आज 12 जून. पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. आकाशवाणीमध्ये काम करत असताना पुलंनी लंडनमध्ये BBCचं प्रॉडक्शन ट्रेनिंग घेतलं होतं. त्याबद्दल त्यांनी 'अपूर्वाई' या पुस्तकात लिहिलेले हे अनुभव तुम्हाला वेगळ्याच काळात घेऊन जातील:
एडिन्बराहून निघाल्यानंतर पुढला मुक्काम खुद्द लंडन शहरातच दोनतीन महिने पडणार होता. त्यामुळे काँपेन गार्डन्समधल्या ज्युअरबाईच्या घरात आम्ही चक्क बिऱ्हाड थाटले. यापुढे माझा टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम BBCच्या शाळेत सुरू होणार होता. आतापर्यंत मी टेलिव्हिजनवर पुष्कळ कार्यक्रम पाहिले होते. आता प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन कामाला सुरुवात होणार होती.
रेडिओचे हे धाकटे भावंड कानामागून येऊन भलतेच तिखट झाले आहे. रेडिओची रवानगी आता सैपाकघरात झाली आहे. आधीच इंग्रजीला घरकोंबडेपणा मानवतो. त्यात त्याच्या खुराड्यात ही नवी करमणूक आली. त्यामुळे तासनतास हे कार्यक्रम पाहत बसणारी कुटुंबे निर्माण झाली. कुणी म्हणतात की ह्या यंत्राने सामाजिक जीवनावर आघात केला. कुणा म्हणतात, चित्रपटगृहे ओस पडली. कुणाचे मत, नाटकवाले मेले. मला मात्र तसे वाटत नाही. कारण करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांना तितकीच गर्दी असते.
शंभर वर्षांपूर्वींची लिफ्ट
आमची शाळा तुसॉदबाईंच्या मेणाच्या प्रदर्शनापुढल्या गल्लीतच होती. BBCचे 'स्टाफ ट्रेनिंग स्कूल' एका जुनाट तिमजली इमारतीत आहे. पहिल्या दिवशी इमारतीतली लिफ्ट पाहून मी थक्क झालो. शंभर वर्षांपूर्वी बसवलेली ही लिफ्ट लोखंडी दोरखंड ओढून वर न्यावी लागते. विसाव्या शतकात महाराणी विक्तूरियाच्या आमदानीतला हा पाळणा अजून वापरात ठेवण्याचा पुराणमताभिमान इंग्रजच बाळगू जाणे.
वर्गाचे स्वरूप अगदी एखाद्या शाळेतल्या वर्गाप्रमाणे होते. छोटीछोटी मेजे आणि पुढे मास्तरांचे टेबल, फळा, खडू, नकाशे अगदी यथासांग होते. टेबलावर छडी तेवढी नव्हती. आम्ही अठरावीस विद्यार्थी होतो. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत शाळा चालत असे. त्यानंतर प्रत्यक्ष स्टुडिओतील शिक्षण. इथली शिस्त, नियमितपणा, टापटीप पाहून आपण गारठतो.
टेलिव्हिजनच्या शास्त्रातले अनुभवी पंडित आम्हाला धडे देत - सक्तीने गिरवून घेत. सुमारे अडीच महिन्यांत हे सारे शिक्षण इतक्या पद्धतशीरपणे देण्यात आले की, आमच्यापैकी प्रत्येकजण ज्या वेळी आपापले प्रॉडक्शन करण्यासाठी तयार झाला, त्या वेळी BBCच्या टेलिव्हिजनमधला खिळा न् खिळा आमच्या परिचयाचा झाला होता. प्रत्येक शिक्षक शंकासमाधान करायला तत्पर असे.
उत्तरं देण्यासाठी मुदत
अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी शिक्षक मुदत मागून घेत आणि स्वत: पुस्तके चाळून त्यातले उतारे नोंदवून घेऊन उत्तरे देत. सर्वज्ञतेचा आव कुणी आणला नाही. BBCचा व्याप प्रचंड आहे. त्यातून टेलिव्हिजन हे तर जगड्व्याळ काम. हजारो माणसे इथे घड्याळाच्या काट्याप्रमाणे राबत असतात. पण ह्या सर्वांत मला जर खरोखर कुणाचे कौतुक वाटले असेल तर सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या पोरींचे! ह्या चलाख पोरी टणाटण उड्या मारीत हसऱ्या चेहऱ्याने कामाचे भारे उचलीत असतात.
प्रत्येक प्रोड्युसरला सेक्रेटरी असते. ह्या इतक्या तरबेज असतात की, कधी कधी प्रोड्युसरच्या गैरहजेरीत प्रॉडक्शनचेदेखील काम त्या करू शकतात. BBCच काय, परंतु पाश्चात्य देशांतल्या साऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ह्या सेक्रेटरी म्हणून राबणाऱ्या पोरी जणू रक्तवाहिन्या आहेत!
पहिल्याच दिवशी मला काही महत्त्वाची पत्रे टाईप करून घ्यायची होती. मी घरून पत्रे लिहून नेली आणि सकाळी टाईप करायला दिली. पंधरा मिनिटांत सहीला पत्रे आली. माझा विश्वास बसेना. आमच्याकडे सामान्यत: दोनतीन दिवसांनी टंकलेखकाला दहा वेळा ढोसल्यानंतर पत्र टाईपराईटवरवर चढायचे!
स्वावलंबी साहेब
दुसऱ्या दिवशी एका गोष्टीने मला असाच धक्का दिला. परदेशांतल्या हपिसांतून चपराशी कधीच आढळले नाहीत. कागदांची हालचाल दर अर्ध्या तासाने मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते व बाकीची कामे साहेब स्वत: उठून करतात. टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलवण्याची चैन परदेशांत नाही.
एवढेच काय, पण मोठ्यांतल्या मोठ्या साहेबालादेखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वत: उठून सार्वजनिक उपाहारगृहात जावे लागते. चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यांतून हिंडणारे 'बैरे' इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत. साहेबांची घरची कामे करणे हा आपल्याकडच्या चपराशांचा मुख्य व्यवसाय. त्यातून वेळ उरलाच तर फायली हलायच्या.
सकाळी सव्वाअकराला कॉफीची सुटी व्हायची. सव्वाअकरा वाजता उभे इंग्लंड कॉफी पिते. एक वाजता जेवते. चार वाजता चहा पिते. रात्री साताला पुन्हा जेवते आणि नऊ ते अकरा स्वत:ची करमणूक करून घेते. अकरा वाजता चिडीचूप करून झोपी जाते.
सारे जीवन आगगाडीच्या वेळापत्रकासारखे! बहुतेक हॉटेलेदेखील ठराविक वेळी उघडझाप करतात, भलत्या वेळी चहा प्यायचे म्हटले तर चहा मिळायचा नाही. दुपारी तीन वाजता भुकेने कळवळून हॉटेलच्या दाराशी कुणी पडला तरी दार उघडायचे नाही. मोठा अजब लोकांचा देश! अवेळी खाणाऱ्यांनी सहा सहा पेनी यंत्राच्या फटीत कोंबत चॉकलेटे खावीत, कागदी पेल्यांतून कॉफी प्यावी. वर्गात व्याख्यानाच्या रंगात आलेला वक्तादेखील सव्वाअकरा वाजले की विषय दहा सेकंदात गुंडाळून कॉफीला पळायचा!
अपॉइंटमेंटसाठी शतपावली
BBC सारख्या संस्थांचे यश नियमितपणात आहे. दोन वाजता नाटकाची तालीम सुरू म्हणजे सुरू. अडचण आलीच तर टेलिफोनवरून नटाचा किंवा नटीचा निरोप यायचा! वर्गात यायला एका मिनिटाने उशीर करणारा विद्यार्थी (वय वर्षे सामान्यत: चाळीसच्या आसपास) चौथी पाचवीतल्या पोरासारखा अपराधी चेहरा करून माफी मागत वर्गात शिरायचा! मी तर एखाद्याची साताची अपॉइंटमेंट असली तर साडेसहापासून त्याच्या दारापुढल्या फुटपाथवर शतपावली करीत हिंडत असे. नियमितपणा मुख्यत: दुसऱ्या माणसाच्या वेळेला किंमत देण्यातून येतो.
पाश्चात्त्य देशांत मनुष्यबळ कमी. युद्धाने प्रचंड नरबळी घेतले. त्यामुळे माणसाला विलक्षण भाव आला आहे. यंत्राचा उपयोग अत्यंत अपरिहार्य आहे. बोलण्यात नेहमी हॉर्स पॉवरसारखा 'मॅन अवर्स' हा शब्दप्रयोग येतो. टेलिव्हिजनच्या कोणत्याही एका कार्यक्रमाला किती 'मॅन अवर्स' लागतात ह्याची गणिते असतात आणि त्यावर खर्च मोजला जातो.
टेलिव्हिजनच्या शाळेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत पंधरा पंधरा, वीस वीस वर्षे काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळात गणवेष चढवून रणांगणावर कामगिरी बजवाली होती. त्यातले दोघेतिघे हिंदुस्तानातही आले होते. या युद्धाने त्यांना खूप गोष्टी शिकवल्या.
अर्थात वर्गात मास्तरांची चित्रे काढणे, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणे हेदेखील चालायचे. ह्या शिक्षकांतदेखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक एक तज्ज्ञ असे. मी एकूण पन्नाससाठ व्याख्याने ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचे मला कौतुक वाटे! टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषयदेखील गमतीदार चुटके सांगत सांगत चालायचा.
इंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसालादेखील आपण हशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या झिरमिळ्या निसटून खाली पडतील, अशी भीती वाटत नाही. बीबीसीतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हांला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला धक्का बसेल हे भय त्यांना नाही. त्याउलट देशी साहेबांचे काडेचिराइती चेहरे जिज्ञासूंनी आठवावे!
गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग
अनेक अभिवादने, हस्तांदोलने - गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक यू, बेग युवर पार्डन, असल्या शब्दप्रयोगांनी यांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणालादेखील स्निग्धता येते. वरिष्ठांतल्या वरिष्ठाला कनिष्ठांतल्या कनिष्ठाने अभिवादन केले तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एकजण मुजरा करतो आणि दुसरा त्या दिशेला ढुंकून न पाहता जातो. जसजसा माणूस हुद्द्याने मोठा होत जातो तसतशी ही पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो, हा एतद्देशीय अनुभव आहे!
तिथे आमचा लिफ्टमनदेखील तो दोरखंड ओढता ओढता शीळ घालून गाणे म्हणायचा! तिसऱ्याचौथ्या दिवसापासून त्याने मला 'पी.एल.' म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब समज देऊ. मला वाटते, लोकशाहीदेखील रक्तात मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोण जाणे. एकमेकांना मानाने वागवणे हेच कुठल्याही संस्कृतीचे बीज आहे.
(पु. ल. देशपांडे यांचा हा लेख 'अपूर्वाई' या पुस्तकातून साभार. या पुस्तकाचे सर्व हक्क श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे - 30 यांच्याकडे आहेत.)