ ३६ ॥
पाहूनियां स्वदेहासी ॥ नृगराज प्रवर्तला स्तुतीसी ॥ हे जनार्दन ऋषीकेशी ॥ तोडीं भवपाशासी माझिया ॥ ३७ ॥
हे केशव मधुमुरसंहरणा ॥ हे कृष्ण विष्णुजनार्दना ॥ जगपाळका दीनोद्धारणा ॥ नारायणा दयानिधे ॥ ३८ ॥
अवलोकितां कृपानयनीं ॥ पूर्वदेह आठवला मनीं ॥ दर्शन जालें मजलागूनीं ॥ पूर्वपुण्यें करूनि स्वामियां ॥ ३९ ॥
देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम ॥ नारायण ह्रषीकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय ॥ ४ ॥
ऐसी स्तुती करितां रावो ॥ संतोषें बोले रमाधवो ॥ तुवां आचरलासी व्रत प्रभावो ॥ म्हणोनि पाहावो देव भेटी ॥ ४० ॥
यालागीं केलें कर्म जे तें वायां ॥ जाईनाजी नृपवर्या ॥ आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ॥ ती या समया फळलीसे ॥ ४१ ॥
मग पाचारून समग्र कुमर ॥ तयाप्रती बोले शारङ्‌धर ॥ म्हणे अन्याय केउता नृपवर ॥ कहर केवढा जाहला ॥ ४२ ॥
यालागीं ब्राह्मणातें जे भिवोन ॥ करिती तयाचें पूजनस्तवन ॥ सद्भावें घालिती जे भोजन ॥ तरी मी जनार्दन संतुष्टें ॥ ४३ ॥
रणउत्साह क्षत्रियांसी ॥ तृणउत्साह धेनूसीं ॥ आमंत्रणउत्साह ब्राह्मणासी ॥ कृपणासी धनउत्साह ॥ ४४ ॥
म्हणोन ब्राह्मणभोजना ऐसें ॥ साधन तों आणीक नसे ॥ म्हणोनी पूजावें सायासें ॥ समयीं अनयासें अभ्यागत ॥ ४५ ॥
जरी शक्‍तिही नाहीं द्यावयासीं । आणि शक्तिही नाहीं दानासीं ॥ तरी नमन कीजे सद्भावेंसी ॥ तेणें द्विजासीं संतोष ॥ ४६ ॥
इतुकेंही न घडे जरी ॥ अभ्यंग स्नान सत्कारीं ॥ यासी तो वेंचावें न लागे पदरीं ॥ असलिया मुष्टीभरी अर्पावें ॥ ४७ ॥
अहो या ब्राह्मणासाठीं ॥ अवतार घे मी जगजेठी ॥ स्वयें सोसी आटाआटी ॥ ब्राह्मणासाठीं केवढी ॥ ४८ ॥
ब्राह्मणाचें लांछन पाहीं ॥ स्वयें मी मिरवीत ह्रदयीं ॥ ब्राह्मणा ऐसें दैवत नाहीं ॥ भूमंडळा माझारी ॥ ४९ ॥
ऐसियापरी शिकवण ॥ कुमारा सांगे श्रीकृष्ण ॥ याउपरी कथा अवलोकुन ॥ श्रोतेजन परिसोत कां ॥ ५० ॥
मग तो नृग राजशिरोमणी ॥ दिव्य देह पावोन तेच क्षणीं ॥ आरूढ जाला विमानीं ॥ नमस्कारूनी हरीतें ॥ ५१ ॥
इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्‍वा स्वमौलिना । अनुज्ञा तो विमानागर्‍यमारोहत्पश्यतां नृणां ॥ ५ ॥
सद्भिः समागमो राजन् कदाचिन्नाफलो भवेत् ॥ विमुक्‍तो नरकाद्राजानृगः साधुसमागमात् ॥ ६ ॥
या प्रकारे नृगनृपवर ॥ पावता जाला उद्धार ॥ म्हणोनियां धरामर ॥ अगोदर पूजावे ॥ ५२ ॥
पाहा केवढा ग्‍र्यान भगवंतें ॥ दिधलासे ब्राह्मणातें ॥ ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवतें ॥ ब्राह्मणाधीनते मंत्र ॥ ५३ ॥
पाहाया भूमंडळीं विख्याती ॥ भगीरथें आणिली भागीरथी ॥ तें जगातें पूर्ण करिती ॥ परी साधु उद्धरिती तयातें ॥ ५४ ॥
एकदा भागीरथी तटाकीं ॥ स्नान कीजे समग्र लोकीं ॥ तंव नारद तेथे दुरोन अवलोकीं ॥ परि न स्पर्श सलीला ॥ ५५ ॥
तव गंगा म्हणे मुनिवर्या ॥ दुरूनीच अवलोकुनियां ॥ कां स्पर्शोनद्याजी पायां ॥ करा छाया कृपेची ॥ ५६ ॥
सर्वेलोकानिमज्जांतिसाधुः किन्ननिमज्जति ॥ मातः त्वद्दर्शनान्मुक्तिः पुनर्जन्मन विद्यते ॥ ७ ॥
तंव नारद म्हणे ते समयीं ॥ तुज ऐसें पवित्र नाहीं ॥ तव दर्शनेंचि पाहीं ॥ मुक्‍ती होई प्राणियां ॥ ५७ ॥
मग स्नान केलिया सकळ ॥ क्षाळण होय अंगाचे मळ ॥ पाप न उरे तिळभर ॥ राहें अचळ ब्रह्मभुवनीं ॥ ५८ ॥
तंव गंगा बोले मुनिराया ॥ जैं मी आलें हो या ठायां ॥ तैंचा नेम वचन आठव ह्रदया ॥ माझिया असे कीं ॥ ५९ ॥
जगाचे पापाचें क्षाळण ॥ ते तव होतसे माझे न ॥ परी माझे पापमोचन ॥ तुमचेंनि जाण होतसे ॥ ६० ॥
मग हास्य करून देवऋषी ॥ मार्जन मज्जन केलें तिसीं ॥ प्रवेशता जाला भुवनासी ॥ ब्रह्मलोकासी मुनिरावो ॥ ६१ ॥
ऐसें साधूचें महिमान ॥ गंगा वर्णीतसे आपण ॥ म्हणोन प्रार्थितो तुम्हांलागून ॥ पूजा साधुजन आदरें ॥ ६२ ॥
साधूनां दर्शनं स्पर्शःकीर्तनं स्मरण तथा ॥ ब्रह्मस्व नच हर्तव्यं यदिच्छसि परांगतिं ॥ ८ ॥
सामर्थ्य असोनि आंगीं ॥ शक्तिनुसार न पूजिती जगी ॥ तरी तया ऐसा अभागी ॥ भुवन त्रयीं नसेची ॥ ६३ ॥
संसार तरी माईक ॥ आयुष्य जाण क्षणैक ॥ येथें कीजे पूर्ण विवेक ॥ करा सार्थक देहाचें ॥ ६४ ॥
धन असलिया अपरमित ॥ कांहीं नयेचि पै सांगत ॥ म्हणोनि कीजे हिताहित ॥ ह्रदयीं श्रीअनंत आठवूनी ॥ ६५ ॥
कृष्णः परिजनं गृह्य भगवान् देवकीसुतः । ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजानमनुशिक्षयन् ॥ ९ ॥
एवं विभाव्य भगवान् मुकुंदो द्वारशोकसः ॥ पावनः सर्वलोकानां विवेश निजमंदिरं ॥ १० ॥
ऐसा कथाभाग रमाधवें ॥ कथिला जो स्वभावें ॥ जग हे पावन करावें ॥ म्हणोनि स्वभावें निवेदित ॥ ६६ ॥
तोची अर्थांतर बरवा ॥ तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वां ॥ चित्ती संशय न धरावा ॥ पुराणीं पाहावा प्रत्ययो ॥ ६७ ॥
इति श्रीअधिकमास माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ पंचमोऽध्याय गोड हा ॥ ६८ ॥
ओव्या ६८ ॥
 
॥ इति पंचमोऽध्यायः ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अधिकमास माहात्म्य अध्याय चौथा