Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना : वाशिममध्ये 229 शालेय विद्यार्थ्यांना संसर्ग, तर सोलापूर, साताऱ्यातही विद्यार्थी पॉझिटिव्ह

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (19:04 IST)
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सरकार आणि पालकांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.
 
वाशिम जिल्ह्यातील निवासी शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 42 विद्यार्थी आणि 8 शालेय कर्मचारी अशी 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतही 23 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे.
 
पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 2 दिवसात कोव्हिड-19 पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत.
 
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीवर लक्ष ठरवण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना वाशिमचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस म्हणाले, "शाळेतील 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. या मुलांपैकी कोणालाच कोरोनाची लक्षणं नव्हती. मुलांची प्रकृती चांगली आहे. ही मुलं 14 ते 17 या वयोगटातील आहेत."
 
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी देगाव निवासी शाळेला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतलाय.
 
संसर्ग कसा पसरला?
10 दिवसांपूर्वी देगावच्या निवासी शाळेतील 30 मुलं पॅाझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर शाळेत संसर्ग पसरल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे.
 
जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस सांगतात, "14 फेब्रुवारीपासून कोरोनाचा विविध जिल्ह्यात संसर्ग पसरल्याचं आढळून आल्यानंतर शाळेतील मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. 100 टक्के विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. आरोग्य विभागाची एक टीम दिवसरात्र या शाळेत ठेवण्यात आली आहे."
 
जिल्हाधिकार्यांच्या माहितीनुसार, हे विद्यार्थी विविध जिल्ह्यातील आहेत.
 
अमरावती - 151
यवतमाळ - 55
वाशिम - 11
बुलढाणा- 3
अकोला- 1
हिंगोली- 8
"या विद्यार्थ्यांबाबत त्या-त्या जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्यांना माहिती देण्यात आली आहे," असं जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस पुढे म्हणाले.
 
विद्यार्थ्यांची तपासणी कशी करणार?
 
आरोग्य पथक विद्यार्थ्यांचं तपामान आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करणार
लक्षणं आढळून आल्यास तातडीने उपचार होणार
शाळा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच एक पथक २४ तास तैनात ठेवाणार
विद्यार्थ्यांना वेळेवर आणि योग्य आहार मिळेल याची खबरदारी घेणार
निगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेणार?
शाळेतील निगेटिव्ह असणार्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्याची कोरोना चाचणी तातडीने करणार
 
याबाबत बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अविनाश आहेर म्हणाले, "कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडी सर्दी आहे. इतर विद्यार्थ्यांना कोणतंही लक्षण किंवा त्रास जाणवत नाहीये."
 
शाळेचा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत.
 
साताऱ्या जिल्ह्यातील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात आरटीपीसीआर चाचणी दरम्यान 23 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्क, सॅनिटायझर, आणि सुरक्षित अंतर या गोष्टीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असं शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
शाळा सुरू झाल्यानंतर नेर गावात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीच्या घरात तिच्या आजोबांना कोरोनाची लागण झाली. या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची चाचणी करण्याचे ठरवण्यात आले. यानुसार दररोज 100 विद्यार्थ्याची चाचणी करण्यात येत आहे. शाळेची पटसंख्या 739 इतकी असून आतापर्यत 500 विद्यार्थ्याची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 23 विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे.
 
सोलापुरातील शाळेत 50 जणांना कोरोना
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील मतिमंद विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा शेतकी कर्म शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कर्मचारी अशा एकूण 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
संस्थेचे प्रमुख अण्णाराव राजमाने तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी, प्रशिक्षक यांची प्रकृती सुधारत आहे. नियमित तपासणी आणि औषध उपचार सुरू आहेत.
 
दिव्यांग, मतिमंद मुलांना या शाळेत शेती तसेच अन्य प्रशिक्षण दिलं जातं. 12 तारखेला या शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्यानंतर सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली .
 
सुरुवातीला 6 जण कोरोना बाधित आढळले. यानंतर आणखी काही जणांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा ही संख्या दुपटीने वाढली. यात दोन महिलांचाही समावेश आहे. 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाला अधिक त्रास होत असल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलंय. तर बाकीच्या सर्व जणावर याच शाळेच्या परिसरात उपचार सुरू आहेत.
 
शाळेत काही अनाथ मुलं आहेत. त्यांच्यावर तिथेच उपचार करण्यात येत आहेत, तर ज्यांचे पालक आहेत आणि आजारी नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या शाळेचा परिसर मोठा आहे .अंत्रोळी आणि कंदलगाव मध्ये 50 एकर मध्ये ही जिव्हाळा शेतकी कर्मशाळा आहे, अशी माहिती अण्णाराव राजमाने यांनी दिली.
 
शिक्षणमंत्री काय निर्णय घेणार?
एकाबाजूला राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसऱ्या बाजूला शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. शाळेत एक विद्यार्थी किंवा शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यास संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी लागते.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही याविषयी अधिक माहिती घेत आहोत. शाळांना कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासानाने याची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्पष्ट बोलू."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख