आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं चीनचं संशोधन करणारं जहाज गुरुवारी (22 फेब्रुवारी) मालदीवमध्ये पोहोचलं. हे जहाज गेल्या एक महिन्यापासून हिंदी महासागरात तळ ठोकून होतं.
मालदीवच्या प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा भारत आणि श्रीलंकेचे तटरक्षक जहाज युद्ध सरावासाठी हिंदी महासागरात पोहोचले तेव्हाच चीनचं शियांग यांग हाँग 3 मालदीवमध्ये पोहोचलं.
भारताने यापूर्वी हिंदी महासागरातील या जहाजाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि कोलंबो बंदरात हे जहाज थांबू देऊ नये यासाठी श्रीलंकेवर दबाव आणला होता.
मालदीवच्या मीडिया ग्रुप एडिशनने दिलेल्या वृत्ताचा हवाला देत पीटीआयने लिहिलंय की, चिनी संशोधन जहाज शियांग यांग हाँग 3 गुरुवारी मालेत पोहोचलं असून दुपारी थिलाफुशीजवळ दिसलं होतं.
एका सागरी वाहतूक वेबसाईटचा हवाला देत एडिशनने हे वृत्त दिलं आहे. ही वेबसाइट समुद्रातील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.
मुइज्जू यांनी चीन सोडताच जहाजही निघालं
पीटीआय या वृत्तसंस्थेने मालदीवची न्यूज वेबसाइट अधाधूचा हवाला देत लिहिलंय की, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी जानेवारीमध्ये चीनचा दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या 24 तासांत हे चिनी जहाज समुद्रात उतरलं होतं.
मालदीवच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजेच ईईजी मध्ये जवळपास महिनाभर राहिल्यानंतर 22 फेब्रुवारीला हे जहाज मालेजवळ दिसलं.
22 जानेवारी नंतर हे चिनी जहाज रडारवर कुठेही दिसत नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या जहाजाची ट्रॅकिंग सिस्टिम बंद झाल्याचे समजते.
हे जहाज जवळपास एक महिना ईईजी मध्ये थांबून असल्याचं वृत्त अधाधू वेबसाइटवरील उपग्रह तज्ञांनी दिलं आहे.
मुइज्जू हे चीनचे समर्थक मानले जातात. मुइज्जू हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवचे राष्ट्रपती झाले. त्यांनी या निवडणुकीत 'इंडिया आउट'ची घोषणा दिली होती.
आजवरच्या निवडून आलेल्या मालदीवच्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदा भारताचा दौरा केला आहे. पण मुइज्जू यांनी अद्याप भारताला भेट दिली नाही. नुकताच त्यांनी चीनचा पहिला अधिकृत दौरा केला.
यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या निमंत्रणावरून तुर्कीला भेट दिली होती.
हेरगिरीचं जहाज असल्याचा अमेरिकन थिंक टँकचा आरोप
अमेरिकेच्या थिंक टँकने आरोप केलाय की चीन ज्याला वैज्ञानिक संशोधन जहाज म्हणतय ते प्रत्यक्षात समुद्रातून डेटा गोळा करत आहे.
थिंक टँकने असंही म्हटलं होतं की, हे जहाज लष्करी उद्देशांसाठी डेटा गोळा करत आहे, विशेषत: पाणबुड्यांशी संबंधित.
चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे जहाज फक्त समुद्राशी संबंधित माहिती गोळा करत असून संयुक्त राष्ट्राच्या कायद्यानुसार काम करत आहे.
या वर्षी 23 जानेवारी रोजी मालदीव सरकारने या संशोधन जहाजाला आपल्या समुद्रात येण्याची परवानगी दिली होती. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं की, हे जहाज मालदीवच्या समुद्रात असताना कोणत्याही प्रकारचे संशोधन करणार नाही.
मात्र भारतीय संरक्षण विभागाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने असं म्हटलंय की, भारत या जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
फेब्रुवारी महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले होते की, "गेल्या काही वर्षांत आसपासच्या समुद्रांमध्ये चीनचे वैज्ञानिक संशोधन उपक्रम सुरू करण्यात आले असून याचा उद्देश केवळ शांतता प्रस्थापित करणे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक समज सुधारण्यासाठी आहे."
श्रीलंकेने घातली बंदी
चिनी जहाजाने यापूर्वी श्रीलंकेच्या बंदरात उतरण्याची परवानगी मागितली होती, जी श्रीलंकेने नाकारली.
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारीला श्रीलंकेने चिनी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घालताना म्हटलं की, इथून पुढे एक वर्षासाठी परदेशी जहाजांना श्रीलंकेच्या समुद्रात येण्यास बंदी असेल यापूर्वी, भारताने चिनी जहाजं आपल्या शेजारच्या हद्दीत येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
2022 मध्ये युआन वांग 5 नामक चिनी लष्करी जहाज कोलंबोला पोहोचलं. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा मागोवा घेण्याची क्षमता असलेलं हे जहाज श्रीलंकेत आल्याने भारताने चिंता व्यक्त केली होती.
हे हेरगिरी करणार जहाज आहे असं भारताने म्हटलं होतं आणि श्रीलंका सरकारकडे औपचारिकपणे आपला आक्षेप नोंदवला होता.
त्यावेळी चीनने भारताचं नाव न घेता म्हटलं होतं की, "कथित सुरक्षा चिंतेचा हवाला देऊन श्रीलंकेवर दबाव टाकला जातोय आणि हे अन्यायकारक आहे."
मालदीवबद्दल भारताची चिंता
मालदीव भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे 300 नॉटिकल मैल दूर आहे, तर भारताच्या लक्षद्वीप समूहातील मिनिकॉय बेटापासून ते फक्त 70 नॉटिकल मैल दूर आहे.
भौगोलिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास मालदीवचे स्थान भारतासाठी आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदी महासागरातून ज्या जागतिक शिपिंग लाईन्स जातात त्याच ठिकाणी मालदीव आहे.
मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचा महत्त्वाचा मित्र आहे. मोदी सरकारच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन (सागर) सारख्या मोहिमांमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय.
मालदीवचा चीनकडे झुकणारा कल भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय.
राष्ट्रपती झाल्यानंतर, मुइज्जू यांनी भारताला आपलं सर्व सैन्य मागे घेण्यास सांगितलं होतं. पण अलीकडेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की भारतीय सैन्य एका प्लॅटफॉर्म वरून 10 मार्चनंतर आणि उर्वरित दोन प्लॅटफॉर्म वरून 10 मे पर्यंत माघार घेईल.
यानंतर एविएशन प्लॅटफॉर्म भारतीय सैन्याऐवजी भारतीय तांत्रिक टीम हाताळेल.
मालदीवमध्ये सध्या 77 भारतीय सैनिक आहेत. त्यांच्याकडे सागरी देखरेखीसाठी एक डॉनियर 228 विमान आणि वैद्यकीय मदतीसाठी दोन एचएएल ध्रुव हेलिकॉप्टर आहेत.
मालदीव, भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त युद्ध सराव
गुरुवारी (22 फेब्रुवारी) मालदीव, भारत आणि श्रीलंकेच्या तटरक्षक दलांनी तिन्ही देशांच्या संयुक्त सरावाला सुरुवात केली.
दोस्ती-16 नावाच्या या युद्ध सरावात बांगलादेशने निरीक्षक म्हणून भाग घेतला.
सोशल मीडियावर ही माहिती देताना मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सने म्हटलंय की, "22 ते 25 तारखेदरम्यान होणाऱ्या तीन देशांच्या संयुक्त सराव 'दोस्ती-16' मध्ये भाग घेण्यासाठी आम्ही भारत आणि श्रीलंकेच्या जहाजांचं स्वागत करतोय. दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या या सरावात तिन्ही देशांच्या लष्करांमध्ये समन्वय वाढवणे तसेच समुद्रात घडणाऱ्या घटनांना संयुक्तपणे हाताळण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जाईल."
मैत्री युद्ध सराव 1991 मध्ये सुरू झाला.
2012 मध्ये श्रीलंकेने प्रथमच यात सहभाग घेतला होता. यापूर्वी हा सराव 2021 मध्ये झाला होता.