प्रमिला कृष्णन
देशभरात आणि महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे. डेंग्यूच्या साथीमुळे मागच्या दोन वर्षात देशभरातील 600 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल चार लाख लोकांना डेंग्यू झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 जुलैपर्यंत डेंग्यूचे 2742 रुग्ण आढळले. यावर्षी एकाही डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.
मागील वर्षी जुलैअखेरीस 1981 रुग्ण सापडले होते तर 6 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. याचबरोबर चिकुनगुनियाचे यंदा 21 जुलैपर्यंत 325 रुग्ण सापडले आहेत. मागील वर्षी जुलैअखेरीस ही संख्या 493 होती.
एकीकडे डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे या आजाराची लस तयार करण्याचे प्रयत्न तेवढ्याच वेगाने अपयशी ठरत आहेत.
त्यामुळं आरोग्य यंत्रणांपुढे डेंग्यूची लागण झाल्यानंतर होणारे मृत्यू कमी करणं हे एक नवीन आव्हान उभं ठाकलं आहे.
डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांना एडिस इजिप्ती म्हणतात. हा डास प्रदूषित पाण्यापेक्षा साचलेल्या स्वच्छ पाण्यात जास्त आढळतो. त्यामुळे भारतीय आरोग्य विभाग डेंग्यूपासून वाचण्यासाठी केवळ डासांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि इतर सुरक्षेचे उपाय करण्याचा सल्ला देत असतं.
डेंग्यूची लस तयार करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत आणि ज्या लशींचा शोध लावला गेला त्या लशी प्रभावी का नव्हत्या? या प्रश्नांची उत्तरं आम्ही काही तज्ज्ञांकडून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायांबाबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या माहितीचाही आम्ही यासाठी अभ्यास केला.
डेंग्यूच्या विषाणूंचे एकूण प्रकार आहेत?
कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या सौम्या स्वामीनाथन यांच्याशी आम्ही याबाबत संवाद साधला. त्यांनी सांगितलं की डेंग्यूचा विषाणू हा कोरोना विषाणूपेक्षा अधिक घातक आहे.
डेंग्यूवर आजपर्यंत कोणतीही लस बनवली गेली नाही आणि यामुळेच हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचं डॉ. सौम्या स्वामीनाथन सांगतात.
डेंग्यूच्या विषाणूंचे एकूण चार प्रकार आहेत. DENV1, DENV2, DENV3 आणि DENV4 असे हे एकूण चार प्रकार आहेत. दरवर्षी या चारपैकी एखाद्या प्रकारच्या विषाणूची साथ पसरते. महत्त्वाची बाब म्हणजे डेंग्यूच्या एका प्रकारावर तयार करण्यात आलेली लस ही त्याच्या दुसऱ्या प्रकाराची लागण होण्यापासून संरक्षण देऊ शकत नाही.
डॉ. सौम्या म्हणतात की, "चारही प्रकारच्या डेंग्यूपासून संरक्षण देणारी सुरक्षित लस शोधण्यात अजूनही यश मिळालेलं नाही. जगभरात वापरता येऊ शकेल अशी लस शोधणं हे अजूनही एक आव्हान आहे आणि ते तेवढंच गरजेचं देखील आहे कारण कोणत्या देशात, कोणत्या प्रकारच्या डेंग्यूची साथ पसरेल हे सांगता येत नाही."
2015 मध्ये पहिल्यांदा डेंग्यूवर लस तयार करण्यात आली मात्र चारही प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात ही लस अपयशी ठरली होती.
अमेरिकेतील प्रतिबंधात्मक औषधाशी संबंधित अभ्यासात सहभागी असलेले के. मुथुमनी यांनी पहिल्या लशीबाबत असे घडल्याचं सांगितलं.
डेंग्यूच्या पहिल्या लशीवरून वाद निर्माण झाला होता
Sanofi Pasteur (Sanofi Pasteur) या फ्रेंच कंपनीने Dengvaxia नावाची डेंग्यूची लस पहिल्यांदा बाजारात आणली होती. 2015 मध्ये या इंजेक्शनवाटे देण्यात येणाऱ्या या लशीला परवानगी देण्यात आली आणि मेक्सिकोमध्ये एक वैद्यकीय चाचणीदेखील घेण्यात आली.
मात्र लस बनवणाऱ्या Sanofi Pasteur या कंपनीने ही लस केवळ 9-45 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठीच वापरता येऊ शकते असं सांगितलं होतं.
या लशीचा वापर नेमका कसा थांबवला गेला? याबाबत बोलताना के. मुथुमनी यांनी सांगितलं की, "Dengvaxia ही लस बाजारात आल्यानंतर दोनच वर्षात अनेक देशांमध्ये तिचा वापर सुरू झाला. परंतु काही महिन्यांतच, लसीच्या परिणामकारकतेबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या.
ज्या देशांमध्ये एकापेक्षा अधिक प्रकारच्या डेंग्यूच्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला होता, त्या देशांमध्ये ही लस परिणामकारक ठरत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही लस वापरताना वयाची अट घातली गेली असल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिचा प्रयोग करता येत नव्हता त्यामुळे अल्पावधीतच ही लस कुचकामी ठरू लागली."
फिलीपिन्समध्ये, 2017 मध्ये शाळकरी मुलांना डेंगव्हॅक्सिया नावाची ही लस दिली गेली. आणि त्यानंतर काही आठवडयांनी त्या वेळी लसीकरण केलेल्या काही मुलांना डेंग्यूचा ताप आला होता.
त्यानंतर फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ही लस घेतलेल्या तब्बल 130 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. यामुळे ही लस वादाच्या भोवऱ्यात अडकली आणि फिलिपिन्समध्ये सुरू झालेला हा वाद हळू हळू इतर देशांमध्ये पसरला.
म्हणून, थायलंड, ब्राझील, एल साल्वाडोर, पॅराग्वे, ग्वाटेमाला, पेरू, इंडोनेशिया आणि इतर देशांनी हळूहळू या लशीचा वापर थांबवला.
डेंग्यूच्या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत?
डॉ सौम्या स्वामीनाथन म्हणतात की डेंग्यूचा प्रभाव इतर विषाणूंपेक्षा खूप वेगळा आहे इतर विषाणूंपेक्षा तो अधिक धोकादायक आहे.
त्यामुळे एकदा डेंग्यूच्या तापातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा डेंग्यूची लागण झाल्यास त्या रुग्णाला अधिक त्रास होऊ शकतो किंवा वेळेत उपचार न केल्यास मृत्यूदेखील ओढवू शकतो.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, "लोकांचा असा विश्वास आहे की इतर तापांप्रमाणे एकदा या आजारावर मात केली की दुसऱ्यांदा या तापाची लागण झाल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगल्या पद्धतीने त्या तापाचा मुकाबला करू शकेल.
मात्र डेंग्यूचे प्रकरण थोडे वेगळे आहे. दुसऱ्यांदा डेंग्यूची लागण झाल्यास तो अधिक धोकादायक आणि जीवघेणा ठरू शकतो. याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे डेंग्यूचे असणारे वेगवेगळे प्रकार, एकदा एखाद्या प्रकारच्या डेंग्यूची लागण झाली की दुसऱ्यांदा देखील त्याच प्रकारचा डेंग्यू तुमच्या शरीरावर आक्रमण करेल हे ठामपणे सांगता येत नाही.
त्यामुळे पहिल्यांदा तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती दुसऱ्यांदा तुमच्या शरीराला मदत करण्याची शक्यता तशी कमीच आहे."
कोरोना विषाणूचे देखील वेगवेगळे प्रकार असताना त्या आजाराची लस तयार करून जगभर तिचा वेगाने प्रसार करण्यात माणसाला यश मिळालं मात्र डेंग्यूच्या चार प्रकारांवर अजूनही लस का तयार करण्यात आलेली नाही हा प्रश्नच आहे.
कोरोनापेक्षा डेंग्यूचा विषाणू नेमका किती घातक आहे हेदेखील तपासलं पाहिजे.
यावर बोलताना त्या म्हणाल्या की, "कोरोनाचे वेगवेगळे प्रकार असताना देखील ज्या पद्धतीने कोरोनाच्या लशींनी काम केलं ते अत्यंत आश्चर्यकारक आहे आणि दुसरीकडे एवढ्या वर्षांमध्ये डेंग्यूवर लस निर्माण होऊ शकलेली नाही हेदेखील एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
त्यामुळे डेंग्यूचा विषाणू काहीतरी विलक्षण आहे असंच म्हणावं लागेल. प्रत्येक विषाणूची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे डेंग्यूच्या विषाणूचे नेमके स्वरूप काय आहे याचा अधिक अभ्यास झाला तर आणि तरच यामध्ये काहीतरी यश मिळू शकतं.
आपण असं म्हणू शकतो की कोरोना विषाणूच्या संदर्भात आपण नशीबवान होतो पण डेंग्यूच्या बाबतीत मात्र अजूनही नशिबाने साथ दिलेली नाही."
जगभरात डेंग्यूच्या लशीवर काय काम झालंय?
जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल या औषधनिर्मिती कंपनीने अनेक वर्षं अभ्यास केल्यानंतर 2022 मध्ये 'टाक 003' ही लस बनवली.
मात्र हे लसही परिणामकारक ठरू शकली नाही. यावर बोलताना के. मुथुमनी म्हणतात की, "या लशीच्या वैद्यकीय चाचणीनंतर ही लस डेंग्यूच्या तीन प्रकारांवर काम करते असं लक्षात आलं मात्र डेंग्यूच्या एका विशिष्ट प्रकाराला रोखण्यात ही लस अपयशी ठरत होती.
यात भरीस भर म्हणून वैद्यकीय चाचण्या घेत असताना अनेक गंभीर परिणाम झाले. यामुळे या लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे या औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली."
यानंतर आम्ही Butantan-DV नावाच्या ब्राझिलियन लसीबद्दल माहिती मिळवली. ब्राझील सरकारच्या अधिकृत वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या लशीची एक वैद्यकीय चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये 16,000 लोक सहभागी झाले होते.
त्यातील 79.6% लोकांवर या लशीचे सकारात्मक परिणाम दिसून आले मात्र ही लस देखील डेंग्यूपासून संपूर्णपणे संरक्षण देऊ शकली नाही.
युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मर्क (मर्क) आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (ग्लॅक्सोस्मिथक्लाइन) सारख्या जागतिक खाजगी औषध कंपन्यांनी देखील अहवाल दिला आहे की ते डेंग्यूवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतातही डेंग्यूवर लस शोधण्याचा प्रयत्न सरकारतर्फे आणि दोन खाजगी औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
डेंग्यू काळानुसार बदलत जातो
डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण देणारी लस सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही हीच एक समस्या आहे. डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव आता नवीन टप्प्याकडे सरकतो आहे, त्यामध्ये विविध बदल होत आहेत. आतापर्यंत फक्त उष्ण कटिबंधात आढळणारे डेंग्यूचे डास आता थंड प्रदेशातही आढळून येत आहेत.
अलीकडेच डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याला भेट दिली होती.
त्यांना या प्रदेशात सुमारे 5,000 फूट उंचीवर डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव आढळून आला. एवढ्या उंचावर डेंग्यूचे डास आढळून आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
"आजपर्यंत डेंग्यूचे डास हे केवळ उष्ण कटिबंधीय क्षेत्रात आढळून येत असत, थंड प्रदेशात या डासांचा निभाव लागत नसे.
त्यामुळे आजपर्यंत केवळ उष्ण प्रदेशात आढळून येणारे हे डास थंड प्रदेशातही आढळून येत आहेत. जगभरातील हवामान बदलाचा हा कदाचित एक परिणाम असू शकतो," असे डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या.
नुकत्याच भारतात आढळून आलेल्या निपाह विषाणूच्या संक्रमणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "डेंग्यूप्रमाणेच निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झालेला रुग्ण भारतात आढळून येणं ही एक आश्चर्यकारक घटना आहे. 2018 पूर्वी भारतात निपाहचा प्रादुर्भाव झालेला रुग्ण आढळून आलेला नव्हता.
पण 2018 नंतर दरवर्षी, विशेषत: केरळमध्ये, एकट्या कोझिकोड जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळून येतात. असं का घडतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अजूनही विज्ञानाला यश मिळालेलं नाहीये."
याचप्रमाणे हेदेखील लक्षात घ्यायला हवं की बदलत्या काळानुसार स्वतःला टिकवण्यासाठी डेंग्यूचा विषाणूदेखील स्वतःमध्ये बदल करतो आहे.
डेंग्यूवर काही उपचार करता येतो का?
डेंग्यूच्या लशीचा अजूनपर्यंततरी शोध लागलेला नसला तरी डेंग्यूची लागण झाल्यास काय करावं याविषयी बोलताना मुथुमनी म्हणतात की, "डेंग्यूची लागण झाल्यास कोणती औषधं वापरली पाहिजेत याविषयी देखील फारसं संशोधन किंवा अभ्यास झालेला नाही.
डेंग्यू तापाची लागण झाल्यानंतर, हा विषाणू संपूर्ण शरीरात पसरू नये आणि अंतर्गत अवयवांवर परिणाम होऊ नये यासाठी गोळीच्या स्वरूपात औषध देण्याच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.
उदाहरणार्थ, औषधे एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही (एड्स) ची लागण झाल्यानंतर निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे डेंग्यू झाला तरी त्यावर नियंत्रण मिळवून पीडित व्यक्तीला वाचवणाऱ्या औषधांचा शोध लागेल अशी अपेक्षा तर आपण करूच शकतो."
IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे याबाबत सांगतात की, "डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं."
डॉ. भोंडवे सांगतात की "डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसंच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवं. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा."