भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. या पुतळ्याचं शनिवारी (13 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्याचा कार्यक्रम नियोजित आहे.
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
पण त्याआधीच पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी केला. त्यांनी यावेळी शरद पवारांवर टीका केली. पडळकर म्हणाले, "शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो."
यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, या पडळकरांच्या वक्तव्यानंतरही वाद निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पलटवार
पडळकरांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, "त्याला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे. ज्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची काय एवढी नोंद घेताय तुम्ही? उभं राहिल्यानंतर जनतेचा आहे का पाठिंबा? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय... लोकांनीच त्यांना नाकारलेलं आहे. त्यांना फार महत्त्वं देण्याची गरज नाही."
तर "गोपिचंद पडळकर हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल विटकरी यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत पडळकरांवर टीका केलीय
तर पुतळ्याचं अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.