Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

26/11चा मुंबई हल्ला : 'कसाब रोबोसारखा गोळीबार करत होता आणि मी त्याचे फोटो घेतले'

26/11चा मुंबई हल्ला : 'कसाब रोबोसारखा गोळीबार करत होता आणि मी त्याचे फोटो घेतले'
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (10:00 IST)
जान्हवी मुळे
"तो अगदी बोअरिंग, कंटाळवाणा दिवस होता."
याच शब्दांत सबॅस्टियन डि'सुझा 26 नोव्हेंबर 2008च्या दिवसाचं वर्णन करतात. तो दिवस, जेव्हा त्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनात बेछूट गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो टिपले होते.
एक दशकानंतर आम्ही त्यांना पुन्हा बोलतं केलं. 66 वर्षांचे डि'सुझा निवृत्त झाल्यापासून गोव्यात राहतात. पण दहा वर्षांपूर्वी ते मुंबई मिरर या दैनिकात फोटो एडिटर (फोटोग्राफर्सचे प्रमुख) म्हणून काम करत होते.
त्या दिवशी ते संध्याकाळी CSMT स्टेशनपासून जवळच असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. कुणाला काही कळण्याच्या आतच मुंबईवर हल्ला झाला.
आधी कुलाब्यात लिओपोल्ड कॅफेजवळ गोळीबार झाल्याची आणि काही बंदुकधारी ताज महाल हॉटेलमध्ये घुसल्याची माहिती मिळाली.
"आम्ही ऑफिसमध्येच बसलो होतो. तो दिवस अगदी कंटाळवाणा होता, कुणालाच चांगले फोटो मिळाले नव्हते. एरवी कुणी ऑफिसला परत येत नाही, पण त्या दिवशी सगळे जमले होते. गप्पा, चर्चा सुरू होत्या. अचानक बातमी झळकली आणि सगळे धावले. प्रत्येकानं आपापल्या बॅगा उचलल्या आणि तिथून पळाले."
गोळीबार झाल्याच्या बातमीनं सुरुवात झाली आणि मुंबईतलं भयनाट्य पुढचे साठ तास सुरू होतं. CSMT स्टेशन, दोन अलिशान हॉटेल्स आणि नरिमन हाऊसवर झालेल्या हल्ल्यांत 166 जणांचा मृत्यू झाला. नऊ हल्लेखोरही मारले गेले.
दहावा हल्लेखोर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं. कसाब आणि त्याच्या एका साथीदारानं CSMT स्टेशनवर हल्ला केला होता जिथे 52 जणांचा जीव गेला.
 
स्टेशनवरचा रक्तपात
स्फोटांचा, गोळीबाराचा आवाज ऐकून डि'सुझा स्टेशनवर पोहोचले, तेव्हा आपल्या समोर काहीतरी वेगळं घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं. असं काहीतरी, जे याआधी कुठल्याही युद्धभूमीपासून दूर, सुरक्षित शहरात घडलं नव्हतं.
"ते सगळं नवीनच होतं. मी अतिरेक्यांना असं कधी पाहिलं नव्हतं. मला काही वेगळं घडत असल्याचं दिसलं तर मी तडक तिथे पोहोचतो. त्या दिवशीही मला प्रश्न पडला, हे काय चाललं आहे? मी माग काढत स्टेशनवर गेलो," डि'सुझा सांगतात.
 
कसाब आणि त्याच्या साथीदाराला (इस्माइल खान) पहिल्यांदा पाहिलं, तो क्षण डि'सुझा यांना आजही स्पष्ट आठवतो.
"लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मना वेगळं करणाऱ्या भागात, तिकीट काऊंटरजवळ ते होते. ते सहज दिसून येत नव्हते, कारण कुठल्याही सर्वसामान्य पर्यटकांसारख्या बॅकपॅक त्यांच्या खांद्यावर होत्या. त्यांनी गोळीबार केला नाही, तर ते कुठे आहेत हे समजणं कठीण होतं. मी तसाच त्यांचा माग काढला आणि एका हवालदाराला सांगितलं - ते पाहा तिकडे आहेत."
डि'सुझा त्यानंतर दोघांचा पाठलाग करत राहिले, खाली वाकत, मिळेल तिथे आडोसा शोधत, फोटो काढत राहिले.
"मी त्यांच्यावरची माझी नजर अजिबात ढळू दिली नाही. मला फक्त पाहायचं होतं, ते नेमकं काय करत आहेत. मी फोटोग्राफर म्हणून 'हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे' असं काही नसतं. हे लोक कोण आहेत? ते खरंच अतिरेकी आहेत का? ते कोणावर गोळीबार करत आहेत आणि का? मला फक्त जाणून घ्यायचं होतं."
 
कसाबचा 'तो' फोटो
हल्लेखोर तिथे होते तोवर डि'सुझा फोटो काढत राहिले. त्यातल्याच एका फोटोत एक बंदूकधारी माणूस कार्गो पँट, टी-शर्ट घालून, हातातल्या रायफलसह स्टेशनवर चालताना दिसतो. तो अजमल कसाब असल्याचं मागाहून स्पष्ट झालं.
कसाबचा तो फोटो पुढे कोर्टात त्याच्याविरुद्धच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. त्या फोटोंचं ऐतिहासिक महत्त्व पाहता, त्यांचा 2009 सालच्या वर्षाच्या वर्ल्ड प्रेस फोटोच्या मानद यादीत समावेश करण्यात आला.
पण हे सगळं नंतरचं. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 27 नोव्हेंबर 2008च्या सकाळी, मुंबईवरचा हल्ला अजून संपला नव्हता आणि अतिरेकी ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊसमध्ये तळ ठोकून होते, तेव्हा मुंबई मिररच्या मुखपृष्ठावर कसाबचा फोटो झळकला.
तो फोटो मुंबईकर आजही विसरू शकलेले नाहीत. पण त्या फोटोनं मिळालेल्या प्रसिद्धीपासून डि'सुझा यांनी दूर राहणंच पसंत केलं. दहा वर्षांनंतरही त्यांचं मत बदललेलं नाही.
"सगळं काही संपल्यावर तुमच्या लक्षात येतं की, 'अरे, आपण काहीतरी वेगळं केलं होतं.' मला यात काही ग्रेट वगैरे वाटत नाही. माझ्यासमोर जे काही घडलं, ते मी कॅमेऱ्यात टिपत गेलो. मला त्याचा अभिमान वगैरे वाटत नाही. लोक त्यावर काही बोलत आहेत, पण मी फक्त माझं काम केलं."
उलट ते सगळं विसरून जायला हवं असं डि'सुझा यांना वाटतं. "मला वाटत नाही की त्या फोटोमुळं मी कोणी मोठा बनलो किंवा मला ते मिरवावंसं वाटत नाही. तो एक खूनी होता. मी कोण्या चांगल्या व्यक्तीचा फोटो काढला असता, तर मला वेगळं वाटलं असतं," असं ते सांगतात.
 
डि'सुझा यांना कोर्टात कसाबविरुद्ध साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं, आणि ती दुसरी भेटही त्यांना लख्खपणे आठवते.
"इतक्या जवळून त्याला पुन्हा पाहिल्यावर मला तो वेगळाच भासला. सापळ्यात अडकल्यासारखा. मला वाटतं त्याला आपण काय करत होतो, हे ठावूक नसावं तेव्हा. ते रोबोसारखे होते, गोळीबार करत सुटले होते, ते नशेत वैगरे होते का? माहीत नाही. कुणाचा जीव घेणं ही मोठी भयानक गोष्ट आहे. तुम्ही आणि मी असं कधी करणार नाही."
अखेर कसाबवरचे आरोप सिद्ध झाले आणि 2010 सालच्या मे महिन्यात त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवल्यावर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
 
गोळीबार आणि भीतीचा सामना
कसाबला फासावर चढवलं, त्याला आता सहा वर्षं झाली आहेत. पण तो जिवंत होता तेव्हा, किंवा त्याआधी त्या रात्री स्टेशनवर समोर येईल त्याच्यावर गोळीबार करत होता, तेव्हाही डि'सुझा यांना कधी सेकंदासाठीही भीती वाटली नाही.
फोटो काढताना तुम्ही घाबरला होता का, असं विचारून होण्याआधीच ते उत्तर देतात, 'अजिबात नाही.'
"मला भीती वाटली नाही. अजिबात नाही. तुमचा तोल गेला तर काय होईल? तुम्ही घाबराल, पळाल, तिथून निघून जाल. भीती वाटली की ते स्वाभाविक आहे. कोणीही पळून जाईल. त्या दिवशीही अनेक पत्रकार पळून गेले," ते सांगतात.
 
डि'सुझा यांना कशाची भीती वाटली नव्हती, पण ते नेमके कुठे होते, हे कळल्यावर त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?
"त्यांना आनंद झाला की मी जिवंत आहे," डि'सुझा हसत हसत सांगतात. "म्हणजे बघा, माझी पत्नी रोझी तेव्हा चिडली होती. कारण मी फोटो काढताना फोन स्विच ऑफ केला होता, स्टेशनवरच्या शांततेत माझ्याकडे लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून. तिथे अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती."
डि'सुझा यांच्यात ते धाडस अनेक वर्षांच्या अनुभवामुळं आलं असावं. त्यांनी त्याआधीही दंगली आणि आपत्तींचं वार्तांकन केलं होतं.
"माझ्या कामाची सुरुवात ही दंगलीपासून झाली, नागरीपाड्यातली दंगल. मी एका पोलिसावर चाकूहल्ला झालेला पाहिला आहे. त्यामुळं भीती वगैरेचं म्हणाल, तर पहिल्या दिवसापासूनच मला या सगळ्यांची सवय आहे," ते सांगतात.
2002 साली जेव्हा गुजरातमध्ये जातीय हिंसाचार सुरू होता तेव्हा डि'सुझा AFP वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांनी त्यावेळी टिपलेला एक फोटो गुजरात दंगलींची ओळख बनला.
"मी 300mm लेन्सनं फोटो काढला, तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर होतो. हा माणूस हातवारे करून मिरवत होता. तिथं गर्दी जमा झाली होती आणि ते कुठंतरी जाऊन हल्ला करण्याची तयारी करत होते. मी फोटो काढला. नंतर कुणी माझ्यावर टीका केली की मी जाणूनबुजून त्याला तशी पोझ द्यायला लावली. पण मी कधीच पोझ देताना फोटो काढत नाही, पत्रकार परिषदेतही नाही," ते सांगतात.
योग्य वेळ साधणं हे पत्रकारांसाठी आता आणखी महत्त्वाचं बनलं आहे हे डि'सुझा मान्य करतात. आता कुणाकडेही मोबाईल फोनमध्ये कॅमेरा असतो आणि त्या जागी जो कोणी असेल, त्याला फोटो मिळून जातात.
त्यामुळंच युवा फोटोग्राफर्सना डि'सुझा एक सल्ला देता, "तुमचं आसपास लक्ष असायला हवं. संयमी राहा, घाई करू नका की तुमच्याकडून काही निसटून जाईल. तुमचा निर्णय स्वतःच घ्या. एक क्षण थांबून आसपास पाहा आणि मगच पुढे जा. वेड्यासारखं फक्त धावत सुटू नका."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भावना गवळी अडचणीत, ईडीकडून आरोपपत्र दाखल