Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो का? लक्षणं कोणती?

Can bird flu
, मंगळवार, 12 जानेवारी 2021 (13:23 IST)
दीपाली जगताप
महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाला आत्तापर्यंत 1600च्या वर पक्षी मृत झाल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, ठाणे आणि दापोलीत पक्षांमध्ये 'बर्ड फ्लू' चा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालंय.
 
पशुसंवर्धन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीत 843 मृत कोंबड्या, ठाण्यात बगळे आणि इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे अहवाल एच5एन1 आणि बीडमधल्या 11 कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपळहून अजून यायचे आहेत.
 
पशुसंवर्धन विभागाने 7 जानेवारीपासून यासंदर्भात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
 
राज्यात मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातही असंख्य प्रश्न आहेत.
 
बर्ड फ्लूचा माणसांना धोका आहे का? चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का? बर्ड फ्लू माणसाला होऊ शकतो का? लहान मुलं किंवा वृद्ध नागरिकांना बर्ड फ्लूचा धोका आहे का? बर्ड फ्लू माणसाला झाल्यास त्याची लक्षणं कोणती? आणि नेमकी काय खबरदारी घ्यावी? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहेत. या सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
बर्ड फ्लूची लागण माणसांना होऊ शकते का?
बर्ड फ्लू हा पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. H5N1,H5N8 सह बर्ड फ्लूच्या व्हायरसच्या आठ प्रजाती आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे या आजाराचा संसर्ग होतो. याला एव्हियन एनफ्लूएन्झा म्हणतात.
 
पक्ष्यांमध्ये आढळणारा हा बर्ड फ्लू माणसांना होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना वैद्यकीय तज्ज्ञांनी काय सांगितले पाहूयात,
 
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एनफ्लूएन्झा विषाणूचं नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी. बदक आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. या पाणपक्ष्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतड्याला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान आहेत. नंतर या मूळ यजमानाकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबड्या किंवा डुक्कर यांच्याकडे प्रवास होतो आणि तेथून मग तो माणसाकडे येतो. आतापर्यंत जगभरात बर्ड फ्लूची लागण झालेल्या माणसांची संख्या सातशेच्या आसपास आहे."
 
महाराष्ट्रात आतापर्यंत कोंबड्या, बगळे, आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे.
 
इंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बर्ड फ्लूच्या आठ प्रजाती आहेत. H5N8 या प्रजातीच्या बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांमध्ये होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. H5N1 ही सुद्धा बर्ड फ्लूची एक प्रजाती आहे. याचा माणसांना तुलनेने अधिक धोका संभवतो."
 
यापूर्वी कधी बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांमार्फत माणसांमध्ये झाल्याचं आढळलं आहे का?
 
यासंदर्भात बोलताना मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
 
"बर्ड फ्लूची लागण माणसांना होण्याची शक्यता कमी आहे. 2006 मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला होता. त्यानंतर अनेकदा भारतात बर्ड फ्लूची साथ आली. पण माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. जगात 40-45 लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला. यात 39 लोक एकट्या इजिप्तमधले होते."
 
ते पुढे सांगतात, "बर्ड फ्लूमध्ये जनुकीय बदल झाल्यास नवा विषाणू तयार होतो. यातून तयार झालेल्या विषाणूचे गुणधर्म सांगणं सध्या कठिण आहे."
कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूच्या विषाणूची तुलना करत डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "कोरोना हा व्हायरस माणसांमध्ये वेगाने पसरतो. पण बर्ड फ्लूची लागण माणसांमध्ये होणं दुर्मिळ आहे. पण कोरोनाच्या तुलनेत बर्ड फ्लूचा मृत्यू दर अधिक आहे. बर्ड फ्लूमुळे माणसांचा मृत्यू होण्याचा दर 60 टक्के आहे."
 
बर्ड फ्लूचा विषाणू मानवी शरीरात कसा प्रवेश करू शकतो?
 
इतर विषाणू माणसाच्या शरीरात नाक आणि तोंडाद्वारे प्रवेश करतात आणि श्वसन इंद्रियांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतो.
 
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमधून माणसांत नाक आणि तोंडावाटे होऊ शकतो. कोंबडी किंवा इतर पक्षी शिंकत किंवा खोकत नसले तरी कोंबडीच्या नाकातून, तोंडातून द्रव निघत असतो. त्याच्याशी माणसाचा संपर्क आला आणि माणसाच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे द्रव शरीरात गेल्यास बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. तसंच पक्ष्यांच्या विष्ठेवाटेही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांमधील संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जे लोक एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलं.
चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का?
"चिकन किंवा अंडी खाणार असाल तर अर्धा तास शिजवल्यानंतरच खा," असं आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केलं आहे.
 
यासंदर्भात बोलताना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजित रानडे सांगतात, "चिकन किंवा अंडी खाणं बंद करणं मुर्खपणाचे ठरेल. कारण आपण मांसाहार पूर्ण शिजवून खातो. त्या तापमानाला हा विषाणू जिवंत राहू शकत नाही. स्वच्छता राखावी आणि शिजलेले अन्न खावं."
 
पण चिकन शिजवण्यापूर्वी संसर्गाचा धोका कायम राहतो असं डॉ.अविनाश भोंडवे यांचे मत आहे.
 
रेस्टॉरंट्स किंवा घरातल्या किचनमध्ये चिकन येईपर्यंत आणि ते शिजवेपर्यंत बर्ड फ्लू होऊ शकतो. त्यामुळे सध्या चिकन टाळावं असा सल्ला ते देतात.
 
"मांस 55 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त शिजवल्यास व्हायरस मरतो हे खरं असलं तरी शिजवण्याआधी पक्ष्याला झालेल्या बर्ड फ्लूची लागण माणसांमध्ये होऊ शकते. कोंबड्यांची वाहतूक करताना किंवा चिकनच्या दुकानांमध्ये हाताळताना एखाद्या कोंबडीला बर्ड फ्लू असल्यास माणसामध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी सावध रहाणं गरजेचं आहे," असंही डॉ. भोंडवे म्हणाले.
 
जागतिक आरोग्य संघटनेनेही यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.
 
चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही, असं WHO ने म्हटलंय.
बर्ड फ्लू झाल्यास माणसांमध्ये कोणती लक्षणं आढळून येतात?
फ्लूची प्राथमिक लक्षणं म्हणजेच सर्दी, खोकला आणि ताप ही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यास आढळून येतात असं डॉक्टर सांगतात. पण याची उदाहरणं अत्यल्प असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.
 
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "बर्ड फ्लूची लागण माणसांना झाल्यास त्याची लक्षणं दिसून येतात. सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणं आहेत. न्यूमोनिया हे सुद्धा बर्ड फ्लूचे लक्षण आहे. पण आतापर्यंत भारतात बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाल्याचे निदर्शनास आलेलं नाही."
 
सध्या भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लू आजाराची लागण विविध पक्ष्यांमध्ये झालेली दिसत आहे. केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या प्रदेशात बदकं, कोंबड्या, कावळे आणि स्थलांतरित पक्षांमध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे.
 
"जंगली पक्षांमध्ये देखील बर्ड फ्लू आढळतो तथापि त्यामुळे ते आजारी पडताना दिसत नाहीत मात्र इतर पक्षांमध्ये हा विषाणू वेगाने पसरताना दिसतो आणि कोंबड्या, बदकं किंवा इतर पाळीव पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू घडून येतात. संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या लाळेतून किंवा नाकातील स्त्रावातून आणि विष्ठेतून हे विषाणू बाहेर पडतात. या स्त्रावाचा किंवा विष्ठेचा संपर्क आल्याने इतर पक्ष्यांमध्येही हा आजार पसरत जातो," असं डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
काय खबरदारी घ्याल?
भारतात आतापर्यंत बर्ड फ्लू माणसांमध्ये आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन राज्य सरकारसह वैद्यकीय तज्ज्ञांनीही केलं आहे. पण त्यासोबतच काळजी घेण्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत.
 
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
 
1. पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसंच विष्ठे सोबत संपर्क टाळा.
 
2. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
 
3. शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
 
4. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसंच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
 
5. कच्च्या पोल्ट्री उत्पादनांसोबत काम करताना पाणी आणि साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.
 
6. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
 
7. पूर्ण शिजवलेले मांसच खा.
 
8. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणं वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळविणं आवश्यक आहे.
 
हे अजिबात करू नका :
 
1. कच्च चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
 
2. अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
 
3. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.
 
4. पूर्णपणे शिजलेलं मांस आणि कच्च मांस एकत्र ठेवू नका.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायना नेहवाल आणि प्रणय कोविड -19 पॉझिटिव्ह, दोघांना बँकॉक हॉस्पिटलमध्ये १० दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवले