भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या माजी सहकारी महिलेनी गंभीर आरोप केले आहेत. रंजन गोगोई यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेनी केला आहे. काही वेबसाईट्सने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात रिपोर्टिंग करणारे ज्येष्ठ पत्रकार सुचित्रा मोहंती यांनी सांगितलं की सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय बेंचची स्थापना करण्यात आली आहे. गोगोई यांच्याबरोबर न्या. अरुण मिश्रा आणि न्या. संजीव खन्ना हे दोघं या पीठाचे सदस्य आहेत.
या प्रकरणाबाबत बोलताना न्या. गोगोई म्हणाले की न्यायपालिकेचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. न्यायपालिकेला अस्थिर करण्यासाठी मोठं षड्यंत्र रचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सरन्यायाधीश गोगोई यांचं म्हणणं आहे की लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पाठीमागे काही शक्तिशाली लोक आहेत. जर अशा स्थितीत न्यायाधीशांना काम करावं लागणार असेल तर चांगले लोक कधीच या पदावर काम करण्यास इच्छुक राहणार नाहीत.
आरोप करणाऱ्या महिलेनी सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायमूर्तींना एक पत्र लिहिलं आहे. संबंधांना सहमती न दर्शवल्यामुळे मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे माझ्या कुटुंबाला त्रास देण्यात आल्याचा आरोपही त्या महिलेनी केला आहे.
सरन्यायाधीशांनी चार वेबसाईटची नावं घेतली. स्क्रोल, लीफलेट, वायर आणि कारवां. या चार वेबसाइटनी त्या महिलेनं केलेले आरोप प्रकाशित केले आहेत. या वेबसाइट एकमेकांशी संबंधित आहेत.
त्या महिलेनी केलेले आरोप खोटे आहेत त्यामुळे वृत्तांकन करताना माध्यमांनी संयम बाळगावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
शनिवारी या प्रकरणाचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की हे गंभीर प्रकरण आहे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे यावर सुनावणी व्हावी.
या प्रकरणी अद्याप सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिला नाही. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित राहावं या दृष्टीने माध्यमांनी संयम बाळगावा असं आवाहन पीठाने केलं आहे. हे आरोप बिनबुडाचे आहेत असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.
ज्या महिलेनी हे आरोप केले आहे ती महिला एका प्रकरणात चार दिवस तुरुंगात होती. चांगली वर्तणूक करावी यासाठी पोलिसांनी अनेक वेळा त्या महिलेला ताकीदही दिली होती असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.