Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mastodon: ट्विटरला रामराम ठोकून लोक मॅस्तडॉनवर का जात आहेत?

Webdunia
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (12:34 IST)
गेल्या आठवड्यातली ही गोष्ट. भारतातले काही नामांकित ट्विटर यूजर ट्विटर सोडण्याच्या विचारात होते.
 
ट्विटर काही ठराविक विचारसरणीच्या लोकांविरुद्ध भेदभाव करतं, काही खास अकाऊंट्सच व्हेरिफाय करून त्यांना ब्लू टिक देतं, असे आरोप कंपनीवर झाले. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर बहिष्कार टाकून त्याऐवजी मॅस्तडॉन नावाच्या दुसऱ्या एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खातं उघडायची मोहीम अनेकांनी हाती घेतली.
 
त्याचा प्रचार करायला मात्र पुन्हा ट्विटरचाच वापर केला गेला, हा विरोधाभासच. मात्र त्याच निमित्ताने कईक वर्षांपासून त्याच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर जगणाऱ्या मंडळींना एक नवीन डिजिटल मोहल्ला मॅस्तडॉनच्या रूपाने कळला.
 
मॅस्तडॉन फारसं प्रचलित नाही किंवा त्याचे फारसे यूजर्सही नाहीत. मात्र मॅस्तडॉनची धोरणं ट्विटरपेक्षा अधिक सुस्पष्ट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
 
ट्विटरचे एकट्या भारतात 3 कोटी यूजर्स आहेत. ट्विटरने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांचं अकाउंट दोन वेळा सस्पेंड केलं. तेव्हापासून ट्विटरविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली.
 
हेगडे यांनी नाझी जर्मनीचा 1936 सालचा एक फोटो ट्वीट केला होता. तेव्हा पहिल्यांदा ट्विटरने त्यांचं अकाउंट बंद केलं होतं. जमलेला जमाव नाझींना सॅल्यूट करत आहे, असा हा फोटो होता. मात्र, या फोटोत ऑगस्ट लँडमेसर या जर्मन नागरिकाने सॅल्युट ठोकलेला नाही. या फोटोमुळे आपल्या 'hateful imagery' (द्वेष पसरवणारे छायाचित्र) नियमाचं उल्लंघन होत असल्याचं म्हणत ट्विटरने हेगडे यांचं अकाउंट बंद केलं होतं.
 
याविषयी बोलताना हेगडे यांनी बीबीसीच्या कृतिका पती यांना सांगितलं, "यावरून बरीच ओरड झाल्यानंतर ट्विटरने अकाउंट पुन्हा सुरू केलं. मात्र, फोटोशिवाय." यानंतर 2017 मध्ये त्यांनी दोन क्रांतिकारकांना झालेल्या फाशीविरोधातली एक कविता ट्वीट केली होती. तेव्हासुद्धा ट्विटरने त्यांना ई-मेलवरून नोटीस पाठवत कविता काढून टाकायला सांगितलं होतं. या कवितेचं शीर्षक होतं 'Hang Him'. या शब्दांमुळे ट्विटरच्या बॅकएन्डवर नियमांचं उल्लंघन केल्याची सूचना देणारे स्वयंचलित बॉट्स जागे झाल्याचं हेगडे सांगतात.
 
या दोन घटनांमुळे ट्विटर भारतात आपला मजकूर कसा नियंत्रित करतं, याविषयीची चर्चा सुरू झाली. अल्पसंख्याकांविषयी केलेलं ट्वीट खपवून घेतलं जातं, ट्विटर त्यावर हरकत घेत नाही, असा आरोप अनेकांनी नोंदवला. मात्र, ट्विटरने या आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीने एक निवेदन जारी करत "कुठल्याही विशिष्ट विचारसरणी किंवा राजकीय दृष्टिकोनातून ट्विटर कॉन्टेट नियंत्रित करत नाही," असं स्पष्टीकरण दिलं. तिथूनच लोकांनी ट्विटरला राम राम ठोकून मॅस्तडॉनवर जाऊन व्यक्त व्हायला हवं, अशी चर्चा सुरू केली.
 
द्वेषपूर्ण वक्तव्यांविषयी ट्विटरची भूमिका 'अत्यंत चंचल' असल्याचं अनेकांनी बीबीसीला सांगितलं. याउलट गैरवर्तणुकीविरोधी मॅस्तडॉनची धोरणं अधिक सुस्पष्ट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही ट्विटर यूजर्सनी मॅस्तडॉनवर अकाउंट उघडत ट्विटरवरून त्याची घोषणा केली आणि बघता बघता ट्विटरच्या तुलनेने अगदी लहान असलेल्या मॅस्तडॉनचं नाव ट्विटरवर ट्रेंड होऊ लागलं. मात्र, किती जणांनी मॅस्तडॉनवर अकाउंट उघडलं आहे आणि किती जण ट्विटर अकाउंट पूर्णपणे बंद करतील, हे बघावं लागेल.
 
मात्र, ट्विटरच्या सामान्य युजर्सप्रमाणेच तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांचंही म्हणणं आहे की भारतातला कॉन्टेट नियंत्रित करण्यासंबंधीचा ट्विटरचा इतिहास डागाळलेला आहे. 'मीडियानामा' या इंटरनेटविषयक गोष्टींवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीचे निखिल पहावा म्हणतात, "द्वेषपूर्ण वक्तव्यांना आळा घालण्यासाठी ट्विटरने फारसं काही केलेलं नाही."
 
Committee to Protect Journalist (CPJ) या समितीने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या समितीला असं आढळून आलं की ट्विटरने 'Country Withheld' धोरणांतर्गत भारतातले जवळपास दहा लाख ट्वीट डिलीट केले आणि जवळपास 100 जणांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहेत.
 
एखादं ट्वीट त्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करत असेल किंवा त्या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने ते ट्वीट ब्लॉक करायला सांगितलं तर ट्विटरला संबंधित ट्वीट डिलीट करता येतं आणि संबंधित ट्विटर अकाउंट बंद करता येतं. यालाच ट्विटरचं 'Country Withheld' धोरण म्हणतात.
 
ट्विटरने डिलीट केलेल्या ट्वीट्सपैकी बहुतांश ट्वीट्स हे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात होते आणि केंद्र सरकारच्या विनंतीनंतरच ते डिलीट करण्यात आले, अशी माहिती CPJच्या अहवालात देण्यात आली आहे.
 
नुकतंच मॅस्तडॉनवर अकाउंट सुरू करणाऱ्या पत्रकार निलांजना रॉय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ट्विटरसंबंधीच्या तक्रारी वाढतच आहेत. ट्विटर सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा किंवा तो बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना बळावू लागली आहे. हा गंभीर विषय आहे."
 
अनेक दलित कार्यकर्ते आणि लेखकांनीही ट्विटरच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे अकाउंट्स ट्विटरकडून वारंवार सस्पेंड केले जातात. मात्र, #BoycottAllMuslims यासारखे विखारी हॅशटॅग ट्रेंड होतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
मार्क्सवादी आणि लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य तसंच सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन सांगतात, "दलित, स्त्रिया आणि धार्मिक अल्पसंख्याकांविषयी ट्विटरवर दिसणारा पक्षपातीपणा निंदनीय आहे. याविषयी आपण ट्विटरकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नाही."
 
ट्विटरवर काही स्त्रियांना सतत बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळतात. यावरही ट्वीटरने कारवाई केलेली नाही.
 
निलांजना रॉय म्हणतात, "एक स्त्री म्हणून ट्विटरवर वावरताना आणि एकंदरच स्त्रियांवर होणारे अत्याचार बघून खूप विचित्र वाटतं. सतत असं जाणवतं जणू आपण एका दूषित वातावरणात ढकललो जातोय." त्या पुढे म्हणतात, "यावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते की ट्विटरच्या पलीकडे काही आहे का, याचा शोध सुरू आहे. ते मॅस्तडॉन असू शकतो किंवा इतर काही."
 
मॅस्तडॉन काय आहे?
मॅस्तडॉन एक ओपन सोर्स नेटवर्क आहे. इतर परिचित सोशल नेटवर्किंग साईट्सप्रमाणेच इथेही यूजर्स काहीही पोस्ट करू शकतात, कमेंट करू शकतात, एकमेकांना फॉलो करू शकतात.
 
मात्र, या नेटवर्कचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नेटवर्क ओपन-सोर्स आणि विकेंद्रित (Decentralised) आहे, म्हणजेच कुठलीही एक संस्था किंवा व्यक्ती हे नेटवर्क चालवत नाही.
 
त्याऐवजी यूजर्स स्वतःचं सर्व्हर तयार करून ते चालवतात. याचाच अर्थ हे सोशल नेटवर्क अनेक सर्व्हर्सचं बनलं आहे आणि या प्रत्येक सर्व्हरचे स्वतःचे असे नियम आहेत. यात यूजर्सला त्यांना मान्य असलेल्या पॉलिसीज असणारे सर्व्हर निवडता येतात. ऑक्टोबर 2016 मध्ये मॅस्तडॉनची स्थापना झाली. आपले 22 लाखांहून जास्त यूजर्स असल्याचा मॅस्तडॉनचा दावा आहे. तर ट्विटरचे जगभरात 30 कोटी यूजर्स आहेत.
 
मॅस्तडॉन हा ट्विटरपेक्षा चांगला पर्याय असल्याचं अनेकांनी म्हटलं असलं तरी ते वापरणं वाटतं तितकं सोपं नाही, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मॅस्तडॉन ट्विटरची जागा घेईल, याची शक्यता कमीच आहे. सध्या ट्विटर सोडण्याची जी काही चर्चा सुरू आहे ते 'तात्पुरतं फॅड' असल्याचं काहींचं म्हणणं आहे. हे फॅड फार काळ टिकणार नाही, असंही त्यांना वाटतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments