Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरसः अहमदाबाद हॉस्पिटलमध्ये हिंदू-मुस्लीम आधारावर कोरोना वॉर्डांची विभागणी

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:33 IST)
रॉक्सी गागडेकर छारा
 

धर्माच्या आधारावर कोरोनाच्या रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे, असा आरोप अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलवर करण्यात आला आहे.

इथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचं म्हणणं आहे की 12 एप्रिलआधी कोरोनाग्रस्त सर्व रुग्णांना एकाच वॉर्डमध्ये ठेवलं होतं. मात्र, आता हिंदू आणि मुस्लीम रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं आहे.
या हॉस्पिटलच्या C4 वॉर्डात आता केवळ मुस्लीम रुग्णं आहेत. मात्र, 12 एप्रिलआधी आलेल्या सर्व रुग्णांना A4 वॉर्डमध्ये ठेवलं होतं, असं इथं दाखल करण्यात आलेल्या एका 19 वर्षीय रुग्णानं सांगितलं तर, 12 एप्रिलच्या रात्री मुस्लिम रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात अधिक चांगल्या सोयी असल्याचं सांगत तिकडे शिफ्ट व्हायला सांगितलं. मात्र, हिंदू रुग्णांना तिथेच ठेवलं, असं दुसऱ्या एका रुग्णानं बीबीसीशी फोनवर माहिती देताना सांगितलं.
C4 वॉर्डमधल्या एका रुग्णाने फोनवरून बोलताना सांगितलं की त्यांनी आणि इतरही काही रुग्णांनी याचं कारण विचारलं. मात्र, समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
C4 वॉर्डमध्ये एकही हिंदू रुग्ण नव्हता. त्यामुळे हा निर्णय धर्माच्या आधारावर घेण्यात आल्याचं आपल्याला नंतर कळल्याचं या रुग्णांचं म्हणणं आहे.
याच वॉर्डातल्या आणखी एका रुग्णाने बीबीसीला सांगितलं, "संपूर्ण C4 वॉर्डात केवळ मुस्लीम रुग्ण आहेत."
मात्र, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. जी. एच. राठोड यांनी धर्माच्या आधारावर रुग्णांना वेगळं ठेवण्यात आल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांच्या आरोग्याची स्थिती बघून हा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
याआधी डॉ. राठोड यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले आहेत की सरकारी आदेशानंतर हिंदू-मुस्लीम वॉर्ड बनवण्यात आले आहेत.
मुस्लिम कार्यकर्ते दानिश कुरैशी यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या त्यांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितलं की हॉस्पिटलमधल्या काही हिंदू रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली होती की त्यांना मुस्लीम रुग्णांसोबत राहाणं सुरक्षित (कम्फर्टेबल) वाटत नाही.
आणखी एक मुस्लीम नेते इकराम मिर्जा यांनी सांगितलं की असं होण्यामागचं कारण म्हणजे, 'लोकांना आमच्यासोबत रहायचं नाही आणि सरकार अशा घटनाविरोधी आणि लोकशाहीविरोधी मार्गाने लोकांना वेगळं करून त्यांची बाजू घेत आहे.'
डॉ. राठोड यांनी मात्र, हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानेही त्यांच्या ट्वीटर हँडलवरून अशाप्रकारचे वृत्त निराधार आणि गोंधळ माजवणारे असल्याचं म्हटलं आहे.
ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आरोग्याची स्थिती, लक्षणं आणि वयाच्या आधारे वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये ठेवलेलं आहे."
गुजरातचे आरोग्य मंत्री किशोर कणानी यांनी बीबीसीला सांगितलं की रुग्णांना कुठे ठेवायचं हे डॉक्टर ठरवतात.
ते म्हणाले, "धर्माच्या आधारे रुग्णांना वेगवेगळं ठेवा, असा कुठलाही आदेश सरकारने दिलेला नाही. मात्र, डॉक्टर असं करत असतील तर ते त्यांच्या गरजेनुसार करत असतील."
त्यांना जेव्हा हे विचारलं की, डॉक्टर धर्माच्या आधारावर रुग्णांना वेगळं करू शकतात का, यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला, "तुम्ही कोरोना विषाणुचा सामना करणाऱ्या लोकांसोबत आहात की नाही? तुम्ही अशा मुद्द्यांकडे लक्ष न देता लोकांना त्यांची कामं करू दिली पाहिजे."
गुजरात सरकारने अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला कोव्हिड-19 आजारासाठी नोडल हॉस्पिटल घोषित केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये 1200 बेड आहेत. हे नवीन हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव आहे.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल आणि सरदार वल्लभभाई पटेल वी. एस. हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण मुस्लीम आहेत.

प्रोटोकॉल काय सांगतो?

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार कोव्हिड-19 रुग्णांची 3 प्रकारात विभागणी करता येते.
पहिल्या वर्गात ते रुग्ण आणि संशयित असतात ज्यांची लक्षणं अगदीच सौम्य आहेत. दुसऱ्या वर्गात ते रुग्ण असतात ज्यांची लक्षणं मध्यम स्वरुपाची आहेत.
आणि तिसऱ्या वर्गात गंभीर स्वरुपाची लक्षणं असणारे रुग्ण असतात. रुग्णांना धर्माच्या आधारावर वेगळं ठेवण्याचे कुठलेच निर्देश नाहीत.

गुजरातमध्ये कोरोनाचा फैलाव

बुधवारी सकाळपर्यंत गुजरातमध्ये कोव्हिड-19 आजाराचे 617 रुग्ण आढळले होते. 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबादमधल्या वॉल्ड सिटी भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा भाग हॉटस्पॉट आणि बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मृत्यूदराची तुलना करता गुजरातची स्थिती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इतकीच गंभीर आहे. गुजरातमधला कोरोनाचा मृत्यूदर 4.3% आहे. मध्य प्रदेशात 6.84% तर महाराष्ट्रात 6.62% आहे.

गुजरातचा मुस्लीम समाज

काही दिवसांपूर्वी अहमदाबाद पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजवर कारवाई केली होती. या मेसेजमध्ये मुस्लिमांवर दिल्लीतील निजामुद्दीन मरकजनंतर कोरोना विषाणू पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केली होती. या कारवाईनंतरसुद्धा मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवणाऱ्या मेसेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अनेक मुस्लीम नेत्यांना वाटतं की कोरोना विषाणुच्या फैलावानंतर हिंदू आणि मुस्लीम यांच्यातली दरी आणखी वाढली आहे.
वेजलपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका मुस्लीम गटाच्या सदस्यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप होता.
मुस्लीम भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेषतः गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना तबलिगी जमातमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात विशेष वाढ करण्यात आली.
सध्या अहमदाबादमधल्या ज्या वॉल्ड सिटी भागात कर्फ्यू आहे तो मुस्लीमबहुल भाग आहे. याव्यतिरिक्त दानीलिमदा या मुस्लीमबहुल भागातही संचारबंदी आहे.
अहमदाबादचे पोलीस आयुक्त आशिष भाटिया यांनी ट्वीटवरून सांगितलं, "वॉल्ड सिटी आणि दानीलिमदा या भागांमध्ये आठवडाभरासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे कोरोना संक्रमणाच्या फैलावाला नियंत्रणात आणण्यात मदत होईल. या भागातल्या सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या प्रयत्नात सहकार्य करावं."
अहमदाबाद महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार 14 एप्रिलपर्यंत शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 346 होती. यातले 200 पेक्षा अधिक रुग्ण वॉल्ड सिटी भागातले होते.
शहरात आतापर्यंत 6,595 लोकांची कोव्हिड-19 चाचणी घेण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments