Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनिल देशमुख: फोन टॅपिंग आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत?

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (17:27 IST)
महाराष्ट्र पोलीस दलात पोस्टिंग आणि बदलीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबाबत 'टेलिफोन इंटरसेप्शन' मधून माहिती मिळाल्याचं, विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत केला.
त्यामुळे गृहमंत्र्यांचे फोन टॅप करण्यात येत होते का? हा प्रश्न उपस्थित झाला.
मंगळवारी या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट 2020मध्ये पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार होत असल्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीसांच्या दाव्याचा विरोध करताना राष्ट्रवादीने म्हटले की रश्मी शुक्ला या अवैध फोन टॅपिंग करायच्या.
या आरोप-प्रत्योरोपानंतर रश्मी शुक्ला चर्चेत आल्या आहेत. त्या कोण आहेत?
 
कोण आहेत रश्मी शुक्ला?
राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी आहेत.
1988 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी (DG) प्रमोशन दिलं. त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली.
 
रश्मी शुक्ला यांची कारकीर्द
हैद्राबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीतून पास आउट झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कॅडर जॉइन केलं. राज्यात विविध ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू केलं. ईटी ह्युमन फोरमच्या मोहितीनुसार त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केली.
नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं.
2016 मध्ये रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 2018 पर्यंत त्या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या.
रश्मी शुक्ला यांना 2004 साली चांगल्या कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदक, 2005 मध्ये उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदक आण् 2013 मध्ये पोलीस मेडल मिळालं आहे.
 
देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केलाय.
नवाब मलिक यांनी शुक्ला "भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात" असा आरोप केलाय.
राजकीय विश्लेषक सांगतात, "रश्मी शुक्ला देवेंद्र फडणीसांच्या खूप जवळच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असते."
शुक्ला 1996 ते 1999 मध्ये नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक होत्या. त्यानंतर 1999-2002 नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं.
नागपूरचे वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे सांगतात, "1990 च्या दशकात रश्मी शुक्ला नागपुरात होत्या. त्यावेळेस फडणवीस राजकारणात नवीन होते. त्यामुळे शुक्ला त्यांच्या जवळच्या असतील असं अजिबात म्हणता येणार नाही."
ते पुढे सांगतात, "शुक्ला यांना देवेंद्र फडणवीसांच्या काळात पुणे आयुक्त पोस्टिंग मिळालं. त्यामुळे परसेप्शन असं तयार झालंय की त्या देवेंद्र यांच्या जवळच्या आहेत."
 
देशमुखांनी लावली होती फोन टॅपिंगची चौकशी
2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं. तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. सरकार येऊन जेमतेम दोन महिने झाले असतील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला.
देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांचा आरोप फेटाळून लावला होता.
"आधीच्या सरकारने स्पायवेअर पिगॅससचा वापर करून अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. हे स्पायवेअर घेण्यासाठी अधिकारी इस्रायलला गेले होते का? याची चौकशी करणार," असं गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.
फेब्रुवारी 2020 मध्ये राज्य सरकारने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती, अनिल देशमुख यांनी दिली होती.
रश्मी शुक्ला यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने अनेक वेळा केला पण त्यांनी यावर अद्याप उत्तर दिले नाही. त्यांचे उत्तर येताच त्यांची बाजू अपडेट करण्यात येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments