Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी करताना अनुराग कश्यपची गफलत

Webdunia
मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (16:54 IST)
अनंत प्रकाश
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी हिटलरचा एक व्हीडिओ शेअर केला. पण हा व्हीडिओ चुकीचा असल्यानं त्यांनी तो तातडीनं डिलीट केला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील रॅलीनंतर सोशल मीडियावर हिटलरचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा समावेश आहे.
 
व्हीडिओत जर्मनीचे तत्कालीन प्रमुख आणि हुकूमशहा अडॉल्फ हिटलर एका स्टेडियममध्ये भाषण करताना दिसत आहेत. व्हीडिओच्या खाली सबटायटल्समध्ये लिहिलं आहे की, तुम्हाला विरोध-द्वेष करायचा असेल तर माझा करा, परंतु जर्मनीचा नको.
 
मोदींच्या भाषणाशी तुलना
हिटलरच्या या भाषणाची तुलना पंतप्रधान मोदी यांनी 22 डिसेंबर रोजी रामलीला मैदानात केलेल्या भाषणाशी केली जात आहे. मोदी यांनी या भाषणात राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता.
 
मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं, 'देशाल्या जनतेनं मोदीला या पदावर बसवलं आहे. हे तुम्हाला आवडलं नसेल तर मोदीला शिव्या द्या. माझा दु:स्वास करा. माझा द्वेष करा. मोदीला जितका विरोध असेल, राग असेल तेवढा व्यक्त करा. माझा पुतळा जाळून जोडे मारा. मात्र देशाच्या संपत्तीचं नुकसान करू नका. गरिबाची रिक्षा आणि घर जाळू नका. तुमचा जो काही राग असेल तो माझ्यावर काढा'.
 
मोदींनी आपल्या भाषणात 'अर्बन नक्षल' शब्दाचादेखील उल्लेख केला. या भाषणानंतर सोमवारी (23 डिसेंबर) अनुराग कश्यपने हिटलरचा व्हीडिओ शेअर करताना त्यांनी 'अर्बन नाझी' शब्दाचा प्रयोग केला.
 
जर्मन महिलेनं उपस्थित केले प्रश्न
अनुराग कश्यपने ट्वीट केल्यानंतर पाच हजारहून अधिक लोकांनी हा व्हीडिओ रीट्वीट केला. याव्यतिरिक्त 13 हजारहून अधिक नेटिझन्सनी या व्हीडिओला लाईक केलं आहे.
 
हा व्हीडिओ शेअर झाल्यानंतर काही वेळातच जर्मन महिलेने या व्हीडिओतील तपशीलाबाबत प्रश्न उपस्थित केले.
 
जर्मनीतील हॅम्बर्ग विद्यापीठात मानसशास्त्राचं अध्ययन करणाऱ्या मारिया रिथ यांनी अनुराग कश्यपच्या ट्वीटला रिप्लाय देताना लिहिलं की, हे पूर्णत: चुकीचं आहे. जर्मन भाषा समजते अशा कोणाला तुम्ही ओळखत नाही का? या भाषणाचा संदर्भ वेगळा आहे. लोकांना जाऊन मदत केल्याचा यात उल्लेख आहे.
 
हा व्हीडिओ आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यांच्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर अनुरागने हा व्हीडिओ डिलीट केला आहे.
 
या व्हीडिओचं सत्य काय?
या व्हीडिओत हिटलर नेमकं काय बोलतो आहे याची पडताळणी करण्यासाठी आम्ही जर्मन भाषेच्या जाणकारांशी बोललो. मात्र हे करणं सोपं नव्हतं कारण जर्मन भाषेतील व्याकरणामुळे 15 सेकंदाची क्लिप ऐकून भाषांतर योग्य आहे की नाही, हा निष्कर्ष काढणं अवघड होतं.
 
हिटलरचं पूर्ण भाषण उपलब्ध आहे का याचा शोध घेण्यात आला. हे भाषण हिटलरने 1936 मध्ये केलं असल्याचं स्पष्ट झालं.
 
दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा विभागातील वरिष्ठ प्राध्यापिका ज्योती सभरवाल यांनी या भाषणाचा अर्थ उलगडून सांगितला.
 
त्यांनी सांगितलं, "हे चुकीचं भाषांतर आहे. माझा द्वेष करा, जर्मनीचा नको असं हिटलर या भाषणात म्हणालेला नाही. या भाषणात हिटलर एकमेकांना मदत करण्याबाबत बोलतो आहे.
 
या भाषणात मांडलेल्या ऐतिहासिक गोष्टींचं महत्त्व समजून घेण्यासाठी ज्येष्ठ जर्मन पत्रकार अन्वर अशफर यांच्याशी आम्ही बातचीत केली.
 
अन्वर अशरफ यांनी ज्योती सभरवाल यांनी मांडलेल्या मताला दुजोरा दिला. हिटलरने जर्मन लोकांना एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
 
व्हीडिओचा केलेला अनुवाद आणि हिटलरचं भाषण याच्यात साधर्म्य नाही. मोदींच्या भाषणाशी याची तुलना करता येणार नाही. मात्र या भाषणातले मुद्दे समजून घेण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे.
 
या भाषणात द्वेष, राग, प्रेम, आपुलकी यांचा मुद्दा मांडण्यात आलेला नाही. हिटलर बंधुभावाबद्दल बोलत आहेत. जर्मनीच्या नागरिकांनी पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकमेकांना मदत करावी, असं हिटलर या भाषणात म्हणाला होता.
 
जर्मनीत थंडीच्या काळात तापमान खूप कमी होतं. गोरगरीब जनतेसाठी असं वातावरण जीवघेणं ठरू शकतं. कारण त्यांच्याकडे पुरेसे गरम कपडे असतीलच असं नाही. हिटलर हे भाषण आपल्या पक्षाची धर्मादाय संस्था 'विंटर हिल्सबर्ग'साठी करत होते. थंडीच्या काळात जर्मनवासीयांना चादरी, अंथरुण, स्वेटर, जर्कीन यांचं कमतरता भासायला नको. यासाठी समाजातील धनाढ्य व्यक्तींनी पुढाकार घेत एकमेकांना मदत करायचं आवाहन हिटलरने केलं होतं.
 
पूर्वग्रह मनात असताना एकमेकांसाठी काम करणं कठीण आहे. म्हणूनच मनातले पूर्वग्रह दूर सारा आणि निखळ मनाने एकमेकांना मदत करा. लोकांमध्ये वावरा आणि मदत करा,असं हिटलरनं या भाषणात म्हटलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments