- प्राजक्ता पोळ
"देशातील सगळे लोक संपून गेले आहेत. जे उरले आहेत ते सुद्धा संपून जातील. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहीलो तर सर्व प्रादेशिक पक्ष संपून फक्त भाजपच अस्तित्व राहीलं," भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेलं हे विधान आहे. यावेळी महाराष्ट्रात शिवसेना संपल्याचा त्यांनी उल्लेखही केला. संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी "मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोक निघून गेले तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत आणि मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही" असं विधान केलं. त्यानंतर त्यांनी आता माफासुद्धा मागितली आहे.
त्यावेळी राज्यपालांच्या विधानाशी भाजप सहमत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावं लागलं.
"कोश्यारी जरी राज्यपाल असले तरी ते एकेकाळी भाजपचे मुख्यमंत्री होते त्यामुळे या भाजपचे प्रतिनिधी म्हणूनच लोक त्यांना समजतात, पण त्यांनी माफी मागितली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
शिवसेनेवर ओढावलेल्या सध्याच्या स्थितीत कोश्यारी आणि नड्डांच्या विधानांचा उध्दव ठाकरेंना सहानुभूती मिळण्यासाठी उपयोग होईल का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...
नड्डा आणि कोश्यारींच्या वक्तव्याचा अर्थ काय?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिहारला 14 जिल्ह्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. याच कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी प्रादेशिक पक्ष कसे संपत चालले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना सुद्धा कशी संपत आली आहे याचा उल्लेख केला.
"दिवस हे सर्वदा सारखे नसतात, दिवस एकदा का फिरले की तुमचं काय होईल याचासुद्धा विचार भाजप आणि नड्डासाहेबांनी करण्याची आवश्यकता आहे," असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी नड्ड् यांच्या या विधानावर दिलंय.
भाजपची केंद्रात आणि बहुतांश राज्यात सत्ता आहे. पक्षाची बांधणी टिकवून ठेवणं, स्वतः चा पक्ष वाढवणं याबाबत बोलणं स्वाभाविक आहे. पण प्रादेशिक पक्ष संपतील हे बोलणं गरजेचं होतं का?
याबाबत बोलताना जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपलाच पक्ष कसा वाढेल हे बोलणं स्वाभाविक आहे, पण दुसरे पक्ष संपतील हे उद्गार मात्र अनावश्यक होते. तक कोश्यारींना फारसं गांभीर्याने कोणी घेत नाही. त्याचबरोबर त्यांनी माफी मागितल्यामुळे हा विषय फार लांबेल असं वाटत नाही. पण भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांच्यातला एक अहंकार वाढलाय हा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो."
पण उध्दव ठाकरेंना आता त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? याबाबत बोलताना मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात.
"काही महिन्यांमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना आत्ता उरलेल्या संघटनेतून याचा कितपत फायदा करून घेता येईल हे येणारा काळ सांगू शकेल ठाकरेंकडे उरलेली संघटना ही सक्रिय करण्यासाठी तितकसं मनुष्यबळ आहे का याचाही विचार करावा लागेल. पण जर ठाकरेंनी ठरवलं तर याचा फायदा त्यांना करवून घेता येऊ शकतो."
'या' वक्तव्यांमुळे शिवसेनेला मिळालं होत जीवदान...!
गेली 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने वर्चस्व टिकवून ठेवलं आहे. अनेक वर्षं मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या आधी मराठी माणूस, मुंबईचं अस्तित्व, परप्रांतीयांनी मुंबईवर केलेला कब्जा, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव अश्या अनेक भावनिक मुद्यांना शिवसेनेने हात घातला.
त्याचा फायदाही मतांच्या रूपाने शिवसेनेला मिळाला. हे मुद्दे मागे टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या विरोधी पक्षांनी कायम केला. पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही.
सध्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंचं सर्वांत मोठं बंड, त्यामुळे शिवसेनेला पडलेलं खिंडार, शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांची अटक, या परिस्थितीत भाजप नेत्यांची वक्तव्य उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या जीवदान देण्याचं काम करतायेत का?
याबाबत बोलताना लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "1985 साली मुंबई स्वायत्त करण्याबाबत वसंतदादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता.
त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरे यांचं प्रभावशाली राजकारणातलं वर्चस्व पुढच्या निवडणुकांपर्यंत संपलेलं असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतरही शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे हा फायदा शिवसेनेला पुन्हा होणं नाकारता येत नाही."
पण तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत बराच फरक आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे कितपत शक्य आहे?
याबाबत पुढे बोलताना संदीप प्रधान सांगतात, "ही दोन्ही उदाहरणं हे बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची आहेत. 1985 साली वसंतदादा पाटील यांच्या वक्तव्याचा राजकीय फायदा बाळासाहेब ठाकरे यांनी करून घेतला. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान दिल्यानंतर तळागाळातील शिवसैनिक पेटून उठला. पण आताच्या परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत.
"उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या संघटनेला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे ती संघटना सक्रिय करण्यात उद्धव ठाकरे कितपत यशस्वी होतील? शिवसेनेने हिंदूत्व सोडलं आणि महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं. या आरोपांवर तळागाळातील शिवसेनेचा मतदार कसा प्रतिक्रिया देईल हे येणार्या निवडणुकीत मतपेटीतून कळेल. "