जानेवारी 2019मध्ये प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सक्रीय राजकारणात उडी घेतली. त्यांना काँग्रेसचं 'ब्रह्मास्त्र' म्हटलं गेलं. 2019च्या निवडणुकीत त्या किमान उत्तर प्रदेशात तरी भाजपच्या गडाला सुरुंग लावतील, असं काँग्रेसच्या या तथाकथित 'ब्रह्मास्त्रा'विषयी बोललं गेलं.
प्रियंका गांधी यांना पक्षाचं राष्ट्रीय सरचिटणीसपद बहाल करत त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. पण गेल्या चार महिन्यांमध्ये त्यांना आपली छाप पाडण्यात यश आलंय का?
खरंतर त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी खूपच कमी आहे. मात्र संघटना तयार करण्यासाठी त्यांच्याकडे आधीच कमी वेळ असताना स्थिरस्थावर व्हायलाच त्यांना बराच वेळ लागतोय, असा एक सार्वत्रिक समज दिसतोय.
दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशात नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये सहभागी 38,000 लोकांपैकी 44% लोकांनी समाजावादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या आघाडीच्या पारड्यात मत टाकलं. तर प्रियंका गांधींमुळे पक्षाला कुठलाच फायदा झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
प्रियंका गांधीं यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल की त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आणि काही दिवसातच पुलवामा घडलं. सुरुवातीच्या दहा दिवसात त्या पूर्णपणे गोंधळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रचार सभा, रोडशो, बोटीतून 'गंगा यात्रा' सुरू केल्या आणि मीडियाने त्यांना चांगली प्रसिद्धीही दिली.
त्या लहान-लहान गटांना संबोधित करू लागल्या आणि मीडियाशीदेखील मनमोकळेपणाने बोलू लागल्या. रायबरेलीत तर त्यांनी एका गारुड्याशीही संवाद साधला. त्याच्या सापालाही त्या घाबरल्या नाही; उलट सापाला हातही लावला.
प्रियंका तरुण आहेत. त्यांची एक खास शैली आहे, ज्यामुळे त्या लोकांशी सहज संवाद साधतात, त्यांच्याशी सहजी जुळवून घेऊ शकतात. त्यामुळे त्या एक नैसर्गिक राजकारणी आहेत.
लोक त्यांची तुलना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याशी करतात. मात्र त्यांच्यात इंदिरा गांधींची गुणवैशिष्ट असल्याचं अजूनतरी दिसलेलं नाही. अपयशाची भीती असूनही त्यांच्या कुटुंबाने ही जोखीम उचलली आहे. मात्र प्रियंका गांधी यांची जादू चालेल, असा पक्षाला विश्वास आहे.
मोदी यांचे माजी निवडणूक तज्ज्ञ आणि सध्या संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष असलेले प्रशांत किशोर म्हणतात, "कुणाकडेही जादूची छडी नसते. लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ दोन-तीन महिन्यांचा कालावधी उरलाय. मला वाटत नाही की इतक्या कमी वेळेत त्या काँग्रेससाठी परिस्थिती बदलू शकतील. मात्र त्या एक मोठ्या नेत्या आणि लोकप्रिय चेहरा आहेत आणि पुढच्या काळात त्या (NDAसाठी) आव्हान ठरू शकतील."
प्रियंका गांधी राजकारणात नवख्या नाहीत. त्यांच्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये त्या गेली अनेक वर्षं काम करत आहेत. काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचं नियोजन आखण्यात आणि समन्वय साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एकदा मीडियाशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या, "माझं लक्ष्य 2019 आणि 2022 (उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक) आहे. 2022पर्यंत काँग्रेसला बळकट करण्याची माझी इच्छा आहे."
याचा अर्थ असाही होऊ शकतो का की काँग्रेसचं लक्ष्य 2022मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आहेत? आणि काँग्रेस पक्ष तेव्हा प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करेल?
प्रियंका गांधी यांनी आसाम, केरळ आणि गुजरातमध्ये प्रचार केला असला तरी मुळात त्यांची प्रचार मोहीम ही उत्तर प्रदेशपुरती मर्यादित आहे. त्या अलाहबादपासून 'गंगा यात्रा' करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला गेल्या होत्या. गेल्या तीन दशकांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेसचं म्हणावं तसं अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत अशा 'यात्रा' काँग्रेसला मतं मिळवून देतील का, हा प्रश्न आहे.
संघटना एका रात्रीत किंवा काही दिवसात तयार होत नसते. पुढचा मार्ग सोपा नसणार, याची कल्पना काँग्रेस समर्थकांनाही आहे.
शिवाय, प्रियंका गांधींकडून एक-दोन चुकाही झाल्या आहेत. यातली एक चूक म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी मेरठमधल्या हॉस्पिटलमध्ये भर्ती भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली होती. काँग्रेस बहुजनांची मतं फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता. प्रियंका यांनी चंद्रशेखर आझाद यांची भेट घेऊन या आरोपावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलं. तेव्हापासून मायावती अधिक आक्रमक झाल्या आहेत.
प्रियंका आणि राहुल दोघांनीही शेवटपर्यंत त्या मोदींविरोधात वाराणसीतून लढतील का, ही उत्सुकता ताणून धरली होती आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली.
अजय राय 2014 मध्येही मोदींविरोधात रिंगणात उतरले होते. प्रियंका गांधी यांना विरोधी उमेदवार म्हणून जाहीर करण्याला बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी स्पष्ट विरोध केला होता.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा मात्र प्रियंका गांधीच्या नावाला पाठिंबा होता. तुम्ही मोदींना घाबरलात का, या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या, "प्रियंका गांधी घाबरली तर ती घरी बसेल. राजकारणात येणार नाही. मी काहीतरी चांगलं करण्यासाठी राजकारणात उतरले आहे आणि इथे राहणारच."
गांधी घराण्याचं म्हणाल तर मोदींविरोधात निवडणूक रिंगणात उतरवून, ज्यात पराभवाचीच अधिक शक्यता आहे, ते प्रियंका गांधींसारखं अस्त्र वाया जाऊ देणार नाहीत.
प्रियंका गांधी यांनी भाजपची मतं कापण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. त्यावरही मायावती आणि अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली होती. अखेर प्रियंका गांधींनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. "काँग्रेस आपल्या बळावर निवडणूक लढतेय, असं मी म्हटलं होतं. बहुतांश मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार कडवी टक्कर देत आहेत. तुम्ही भाजपचा फायदा करत आहात का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मी म्हटलं होतं की भाजपचा फायदा करण्याआधी मी मरण पत्करेल," असं त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात निवडणुकीचे तीन टप्पे आता शिल्लक आहेत. या तीन टप्प्यातले 41 मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. प्रकृतीच्या कारणावरून सोनिया गांधी निवडणूक प्रचारापासून लांबच आहेत. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशसोबतच अमेठी आणि रायबरेली इथल्या प्रचाराची जबाबदारीही प्रियंका गांधी यांच्यावर येऊन पडली आहे.
आतापर्यंत त्या चर्चेत आहेत. मात्र तेवढं पुरेसं नाही. त्या गर्दी खेचतात यात शंकाच नाही. पण ही गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होईल का?
जातीची गणितं, मतदारांच्या अपेक्षा, मतदारांचा सहभाग, पक्षाची कामगिरी आणि आघाडीची शक्यता ही प्रियंका गांधींसमोरच्या आव्हानांपैकी काही महत्त्वाची आव्हानं आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांची जादू चालणार का, हे मतमोजणीच्या दिवशीच कळेल.