Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. आंबेडकर जयंती: जेव्हा राम मंदिरात प्रवेशासाठी बाबासाहेबांनी दगडांचा वर्षाव सहन केला...

DescriptionBhimrao Ramji Ambedkar
, रविवार, 14 एप्रिल 2019 (09:23 IST)
-तुषार कुलकर्णी
तो रामनवमीचा दिवस होता. प्रभू श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी आतूर झालेले तरुण रथाची वाट पाहत उभे होते. तेव्हाच हलकल्लोळ उडाला. काही लोकांनी तो रथ पळवला. वाट पाहणारे तरुण त्या रथामागे धावले. तितक्यात त्या तरुणांवर आणि त्यांच्या नेत्यावर दगडधोंड्यांचा वर्षाव सुरू झाला.
 
या प्रसंगाला आता 89 वर्षं उलटली. हा रथ होता नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरातल्या रामाचा आणि हा नेता म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
 
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंनाच जागं करण्यासाठी नव्हे तर त्यावेळचे सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 ला सुरू झाला आणि पुढं पाच वर्षं चालला.
 
गोदाकाठी वसलेलं नाशिक हा सनातनी हिंदूंचा गड समजला जायचा. त्याच नाशिकातल्या काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला. डॉ. आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉ. आंबेडकरांनी केला."
 
तो काळ होता इंग्रजांच्या गुलामगिरीचा. इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती. तर धर्ममार्तंडशाहीविरोधात डॉ. आंबेडकरांनी दंड थोपटले होते. कीर पुढे लिहितात, "आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."
 
अभूतपूर्व मिरवणूक
नाशिक शहराने यापूर्वी कधीही पाहिली नसेल अशी मिरवणूक त्या दिवशी पाहिली. 2 मार्च रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये परिषद भरली. त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती आणि त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
 
'श्रीराम जयराम'च्या जयघोषात ही मिरवणूक निघाली होती, असं कीर सांगतात. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथं एक भव्य सभा झाली.
 
दुसऱ्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत 125 पुरुष आणि 25 स्त्रिया जातील, असं ठरलं. मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता.
 
पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग 9 एप्रिल 1930 अर्थात रामनवमीचा दिवस उजाडला. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असं ठरलं की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले.
 
पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता.
 
अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. आंबेडकरांवर दगडं पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पण त्यांना जखम झाली होती. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता. नंतर त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ. आंबेडकरांनी पत्रात लिहिलं आहे.
 
"सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असं धनंजय कीर यांनी लिहिलं आहे.
 
दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावं लागलं. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरं खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.
 
या लढ्याने काय साध्य केलं?
आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केलं? असं विचारलं असता अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं.
 
आंबेडकरांचा हा लढा फक्त नाशिक पुरताच मर्यादित नव्हता तर त्या आधी अमरावती येथे देखील मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात आला होते. जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न विचारला जात होता.
 
या प्रश्नाचं उत्तर डॉ. आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिलं आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या 'संघर्ष महामानवाचा' या पुस्तकात डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा अंश देण्यात आला आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही."
 
पुढे डॉ. आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."
 
आंबेडकरांच्या सत्याग्रहाचं एक वैशिष्ट्यं होतं म्हणजे सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलनं अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर त्यांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असं ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचं आंदोलन स्थगित केलं.
 
सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे सांगतात.
 
'हा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही'
शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. 1933 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती. यावेळी गांधी यांनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.
 
(संदर्भ- डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक भारतीय परराष्ट्र खाते)
 
डॉ. आंबेडकरांनी महात्मा गांधी यांना आपली मंदिर प्रवेशाबाबतची भूमिका सांगितली होती. ते गांधीजींना म्हणाले होते, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचं निर्दालन होणं आवश्यक आहे. जातीव्यवस्थेचं समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."
 
'हिंदू हे शोषितांना मानव म्हणून स्वीकारतील का?'
काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी सवर्णांना केलेलं एक आवाहन होतं. 2 मार्च 1930 रोजी त्यांनी जे भाषण केलं होतं ते केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नव्हतं तर
सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारं होतं. हे भाषण डॉ. आंबेडकर यांची भाषणं आणि पत्रं (प्रकाशक- परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, भाग 17) मध्ये आजही वाचायला मिळतं.
 
ते म्हणाले होते, "आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत.
 
"काळाराम मंदिरात प्रवेश करणं म्हणजे हिंदू मनाला केलेलं आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवलं. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दलित मतं या लोकसभा निवडणुकीत कुणाकडे जातील?