Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना लसीकरण : तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

Corona Vaccination:Many have questions about corona vaccination  Answers to all your questions
, गुरूवार, 18 मार्च 2021 (17:52 IST)
मयांक भागवत
देशात कोव्हिड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जाणार आहे.
केंद्राच्या नियमावलीनुसार 'को-विन' अॅपचा लसीकरण नोंदणीसाठी वापर बंधनकरक करण्यात आला आहे. पण, या अॅपद्वारे नोंदणी करताना सुरुवातीला सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना लसीकरणाबाबत अनेकांना प्रश्न पडलेत. सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची आम्ही लसीकरण अधिकारी आणि केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला.
 
1. को-विन अॅप नीट चालत नसेल तर काय करावं?
लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 'को-विन' अॅपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. अॅप नीट चालत नाही, अनेकदा प्रयत्न करूनही ओटीपी येत नाही. वेबपोर्टल उघडत नाही अशी अनेकांची तक्रार होती.
ज्येष्ठांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत बीकेसीच्या कोव्हिड सेंटरवर मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. को-विनचं सर्व्हर डाऊन झाल्याने लोकांचा मोठा खोळंबाही झालेला पाहायला मिळाला.
आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यात टप्प्यात लस देतानाही को-विन अॅपमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता.
 
2. थेट रुग्णालयात गेलो तर लस मिळेल का?
केंद्र आणि राज्य सरकारच्या विमा योजनेशी संलघ्न खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे, राज्यांना यासाठी तीन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगण्यात आलंय.
आगाऊ स्वयं नोंदणी
प्रत्यक्ष जागेवर नोंदणी
सुविधात्मक सहकारी नोंदणी
महाराष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील सांगतात, "केंद्राच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन अॅपमध्ये नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात मात्र वॉक-इन किंवा ऑन-साइट नोंदणी करून लस घेता येऊ शकते."
त्यामुळे नोंदणीशिवाय खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी दाखल झालात तर तुम्हाला लस मिळणार नाही.
पण तुम्ही सरकारी रुग्णालयात को-विन अॅपशिवाय थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकता.
 
3. माझ्या फोनवरून शेजारच्या आजींचं नाव नोंदवता येईल का?
लोकांना को-विन अॅपबाबत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने युजर मॅन्युअल जारी केलंय.
या युजर मॅन्युअलनुसार, एका मोबाईलवरून स्वत:सोबत इतर 3 लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.
त्यामुळे तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांची नोंद केल्यानंतर तुम्ही शेजारच्या आजी-आजोबा यांची नोंदणी करू शकता.
 
4. मोबाईल किंवा इंटरनेट नाही, त्यांना लस कशी मिळेल?
राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात रहाणाऱ्या अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. मग अशा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर आजार असलेल्यांनी काय करावं?
याबाबत डॉ. पाटील सांगतात, "राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात."
 
5. पहिली लस घेतली पण, दुसरी राहिली तर?
महाराष्ट्राचे लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. डी. एन. पाटील पुढे सांगतात, "लसीचा एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28व्या दिवशी पुन्हा एक मेसेज पाठवला जाईल. जेणेकरून लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी जायचंय हे समजेल."
"मेसेजनंतर दोन-तीन दिवसांनी लस घेतली तरी चालेल. पण, दुसरा डोस घ्यायचा, हे आपणच लक्षात ठेवलं पाहिजे. सरकार प्रत्येक गोष्टीवर लक्ष कसं ठेवणार? लोकांनी सहकार्य केलं पाहिजे," असं लसीकरण मोहिमेतील एक अधिकारी सांगतात.
 
6. लसीकरण वेळेचे काही स्लॉट आहेत?
लसीकरणासाठी राज्यांना विविध स्लॉट किंवा वेळा ठरवण्यासंदर्भात केंद्राने नियमावली दिली आहे.
मोबिलायझेशन स्लॉट - या वेळेत ऑन-साईन नोंदणी करून लसीकरण केलं जाणार आहे. आधी नोंदणी केलेल्यांना यावेळात लसीकरण करता येणार नाही.
लसीकरण केंद्रावर काही वेळ पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांसाठी ठेवण्यात आलाय.
 
ओपन स्लॉट - यावेळात सामान्य नागरिक लस घेऊ शकतील.
 
त्यामुळे जर रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला सकाळी, दुपारी अशा वेळा मिळाल्या असतील तर त्या वेळेत पोहोचून लस घ्या.
 
7. कोव्हिड होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,
 
कोरोनामुक्त झाल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे किती दिवस संरक्षण मिळतं. याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर लस घेण्याची शिफारस करण्यात आलीये.
 
कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनी लस घेता येऊ शकते.
 
8. किडनी, मधूमेह, हृदयरोग असेल तर लस घेणं सुरक्षित आहे?
कोव्हिडविरोधी लस 45 ते 59 वर्षं वयोगटातील कोमॉर्बिड रुग्णांना दिली जाणार आहे. कोव्हिड संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्यात कोमॉर्बिड रुग्णांची संख्या जास्त आहे.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत.
 
पण, लसीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं
 
9. लस घेण्याआधी औषधं घेऊ नयेत?
मधूमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.
लस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या.
 
10. लस घेतल्यावर काय खबरदारी घेऊ?
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही.
लस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला तर, जवळच्या आरोग्य केंद्रात जावं किंवा कोविन अॅपवरून लसीकरण झाल्यानंतर आलेल्या एसएमएसमध्ये नाव दिलेल्या डॉक्टरला फोन करावा.
 
11. लस फुकट आहे की पैसे देऊन?
सरकारी लसीकरण केंद्रांवर कोव्हिड-19 विरोधी लस मोफत दिली जाणार आहे.
राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोनाविरोधी लस फुकट दिली जाईल. केंद्रीय आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही कोव्हिड-19 विरोधी लस मोफत मिळणार आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी 250 रूपये मोजावे लागतील. यात 150 रूपये लशीची किंमत आणि 100 रुपये ऑपरेशन चार्जसाठी घेतले जातील.
 
12. लस घेतल्यानंतर किती दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल?
कोव्हिड-19 विरोधी लस दोन टप्प्यात दिली जाणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.
महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, "पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोस 28व्या दिवशी घेणं गरजेचं आहे."
 
13. लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे.
 
14. कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 वर प्रभावी आहे?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस व्हायरसविरोधात एकापेक्षा जास्त अॅन्टीबॉडी तयार करतात. स्पाईक प्रोटीन विरोधातही अॅन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 व्हायरसवर प्रभावी नक्कीच असेल. त्यासोबत अभ्यासातून निदर्शनास आलंय की, म्युटेशनमुळे लसीच्या प्रभावावर काही परिणाम होणार नाही.
 
15. एचआयव्हीग्रस्त व्यक्ती लस घेऊ शकतात?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, एचआयव्हीग्रस्त आणि कॅन्सरची औषध घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते.
पण, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या लशींमध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे व्यक्ती लस घेऊ शकतात. पण, त्यांच्यासाठी लस तेवढी प्रभावी नसेल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लसीकरण : लशीबद्दलचे समज-गैरसमज, कोणते खरे, कोणते खोटे?