17 नोव्हेंबर 2019 चा तो दिवस होता.11 वर्षीय एक मुलगा युकेतून अमेरिकेत परतला. अनावधनाने सोबत तो इतरही काहीतरी घेऊन आला.
एका आठवड्यानंतर या मुलानं न्यूयॉर्कमधील सुलिव्हन काऊंटी इथं एका धार्मिक शिक्षणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी त्याला लाळेच्या ग्रंथीची एक गूढ अशी सूज निर्माण झाली. त्याला गालगुंड झाले होते. हा श्वसनाचा संसर्ग असल्याने हवेतील थेंबाद्वारे तो इतरत्र पसरला.
या दरम्यान धार्मिक शिक्षणाचा कार्यक्रम सुरूच होता. या शिक्षण कार्यक्रमात दररोज 400 मुलं सहभागी होत होती. अनेक तास ते समोरासमोर बसून शिक्षण घेत होते. ऑर्थोडॉक्स ज्युईश पद्धतीचं हे शिक्षण असून, यात सहविद्यार्थी समोरासमोर बसतात. 'चवरुसा' असं त्यांना म्हणतात. या कार्यक्रमामुळे तीन प्रौढ लोकांसह 22 जणांना लागण झाली.
मुलं या कार्यक्रमातून आपापल्या घरी परतल्यानंतर ब्रूकलीन आणि रॉकलँ काऊंटी, तसंच ओसियन काऊंटी आणि ऑरेंज काऊंट इथंही विषाणूचा प्रसार झाला. हा प्रसार जवळपास वर्षभर सुरू राहिला आणि यात 3 हजार 502 जणांना या आजाराची लागण झाली.
या सर्व प्रकाराचं शास्त्रज्ञांनी ज्यावेळी विश्लेषण केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, चवरुसा शिक्षण पद्धती गालगुंडाच्या विषाणूचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरली.
या प्रकरणातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यातील जो 'सुपर-स्प्रेडर' होता, त्यानं MMR (गोवर, गालगुंड आणि रुबेला) लस घेतली होती. त्यामुळे त्याच्यात काही प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच इतर मुलांच्या तुलनेत त्याच्यात कोणतीही लक्षण दिसली नाहीत, तसंच त्याला तब्येतीत कुठले अडथळेही दिसले नाहीत. मात्र, विषाणू त्याच्या शरीरात होते आणि ते त्याच्यामार्फत इतरांपर्यंत पसरत होतेच.
किंबहुना, बहुतांश लशी लक्षणं अदृश्य करतात, मात्र संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षा करत नाहीत. याचा परिणाम असा होतो की, लोक अनावधनाने विषाणू शरीरातून पसरवतात. बऱ्याचदा यामुळेच साथीच्या रोगाला सुरुवात होते.
'प्रभावी' आणि 'निर्जंतुकीकरण' रोगप्रतिकारशक्ती
लशीद्वारे दोन मुख्य प्रकारची प्रतिकारशक्ती मिळते. एक म्हणजे तथाकथित 'प्रभावी' प्रतिकारशक्ती, जी रोग गंभीर होण्यापासून रोखू शकते. मात्र, शरीरात प्रवेश करण्यापासून किंवा स्वत:च्या अधिक प्रती बनविण्यापासून रोखू शकत नाही.
दुसरे म्हणजे 'निर्जंतुकीकरण रोग प्रतिकारशक्ती', जी संक्रमणास संपूर्णपणे रोखू शकते. तसंच, लक्षणं नसलेल्या आजारांनाही रोखू शकते. यातील दुसऱ्या प्रकारची लस बनवण्याकडे संशोधकांचा कल असतो. मात्र, नेहमीच ते साध्य होतं असं नाही.
मेंदूज्वराचं उदाहरण घेऊया. Neisseria meningitidis या जीवाणूमुळे होणाऱ्या या आजारावर अनेक प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत. US - MCV4, MPSV4 आणि MenB या तीन लशी तर 85-90 टक्क्यांपर्यंत हा आजार रोखू शकतात. मात्र, तरीही हे जीवणू लस घेतलेले लोक वाहून नेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
नाक किंवा घशाच्या मागील बाजूस हे जीवाणू लपतात. ज्यावेळी एखादी व्यक्ती शिंकते, खोकते, चुंबन घेते किंवा सिगरेट ओढते, तेव्हा ते इतरांपर्यंत प्रसारित होतात. युकेतील विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात असं आढळलं की, ज्या लोकांना या आजाराची बाधा झाली होती, त्यांना चार आठवड्यानंतर लस घेतल्यानंतर काहीच परिणाम जाणवला नाही.
Meningitidis लशीचे दोन वेगवेगळे परिणाम दिसू शकतात, असं नॉटिंगहॅम विद्यापीठातील साथीच्या रोगांसंदर्भातील विभागाचे प्राध्यापक केईथ नील म्हणतात. ते पुढे म्हणतात, "लागण झालेल्या फार कमी लोकांमधील जंतू कमी होतात. कारण त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती असते."जरी तुम्ही लस घेतली असाल तरीही पर्टुसीस, हिपॅटायटीस, गालगुंड, इन्फ्ल्यूएंझा यांची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र, या आजारांची गंभीर लक्षणं निर्माण होण्यापासून, रुग्णालयात भरती होण्यापासून या लशी रोखण्यास परिणामकारक ठरतात.
निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती कशी काम करते?
एखादी परिणामकारक रोगप्रतिकारशक्ती साधारणत: पांढऱ्या पेशींचं संयोजन पुरवते - त्यात बी आणि टी पेशींचा समावेश असतो - तेही अँटी-बॉडीसह. निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती ही या सगळ्यानंतरची गोष्ट आहे.
या अँटीबॉडी बाह्य भागावर चिकटून असतात आणि नाक, घसा किंवा फुफ्फुसांशी संपर्क होण्यापासून रोखतात. एकूणच शरीराची सुरक्षा करतात.
कोव्हिड-19 च्याबाबतीत सांगायचं तर, विषाणूची ओळख पटवणार्या अँटीबॉडीज निष्प्रभाषित केल्याने त्याच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रोटीनशी संबंध जोडला जातो, ज्याचा उपयोग पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी होतो.
निर्जंतुकीकरण रोग प्रतिकारशक्ती प्राप्त करण्यासाठी, शरीरात प्रवेश करणारे कोणत्याही विषाणूचे कण पकडण्यासाठी आणि त्यांना ताबडतोब नष्ट करण्यासाठी लशींनी पुरेशा अँटीबॉडीना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे.
कोव्हिड-19 ची लस कोणत्या प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण करते?
अगदी थोडक्यात सांगायचं, तर आम्हाला काहीच माहित नाही. कारण हे अजून खूप नवीन आहे, असं नील सांगतात.
आतापर्यंत कोरोनावरील ज्या उपलब्ध लशी आहेत, त्या घेतल्यानंतर विषाणू पसरू शकतो की नाही, याबाबत कुठलीच चाचणी घेण्यात आली नाहीय. अशी क्षमता तपासण्यापेक्षा लक्षणं विकसती होण्यापासून या लशी रोखू शकतात की नाही, हे पाहिले गेले.
याचा अर्थ आम्ही आमचं लक्ष अधिक व्यवहारिकरित्या ठेवतो, असं प्राध्यापक डॅनी अल्टमन म्हणतात. ते इम्पेरियल कॉलेज लंडनमध्ये इम्युनोलॉजीचे प्राध्यापक आहेत.
शास्त्रज्ञांना आधीच माहित होते की, कोव्हिड-19 च्या नैसर्गिक संसर्गानंतर लोकांमध्ये विकसित होणाऱ्या अँटीबॉडीमुळे नेहमीच पुन्हा संसर्गापासून रोखलं जाऊ शकत नाही.
ब्रिटीश हेल्थकेअर वर्कर्सच्या एका अभ्यासात असं समोर आलं की, ज्यांच्यात आधीपासूनच - बहुधा पहिल्यांदा लागण झाल्यानंतर - अँटिबॉडी असलेल्यांपैकी 17 टक्के जणांना पुन्हा लागण झाली. यातील जवळपास 66 टक्के लोक लक्षणविरहित होते. म्हणजेच, इतरांपर्यंत विषाणू पसरवण्यास लक्षणं असण्याचीच आवश्यकता आहे, असं नाही.
"या प्रकारच्या विषाणूसाठी मला वाटतं लशीबाबत जास्त विचारण होतेय. पण हे अत्यंत कठीण आहे," असं अल्टमन म्हणतात.
सुदैवाने, या गोष्टीचा हा शेवट नाही.
नुकतेच काही संकेत मिळालेत की, काही लशी विषाणू पूर्णपणे नष्ट करू शकत नसल्या, तरी संक्रमण रोखू शकतात. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांच्या शरीरातील विषारी कणांची संख्या कमी करणे. "याचा अर्थ असा की, जर लशीमुळे लोक कमी आजारी पडत असतील, जर कमी विषाणू निर्माण होत असतील आणि त्यामुळे कमी संसर्ग होत असेल, अर्थात ही एक थिअरीच आहे," असे नील सांगतात.
निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती सिद्ध करणं फार कठीण आहे.
अनेक वैद्यकीय चाचण्यांमध्ये लस घेतल्यानंतर विषाणूचा प्रसार थांबू शकतो का, हे तपासलं नसल्यानं शास्त्रज्ञ आता हे पाहत आहेत की, जिथं मोठ्या प्रमाणात लस वितरित केली गेली, तिथं किती संसर्ग झाला याची तपासणी केली जातेय.
"मात्र, नेमकं समजणं कठीण आहे, कारण इथं दोन गोष्टी आहेत. एक लॉकडाऊन आणि दुसरी लस. या दोन्ही गोष्टींना वेगळं करणं अशक्य आहे. मग हे लशीमुळे झालं? की लॉकडाऊन? की या दोन्हींच्या संयोजनातून?" असे प्रश्न नील उपस्थित करतात.
आपण लसनिहाय क्षमता पाहूया. कुठलाही गोंधळ टाळण्यासाठी या माहितीत लक्षणांपासून वाचण्याची किंवा संरक्षणाची कोणतीही माहिती यात समाविष्ट केली नाहीय.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का
गेल्यावर्षी जुलै महिन्यात या लशीची Rhesus macaque या माकडावर चाचणी करण्यात आली. या माकडाचे फुफ्फुस मानवासारखे आहे. या चाचणीतून काही आशादायी निकाल हाती आले. या माकडाला गंभीर आजारापासून वाचवता आले, मात्र कोरोनाची लागण होण्यापासून रोखता आलं नाही. लस टोचलेली माकडं तितकेच संक्रमित होण्याची क्षमता बाळगून होते, जितकी ज्यांना लसी टोचली नाही ते होते. फक्त फुफ्फुसातील विषारी कणांचे प्रमाण कमी-जास्त आढळले.
लेखकाने असे नमूद केले की, लस आजाराचा संसर्ग रोखू शकत नाही. मात्र, आजाराच्या लक्षणांमध्ये घट होऊ शकते.
आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पाहता, हे चित्र अधिक गुंतागुंतीचे होते. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्यांना केवळ नवीन लस आणि प्लेसबो असे दोन इंजेक्शन देण्यात आले नव्हते, तर मेनिंजायटीस लस आणि काही आठवड्यांनंतर काही लक्षणं आढळली की नाही हे शोधून काढले गेले. या चाचण्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात नाक आणि घशातील स्वॅब घेण्यात आले. याद्वारे लक्षणविरहित संसर्ग तपासले गेले.
जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालेल्या या चाचण्याच्या निकालानुसार, ज्यांना लशीचा अर्धा डोस देण्यात आला आहे, ते विषाणू संक्रमित करण्यापासून रोखण्यात 59 टक्के यशस्वी झाले. ज्यांना दोन पूर्ण डोस देण्यात आले, त्यांच्यात हाच टक्का चारपर्यंत खाली कोसळला. मात्र, या अभ्यासात लोकांच्या फुफ्फुसात विषाणूच्या कणांचा काही परिणाम झाला का, हे तपासले गेले नाही.
लशीचा अर्धा डोस घेणाऱ्यांमध्ये संसर्गबाबतची आकडेवारी आशादायी दिसली. मात्र, याला पुष्टी देण्यासाठी पुढील आकडेवारी आवश्यक होती.
प्री-प्रिंटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या पेपर्समध्ये चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा अभ्यास करून काही गोष्टी मांडल्या आहेत. जे विषाणू शोधण्यासारखे आहेत, त्यांच्या आकडेवारीत एका डोसने 67 टक्क्यांनी घट झाल्याचे आढळले. "संक्रमण कमी करण्याची क्षमता असल्याचं" नमूद केलं गेलं.
फायझर-बायोएनटेक
फायझर-बायोएनटेक लस लोकांना कोरोना व्हायरस होण्यापासून रोखू शकते, असा कोणताही अंतिम पुरावा अद्याप नाही. मात्र, काही प्रारंभिक चिन्हे अशी आहेत की, ही लस संक्रमण रोखण्याचं काम करू शकेल.
जानेवारीच्या सुरुवातीला फायजर लशीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला म्हणाले की, प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, लस घेतल्यानंतर संक्रमण होत नाही. मात्र, मानुष्यावरील चाचण्यांमध्ये अद्याप हे सिद्ध झालेले नाही.
एका इस्त्रायली सर्वेक्षणात असे आढळले की, लशीचे दोन डोस दिलेल्या 102 वैद्यकीय कर्मचार्यांपैकी केवळ दोनच जणांमध्ये अँटिबॉडी 'कमी' प्रमाणात विकसित झाल्या. इतर 98% लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांपेक्षा जास्त अँटिबॉडी होत्या. हे निकाल एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. ज्यात अभ्यासाच्या प्रमुखांनी असे सांगितले आहे की, या रोगप्रतिकारकशक्तीमुळे लोकांना वाहक होण्यास किंवा रोगाचा प्रसार होण्यापासून रोखले जाऊ शकते.
अर्थात, या परिणामांच्या विश्लेषणाविषयी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण एकतर नमुन्यांचा आकार कमी आहे आणि प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशितही झाले नाहीय.
अलीकडेच इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील 10 लाख लोकांच्या आरोग्यसंबंधी नोंदी पाहिल्या आणि त्यांना असं आढळलं की, संपूर्ण लसीकरणानंतर एका आठवड्यात 7 लाख 15 हजार 425 जणांपैकी केवळ 317 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
पुन्हा तेच की, ही काही वैद्यकीय चाचणी नव्हती, यात कुठलाही नियंत्रित गट नव्हता आणि लॉकडाऊनसारख्या गोष्टींमुळे निकाल कमीही असू शकतो, मात्र, संसर्गाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं.
मक्काबी हेल्थकेअर सर्व्हिस या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अभ्यासात असेच आशादायी निकाल आढळले. 1,63,000 लोकांपैकी केवळ 31 जणांना संसर्ग झाला.
मॉडर्ना
मॉडर्ना चाचणी ही लस संक्रमणास प्रतिबंध करते की नाही याकडे विशेष लक्ष दिलेले नसले तरी, सहभागींनी त्यांचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यापूर्वी कोरोना संसर्गाची तपासणी केली गेली - म्हणजे या गटांमधील संक्रमणाच्या प्रमाणाची तुलना करणे शक्य होते. यात 14 लोक पहिल्या डोसनंतर पॉझिटिव्ह आढळले, तर प्लेसेबो घेतलेल्यांपैकी 38 जण पॉझिटिव्ह आढळले.
यावरून असं आढळलं की, लक्षणविरहित लोकांपैकी दोन तृतीयांश लोकांना एका डोसनंतर संक्रमणापासून वाचवण्यात यश आलं. मात्र, या संशोधनाला काही मर्यादा होत्या. यात पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्याही कमी होती. त्यामुळे हे पूर्णपणे अचूक आहे असं म्हणता येणार नाही. FDA समोर हे सादर केले गेले होते. मात्र, अद्याप याची समीक्षा झाली नाहीय.
नोवाव्हॅक्स
या लशीला अद्याप वापरासाठी जगात कुठेच परवानगी देण्यात आली नाहीय. तसंच, इतर लशींप्रमाणे या लशीतही अद्याप संक्रमण रोखण्याची व्यापक क्षमता दिसून आळेली नाही. मात्र, गेल्यावर्षी नोव्हेंबरमधील काही निकालांमध्ये शास्त्रज्ञांना काहीसं उत्सुकता निर्माण होणाऱ्या गोष्टी आढळल्या.
कंपनीच्या दाव्यानुसार, rhesus macaques च्या अभ्यासानुसार विषाणूचा संपूर्ण प्रसार होण्यापासून रोखला गेला, जेव्हा त्यांना जास्त प्रमाणात डोस देण्यात आला.
या परिणामांमुळे या लशीला एका विशिष्ट गटात समाविष्ट केलंय, ज्या लशी लक्षणविरहित संक्रमण पूर्ण रोखू शकतात. त्यामुळे याकडे आश्वासक म्हणून पाहिले जातंय. कारण rhesus macaques आणि मनुष्यात सारखीच श्वसन शरीरविज्ञान असतं.
आता शास्त्रज्ञ लसीकरण केलेल्या मानवांमध्ये देखील निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती मिळवू शकतात की नाही, या शोधाची वाट पाहत आहेत.
अपूर्ण हर्ड इम्युनिटी
दुर्दैवाने, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केवळ लशीची क्षमता केवळ सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांवर अवलंबून नसेल, तर हर्ड इम्युनिटी (रोगप्रतिकारकशक्ती) चा परिणाम सुद्धा महत्त्वाचा आहे.
"जर या लशींनी संक्रमण पूर्णपणे थांबवलं नाही, तर हर्ड इम्युनिटी वाढवण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता निर्माण होईल," असं मायकल हेड सांगतात. हेड हे साउथॅम्प्टन विद्यापीठात जागतिक आरोग्यमध्ये वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत.
जे लोक पुरेसे रोगप्रतिकारक असतात, त्यांना संसर्गजन्य रोगांपासून अप्रत्यक्ष संरक्षण देण्यास हर्ड इम्युनिटीचा उपयोग होतो. अर्थात, यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. आपण जगातल्या कुठल्या भागात राहतो, लॉकडाऊनची स्थिती काय आहे, या सगळ्यांचाही यात विचार होऊ शकतो.
शास्त्रज्ञांना इतकं सारं माहीत असतानाही, हर्ड इम्युनिटीबाबत सर्वत्र लागू पडेल असं काही ठाम सांगता येत नाही.
उदाहरणार्थ, एका आकडेवारीनुसार संक्रमण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 60-72 टक्के लोकसंख्येला इम्युनिटीची गरज आहे. मात्र, लस जर 80 टक्के परिणामकारक असेल, तर 75 आणि 90 टक्के लोकांना इम्युनिटीचा गरज असते.
अनेक देशांच्या लसीकरणाच्या लक्ष्यापेक्षाही हे जास्त प्रमाण आहे. युकेत सप्टेंबरपर्यंत सर्व प्रौढ व्यक्तींना रोगप्रतिकारक करण्याचं ध्येय बाळगून आहे. म्हणजेच, जवळपास 6 कोटी साडेसात लाखांपैकी 5 कोटी एक लाख लोकांना रोगप्रतिकारक बनवण्याचा युकेचा प्रयत्न आहे. युकेच्या एकूण लोकसंख्येचपैकी 75 टक्के एवढी ही लोकसंख्या आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीचं लसीकरण आवश्यक असल्याचं ग्राह्य धरलं जात आहे.
मात्र, तरीही अनेक शास्त्रज्ञांना वाटतंय की, कोरोनाचा विषाणू पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकत नाही. त्यामुळे शक्य तितकं कोरोनाचं संक्रमण कमी करणं हेच ध्येय आहे.
काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, एकदा पुरेसे लोक लस घेतल्यानंतरही ते विषाणूचा प्रसार करण्यास सक्षम आहेत की नाही हे महत्त्वाचे नाही, तर प्रत्येकास प्रतिकारशक्ती मिळेल, हे महत्त्वाचे आहे.
तथापि, ज्यांना लस देणं शक्य नाही, त्यांच्यासाठी हर्ड इम्युनिटीचा पर्याय चांगला वाटतो. म्हणजे, गरोदर असलेल्या महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती अशांचा यात समावेश होऊ शकतो.
हे सर्व होईपर्यंत, आपण सुरुवातीला सांगितलेल्या 11 वर्षांच्या गालगुंड झालेल्या मुलाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जरी लसीकरण झालं असलं तरी लसीकरण झालं नसल्यासारखंच वागावं आणि काळजी घ्यायला हवी.