अंगोलाच्या अब्जाधीश महिला इझाबेल डॉस सान्तोस, ज्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत, त्यांना आता अंगोलाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची इच्छा आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांनी निवडणूक लढवण्याच्या शक्यतेचा इन्कार केलेला नाही.
त्यांचे वडील होजे एडुआर्डो डॉस सान्तोस हे 38 वर्ष अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष होते.
इझाबेल यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकारी वकील इझाबेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून 1 अब्ज डॉलर्स वसूल करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे पेसै सरकारचे आहेत आणि इझाबेल यांनी भ्रष्टाचार केला असं सरकारचं म्हणणं आहे.
दुसरीकडे सान्तोस यांनी सगळ्या प्रकारच्या आरोपांचं खंडन केलं आहे.
46 वर्षांच्या इझाबेल सान्तोस आफिक्रेतल्या सगळ्यात श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्स मासिकानुसार त्यांची संपत्ती 2.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
इझाबेल यांची 2016 साली अंगोलाची तेल कंपनी सोनांगोलच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती. त्यांच्या वडिलांनी केलेली ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
त्यांच्या वडिलांनंतर अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष झालेले जोअओ लोरेन्को यांनी इझाबेला सान्तोस यांची 2017 साली हकालपट्टी केली. लोरेन्को यांची निवड इझाबेला यांच्या वडिलांनी आपले उत्तराधिकारी म्हणून केली होती.
इझाबेल सान्तोस यांचं म्हणणं काय?
लंडनमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत इझाबेल यांनी वारंवार सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत त्या अंगोलाला परत गेल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे.
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे संकेत देताना त्या म्हणाल्या की त्यांची देशनिष्ठा कायम आहे आणि त्यांना देशासाठी काम करायचं आहे.
"देशाचं नेतृत्व करणं म्हणजेच देशाची सेवा करण्यासारखं आहे. दैवाने माझ्यासाठी जे योजलं असेल ते सगळं करेन मी," त्या म्हणाल्या.
अंगोलाची राजधानी असणाऱ्या लुआंडातल्या कोर्टाने इझाबेल यांची बँक अकाउंट आणि तेल साम्राज्य गोठवण्याचे आदेश दिले. यानंतर डॉस सान्तोस कुटुंबाची भ्रष्टाचारासाठी चौकशी सुरू झाली. आता सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी 2 अब्ज डॉलर्सच्या घोटाळा केला आहे.
"हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. हे सध्याचे सरकारने आमच्या कुटुंबावर केलेले सुनियोजित हल्ले आहेत."
अंगोलात काय बदललं आहे?
इझाबेल सान्तोस यांनी नेहमीच राष्ट्राध्यक्ष लोरेन्को यांच्यावर टीका केली आहे. लोरेन्को दोन वर्षांपूर्वी इझाबेल यांचे वडील होजे एडुआर्डो डॉस सान्तोस यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाले.
सान्तोस कुटुंब आणि लोरेन्को एकाच पक्षाचे सदस्य आहेत, असं असतानाही लोरेन्को आपल्या भ्रष्टाचारविरोधी धोरणांतर्गत सान्तोस कुटुंबाला लक्ष्य करत आहेत हे पाहून अनेक अंगोलन नागरिकांना धक्का बसला आहे.
"लोरेन्को यांना संपूर्ण सत्ता हवी आहे, माजी राष्ट्राध्यक्षांची आठवणही त्यांना पक्षातून पुसून टाकायची आहे आणि म्हणूनच ते असं वागत आहेत," इझाबेल म्हणाल्या.
"जर 2020 च्या निवडणुकीत दुसरा उमेदवार पुढे आला ज्याला माजी राष्ट्राध्यक्ष डॉन सान्तोस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा पाठिंबा आहे तर राष्ट्राध्यक्ष लोरेन्को यांना तगडं आव्हान मिळेल कारण त्यांनी काहीच काम केलेलं नाहीच. देशात बेरोजगारी वाढली आहे, अर्थव्यवस्थेला सुस्ती आली आहे आणि सतत संप होत आहेत," त्या पुढे म्हणाल्या.
इझाबेल निवडणूक जिंकू शकतात?
पण त्या किंवा त्यांच्यावतीने कोणी अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकतो का? आणि त्या विजयाने इझाबेल यांचा देशात परत येण्याचा मार्ग सुकर करु शकतो का? हा कळीचा प्रश्न आहे.
काही राजकीय निरीक्षकांच्या मते इझाबेल त्यांच्या वडिलांच्या उत्तराधिकारी होऊ शकत नाही, जरी त्यांचे वडील सत्तेत असताना त्या आपण राजकुमारी आहोत या आविर्भावात अनेक वर्ष वावरल्या असल्या तरी.
"इझाबेल यांच्याकडे स्वतःचा तगडा मतदारसंघही नाहीये. पक्ष तर लोरेन्को यांना पाठिंबा देतोय. कमीत कमी इझाबेल यांना लक्ष्य करण्याच्या कृतीला तरी," ऑक्सफर्डमधले प्राध्यापक आणि आफ्रिकन राजकारणातले तज्ज्ञ रिकार्डो सोरेस डे ऑलिव्हिरा सांगतात.
"सध्या डॉस सान्तोस कुटुंबाला भ्रष्टाचारावरुन लक्ष्य केलं जातंय, पण पुढे जर लोरेन्को यांनी या पूर्ण देशातल्या भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं तर MPLA (लोरेन्को आणि सान्तोस यांचा पक्ष) त्यांना पाठिंबा देणार नाही.
कदाचित डॉस सान्तोस यांना पाठिंबा दिला जाईल कारण शेवटी याचं माणसाने त्यांना श्रीमंत व्हायला मदत केली. पण सध्या तरी असं काही घडेल अशी चिन्हं नाहीये," ते पुढे सांगतात.
इझाबेल सान्तोस आणि त्यांचे वडील देशात आणि पक्षातही सध्या अप्रिय ठरले आहेत. पण इसाबेला यांची बहुतांश संपत्ती अजूनही देशाबाहेर आहे, त्याला अंगोलाचे सरकार हात लावू शकलेलं नाही, त्यामुळे इसाबेल अजूनही राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत तगड्या दावेदार ठरू शकतात.