Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराजवर होता 20 हून अधिक हत्यांचा आरोप; पण ना त्या सिद्ध झाल्या, ना त्याला शिक्षा

'Bikini Killer' Charles Sobhraj was accused of more than 20 murders; But they were not proved
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:47 IST)
- अमृता कदम
हर्मन निपेनबर्ग हे बँकॉकमधल्या डच एम्बसीमध्ये थर्ड सेक्रेटरी पदावर होते. एका परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याचं आयुष्य जसं असेल, तसंच त्यांचंही सुरू होतं. पण फेब्रुवारी 1976 मध्ये आलेल्या एका पत्रानं त्यांच्या या शांत आयुष्यात खळबळ उडाली.
 
हॉलंडमधून त्यांना एक पत्र आलं. या पत्रात 'हिप्पी ट्रेल' वरून प्रवास करणारे दोन डच लोक गायब झाल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आठवड्यांपासून त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे ते चिंतेत होते.
 
खरंतर हर्मनच्या कामाच्या स्वरूपात असा कोणाचा शोध घेणं बसत नव्हतं, पण त्यांनी कर्तव्यबुद्धीनं या प्रकरणाची दखल घेतली.
 
या घटनेच्या दोनच आठवडे आधी बँकॉकपासून 80 किलोमीटर अंतरावर दोन जळालेले मृतदेह सापडले होते. ऑस्ट्रेलियन प्रवाशांचे हे मृतदेह असल्याचं सुरुवातीला म्हटलं गेलं. पण नंतर हे ऑस्ट्रेलियन जिवंत असल्याचंही समोर आलं. त्यामुळे हर्मन यांना हे दोन मृतदेह त्या गायब असलेल्या डच लोकांचे तर नाहीत असं वाटलं?
 
एका डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी पुन्हा त्या मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची शंका खरी ठरली.
 
हे दोघेच नाही तर इतरही काही परदेशी नागरिक असेच रहस्यमय पद्धतीनं गायब झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.
 
आपल्या ओळखींचा वापर ते करत गेले आणि या सगळ्या परदेशी नागरिकांमधला एक समान दुवा त्यांच्या लक्षात आला- अॅलन गॉटिए. तो फ्रेंच होता...खड्यांचा व्यापारी होता.
 
पण ही ओळखही फसवी होती. ही व्यक्ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहात होती, तिथे अनेक पासपोर्ट होते. अशाच गायब झालेल्या प्रवाशांचेच ते असावेत...
 
हा सगळा माग काढत, काढत निपेनबर्ग यांनी थाई अधिकाऱ्यांना सूचना दिली. अधिकारी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. त्यांनी तिथून अलन गॉटिए किंवा तो जो कोणी होता त्याला ताब्यात घेतलं...
 
पण ज्याला पोलिसांनी पकडलं होतं तोही तयारीत होता...त्याने आपण अमेरिकन नागरिक असल्याचं सांगितलं. कोणाकडून तरी चोरलेल्या पासपोर्टवर त्यानं आपला फोटो लावला होता आणि स्वतःची ओळख सफाईदारपणे लपवली होती. त्याला सोडून देण्याशिवाय थायलंडच्या पोलिसांकडे पर्याय नव्हता.
 
केवळ थायलंडच्याच नाही, तर जगातील अनेक देशांच्या पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात हा माणूस यशस्वी ठरला होता... बॉलिवूडमध्ये असता तर त्यानं 'दुनिया की किसी जेल की दिवार इतनी उँची नहीं की मुझे रोक सके' असा डायलॉग त्यानं नक्कीच मारला असता. पोलिसांना चकवून, तुरुंगातून पळून जाण्यात हा गुन्हेगार इतका सराईत होता की 'द सर्पंट' (साप) अशीही त्याची ओळख होती.
 
तो चोर होता, कॉनमॅन होता आणि खुनीही...अनेक देशांच्या पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड होता...तो चार्ल्स शोभराज होता...
 
चार्ल्स शोभराज हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
 
बुधवारी (21 डिसेंबर) नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सीरियल किलर चार्ल्स शोभराज याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
 
त्याचं वय आणि त्याला असलेल्या शारीरिक व्याधींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं बीबीसी नेपाळीने म्हटलं आहे. चार्ल्स शोभराजचं वय 78 वर्षांचं आहे आणि त्याला हृदयविकाराचा त्रास आहे.
 
दोन अमेरिकन प्रवाशांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेला चार्ल्स शोभराज 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे.
 
सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याने प्रत्यार्पण करावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
चार्ल्स शोभराजवर भारत, थायलंड, नेपाळ, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक हत्यांचा आरोप होता. मात्र ऑगस्ट 2004 च्या आधी त्याला कोणत्याही प्रकरणात दोषी ठरविण्यात आलं नव्हतं.
 
एकतर तो तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी व्हायचा किंवा मग अधिकाऱ्यांना लाच देऊन तुरुंगातच सगळ्या सुविधा मिळवायचा.
 
भारतासोबतच अफगाणिस्तान, ग्रीस आणि इराणमधल्या तुरुंगातूनही शोभराज अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता.
 
फ्रान्सच्या पर्यटकांना विष देण्याच्या प्रकरणात त्याने भारताच्या तुरुंगात जवळपास 20 वर्षांची शिक्षा भोगली होती.
 
चार्ल्स शोभराजचा जन्म 6 एप्रिल 1944 साली व्हिएतनामच्या सायगॉनमध्ये झाला.
 
त्याची आई व्हिएतनामची होती आणि वडील भारतीय होते. त्याच्या वडिलांनी त्याचा स्वीकार करायला नकार दिला होता.
 
आपल्या वडिलांनी नाकारल्याचा राग त्याला कायम होता.
 
त्यानं आपल्या डायरीत लिहिलं होतं, "तुम्ही वडील असण्याचं कर्तव्य नीट पार पाडलं नाही, याचा तुम्हाला पश्चाताप होईल...मी ते जाणवून देईन."
 
त्याकाळी व्हिएतनामवर फ्रान्सचा ताबा होता. एकप्रकारे फ्रान्सच्या वसाहतीमध्येच जन्म झाल्यामुळे त्याला फ्रेंच नागरिकत्व मिळालं.
 
त्याच्या आईने नंतर एका फ्रेंच अधिकाऱ्याशी लग्न केलं. त्यानंतर तो कधी इंडोचायना भागात तर कधी फ्रान्समध्ये राहायचा.
 
गुन्हेगारी वर्तुळात प्रवेश
युरोपात छोट्यामोठ्या चोऱ्या करत त्यानं गुन्हेगारी जगात प्रवेश केला. 1963 मध्ये पॅरिसमध्ये चोरीसाठी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्यानंतरही त्याला एकदा अटक झाली.
 
त्यानं पॅरिसमधल्या एका महिलेसोबत लग्न केलं. चोऱ्या आणि तस्करीसारखे गुन्हे करत हे दोघं युरोपमध्ये फिरत होते.
 
सशस्त्र दरोड्याच्या आरोपामध्ये तुरुंगात असलेला चार्ल्स पळून जाण्यात यशस्वी ठरला. नंतर तो आशियामध्ये आला
 
त्यानंतर त्यांनी 'हिप्पी ट्रेल'वर असलेल्या प्रवाशांना लुटायला सुरूवात केली.
 
हा तो काळ होता जेव्हा पाश्चात्य जगातील तरूणांमध्ये हिप्पी कल्चरची सुरूवात झाली होती. हे हिप्पी तरूण ज्या मार्गावरून प्रवास करायचे तो होता हिप्पी ट्रेल. टर्की, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, थायलंड, नेपाळ असा प्रवास हे लोक करायचे.
 
आपण ज्यापद्धतीने हिप्पी कल्चरकडे पाहतो, त्यात कदाचित थोडा पूर्वग्रह असतो. पण त्याकाळी लाँग डिस्टन्स प्रवास, बॅग पॅकिंग, ट्रेकिंग या गोष्टी तितक्या सामान्य नव्हत्या. त्यामुळे तरूणांना ते थ्रिलिंग वाटायचं. म्हणून अधिकाधिक लोक अशा भटकंतीला बाहेर पडायचे.
 
चार्ल्स आणि त्याची बायको याच लोकांना निशाणा बनवायचे. नंतर चार्ल्सला त्याची बायको सोडून गेली आणि तो त्याची प्रेयसी मेरी लीक्लर्कसोबत हेच गुन्हे करत राहिला. मेरीने नंतर आपल्याला चार्ल्सने केलेल्या खुनांबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं.
 
चार्ल्स वेशांतर करण्यात पटाईत होता. त्याला फ्रेंच, इंग्रजी उत्तम यायचं. त्याचं व्यक्तिमत्त्व भुरळ घालणारं होतं.
 
बीबीसीच्या 'बॅड पीपल' या पॉडकास्टमध्ये चार्ल्स स्वतःची ओळख जेम डीलर करून द्यायचा असं म्हटलं आहे. 'मी जेम डीलर आहे, तुम्हाला अतिशय स्वस्तात मौल्यवान खडे विकतो. तुम्ही ते तुमच्या देशात विकून नेऊन विकू शकता, फायदा कमवू शकता,' असं तो सांगायचा.
 
तो परदेशी पर्यटकांशी सहज मैत्री करायचा, त्यांना कुठे फिरायला जायचं हे सांगायचा, त्यांच्यासोबतही जायचा.
 
पण नंतर त्याच्यासोबत गेलेल्या लोकांना त्रास व्हायला लागायचा...गुंगी यायची-पोट बिघडायचं...जेव्हा ते जागे व्हायचे तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की त्यांच्या सगळ्या मौल्यवान वस्तू, पासपोर्ट गायब आहेत.
 
काही लोक तर कधी जागेच व्हायचे नाहीत...
 
बिकिनी किलर
चार्ल्स शोभराजने 1972-1976 या काळात 12 जणांच्या हत्या केल्याचा संशय होता. काहींना त्याने दिलेल्या ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू आला, काहींना त्यानं बुडवून मारलं, काहींना भोसकून तर काहींना गॅसोलिन टाकून पेटवूनही दिलं...
 
पण त्याने नेमक्या किती आणि कोणाकोणाच्या हत्या केल्या हे ना उघड झालं...ना सिद्ध.
 
ऑस्ट्रेलियन पत्रकार ज्युली क्लार्क आणि त्यांचे दिवंगत पती रिचर्ड नेव्हिल यांनी 'लाइफ अँड क्राइम्स ऑफ चार्ल्स शोभराज' हे पुस्तक लिहिलं आहे. शोभराजला दिल्लीत अटक झाली होती, तेव्हा त्यांनी त्याच्याशी बोलून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.
 
या पुस्तकाबद्दल, चार्ल्स शोभराजसोबतच्या भेटींबद्दल ज्युली यांनी बीबीसीच्या बॅड पीपल या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
 
'चार्ल्सने जो करार केला होता, त्यात तो आपल्या गुन्ह्यांबद्दल सांगेल असं म्हटलं होतं. सुरुवातीला त्यानं तो लोकांना फसवून, ड्रग्ज देऊन त्यांचे पैसे-कागदपत्रं कशी लुबाडायचा हे सांगितलं होतं. मग त्यानं खुनांबद्दल सांगायला सुरुवात केली. आम्ही आमच्या खोलीत येऊन त्याच्यासोबतचं संभाषण ऐकायचो, तेव्हा जाणवायचं की त्याला त्याच्या कृत्यांबद्दल काहीच वाटत नाहीये. तो सहज होता किंबहुना त्याला त्याच्या कृतींचा अभिमानच असल्याचं वाटायचं. तो तात्विक चर्चाही करायचा,' ज्युली सांगतात.
 
या पुस्तकातील माहितीनुसार चार्ल्सने पहिली हत्या 1972 मध्ये एका पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हरची केली होती. (त्याने या हत्या केल्याचं नंतर नाकारलं.)
 
थायलंडमध्ये त्याने एकाहून अधिक हत्या केल्याचा संशय होता. यामध्ये अमेरिकन, फ्रेंच, तुर्की, डच नागरिकांचा समावेश होता.
 
पटायातल्या बीचवर 1975 साली एका अमेरिकन महिलेचा स्विमसूटमधला मृतदेह मिळाला होता. त्यावरून तो 'बिकिनी किलर' या नावाने कुख्यात झाला.
 
त्याच्या या सगळ्या कृष्णकृत्यांचा सुगावा सुरुवातीला उल्लेख केलेल्या घटनेमुळे हर्मन निपेनबर्ग यांना लागला होता. जरी त्यावेळी शोभराज स्वतःला अमेरिकन सिद्ध करून थायलंडमधून निसटला असला तरी हर्मन शांत राहिले नव्हते.
 
5 मे 1976 ला हर्मन निपेनबर्ग यांनी माध्यमांसमोर येऊन काही गोष्टींचा खुलासा केला. 'बिकिनी किलर'च्या हेडलाइन जगभरातल्या वर्तमानपत्रात यायला लागल्या होत्या...
 
त्यावेळी फ्रान्समध्ये असलेल्या शोभराजने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 
दिल्लीमध्ये अटक
1976 च्या जुलै महिन्यात चार्ल्स शोभराज दिल्लीत आला.
 
तो आणि त्याच्या सोबत असलेल्या तीन महिलांनी काही फ्रेंच विद्यार्थ्यांना आपल्याला टूर गाइड म्हणून घेण्यासाठी राजी केलं. त्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांना गुंगीच्या गोळ्या दिल्या.
 
सुदैवाने काही विद्यार्थ्यांना पोलिसांशी संपर्क साधण्यात यश आलं. शोभराजला दिल्लीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर खटला चालला आणि बारा वर्षांची शिक्षाही झाली.
 
त्यावेळी तिहार जेलचे जेपी नैथानी यांनी द इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलं होतं, "मी त्याला जेलमध्ये वेगवेगळ्या मूडमध्ये पाहिलं होतं. स्थानिक न्यायालयात कायदेशीर लढाई लढताना, पत्रकारांशी आणि वकिलांशी बोलताना, त्याच्या पुस्कावर काम करताना. त्याला भेटायला अनेक महिला यायच्या. त्यांपैकी काहीजण आपलं त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगायच्या आणि काहीजणी तर त्याच्याशी लग्न करायची इच्छाही बोलून दाखवायच्या."
 
तिहार जेलमधल्या शिक्षेची दहा वर्षं पूर्ण झाल्यावर त्यानं तिथून पोबारा करण्याची योजना आखली.
 
तुरुंगातली पार्टी
16 मार्च 1976 ला शोभराज तिहार जेलमधून निसटला.
 
शोभराजने तुरुंगात पार्टी दिली होती. त्यानं या पार्टीला कैद्यांसोबतच गार्ड्सनाही बोलावलं.
 
पार्टीत वाटलेल्या बिस्कीट आणि द्राक्षांत झोपेचं औषध मिसळलं होतं. ते खाल्ल्यावर थोड्याच वेळात शोभराज आणि त्याच्यासोबत जेलमधून निसटलेले चार लोक सोडता सगळे लोक बेशुद्ध झाले.
 
आपण पळून जाऊ शकतो याचा शोभराजला इतका ठाम विश्वास होता की, त्याने जेलमधून बाहेर आल्यावर गेटवर उभं राहून फोटोही काढून घेतला होता.
 
रिचर्ड नेव्हिल यांच्या बायोग्राफीमध्ये चार्ल्स शोभराजने म्हटलं आहे, "जोपर्यंत माझ्याकडे लोकांशी बोलण्याची संधी आहे, तोपर्यंत मी त्यांना सहज भुलवू शकतो."
 
तिहार जेलमध्ये दहा वर्षांची शिक्षा संपत असतानाच शोभराजने पळून जाण्याचा डाव आखला कारण आपल्याला पुन्हा पकडलं जावं आणि खटला चालवावा अशी त्याची इच्छा होती.
 
झालंही तसंच...
 
'हॅलो चार्ल्स, हाऊ आर यू?'
खून आणि इतर गुन्ह्यांसाठी ज्याच्या मागावर सात देशांचे पोलिस होते, जो तिहार जेलसारख्या हाय सिक्युरिटी तुरुंगातून पळाला होता, तो शोभराज आपला वाढदिवस साजरा करायला गोव्याला पोहोचला.
 
पर्वरी येथील 'ओ कोकेरो' या हॉटेलमध्ये तो होता. त्याच्यासोबत डेव्हिड हॉल नावाची व्यक्ती होती.
 
याच हॉटेलमध्ये मधुकर झेंडे त्यांच्या सहकाऱ्यांसह साध्या वेशात ग्राहक म्हणून गेले होते.
 
महाराष्ट्राचे तत्कालिन पोलिस महासंचालक सूर्यकांत जोग यांनी या मोहिमेविषयी नंतर माध्यमांना माहिती दिली होती.
 
मुंबईचे माजी सहायक पोलिस आयुक्त मधुकर झेंडे यांनी एका कार चोरीच्या प्रकरणात चार्ल्स शोभराजला 1971 सालीही अटक केली होती. तेच पुन्हा गोव्यात त्याला पकडण्यासाठी पोहोचले होते.
 
ते त्याच्या टेबलजवळ गेले आणि त्यांनी म्हटलं की, 'हॅलो चार्ल्स, हाऊ आर यू? तुझ्यासोबत डेव्हिड आहे ना?'
 
चार्ल्सनं म्हटलं की, 'तुम्हाला वेड लागलंय का? भारतीय लोकांना परदेशी नागरिकांशी कसं वागायचं हे कळत नाही.'
 
पण नंतर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं.
 
त्यानं स्वतःची हेअरस्टाईल बदलली होती, दाढी वाढवली होती.
 
पोलिसांनी 29 मार्चला अजय सिंह तोमर नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. तो तिहारमधून पळाला होता. त्याने शोभराज पनवेलमधल्या एका हॉटेलमध्ये असल्याचं सांगितलं होतं. पोलिस पनवेलच्या हॉटेलमध्ये पोहोचले, पण तिथून तो गोव्यासाठी निघाला होता.
 
गोव्यात पकडला गेल्यानंतर त्याच्यावर पुन्हा खटला चालला आणि त्याची शिक्षा वाढवली गेली.
 
बारा वर्षांची शिक्षा संपत आली असताना पळून जाऊन पकडलं जाणं ही चार्ल्सने जाणूनबुजून केलेली खेळी असल्याचंही म्हटलं गेलं. याचं कारण म्हणजे असं झालं असतं तर तो थायलंडमधील प्रत्यार्पणापासून बचावला असता. थायलंडमध्ये त्याच्यावर पाच हत्यांचा आरोप होता आणि त्याला फाशीची शिक्षा होईल हे जवळपास निश्चित होतं.
 
1997 मध्ये जेव्हा त्याची सुटका झाली, तेव्हा बँकॉकमध्ये त्याच्यावर खटला चालविण्याची कालमर्यादा संपली होती. भारताने 1997 मध्ये त्याचं फ्रान्सकडे प्रत्यार्पण केलं.
 
नेपाळमध्ये अटक, खटला आणि शिक्षा
2003 साली चार्ल्स शोभराज नेपाळमध्ये परतला. यावेळेस तो अधिकच निर्धास्त होऊन आला होता. त्याने तिथे माध्यमांशी संवादही साधला.
 
खरंतर त्याने काठमांडूला येणं हा आश्चर्यकारक निर्णय होता. कारण नेपाळ हा एकमेव देश होता जिथे तो अजूनही वाँटेड होता.
 
नेपाळ पोलिसांनी त्याला काठमांडूमधल्या एका कसिनोमधून अटक केली.
 
त्याच्यावर 1975 साली कॅनेडियन पर्यटक लॉरेन कॅरिएच्या हत्येचा आरोप होता. त्याची अमेरिकन मैत्रीण कोनी जो ब्रोनिकचीही त्याने हत्या केल्याचा आरोप होता.
 
2004 साली त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.
 
नेपाळच्या तुरुंगातून त्याने एक इंटरव्हयू दिला होता. तुरुंगातून त्याने इंटरव्ह्यू दिलाच कसा यावरून बराच गदारोळ झाला होता.
 
चार्ल्सला नेपाळमध्ये शिक्षा झाली, पण बाकी देशात त्याने केलेल्या गुन्ह्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
 
त्याने ज्या हत्या केल्या त्यामागचं कारणही कधी कळलं नाही.
 
'लाइफ अँड क्राइम्स ऑफ चार्ल्स शोभराज' या पुस्तकाच्या लेखकाशी बोलताना त्याने 'मी कधीच चांगल्या लोकांना मारलं नाही' असं म्हटलं.
 
'त्यानं ज्या हत्या केल्या ते बहुतांशी हिप्पी किंवा बॅगपॅकर्स, परदेशी पर्यटक होते. म्हणजेच त्याच्यादृष्टिने ते जगाच्या दृष्टिने ओवाळून टाकलेले, वाया गेलेले असे होतं,' असं नेटफ्लिक्स आणि बीबीसीवरील ड्रामा सीरिज 'द सर्पंट'च्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या पॉल टेस्टर यांनी 'बॅड पीपल' मध्ये म्हटलं होतं.
 
पण त्याच्या गुन्ह्यांमागचं कारण उलगडायला हे उत्तर पुरेसं नाहीये, हे त्यांनाही माहीत होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्य रेल्वेने असा कमवला २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल