'जर आपण धर्म पाहून लोकांना जेऊ घातलं तर देव आपल्याकडे बघणं सोडून देईल.'
हे म्हणणं आहे मुजम्मिल आणि तजम्मुल या दोन भावंडांचं.
कर्नाटकातल्या कोलार येथे राहणा-या या दोन भावांनी लॉकडाऊनमध्ये गरिबांना जेवण देण्यासाठी आपल्या जमिनीचा काही भाग विकला. त्यातून त्यांना 25 लाख रुपये आलेत.
या पैशांमधून त्यांनी लोकांसाठी किराणा सामान आणि गरजेच्या वस्तू घेतल्या.
37 वर्षाच्या मुजम्मिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "असे अनेक लोक आहेत जे प्रचंड गरीब आहेत. त्यांच्याकडे खाण्यासाठी काही नाही. एकेकाळी आम्हीही गरीब होतो. आम्हालाही लोकांनी भेदभाव न करत मदत केली."
लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंबासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काम नसल्याने लोकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे. हे जेव्हा दोन्ही भावांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपली जमीन विकण्याचा निर्णय घेतला.
मुजम्मिल सांगतात, "आम्ही ही जमीन आमच्या एका मित्राला विकली. तो चांगला माणूस आहे. त्याने आम्हाला 25 लाख रुपये दिले. या काळात अनेक मित्रांनी सहकार्य केलं. कुणी 50 हजार रुपये दिले तर कुणी 1 लाख रुपये. खरं तर आत्तापर्यंत आम्ही किती मदत केली याचा खर्च सांगणं योग्य नाही. जर देव पाहत असेल तर तेवढं पुरेसं आहे."
भेदभाव न करता केली मदत
ते सांगतात, "आम्ही गरिबांना जेवण द्यायला सुरुवात केली. ज्या कुणालाही मदतीची गरज आहे असं आम्हाला कळलं तिथं आम्ही जायचो. त्यांना 10 किलो तांदूळ, 2 किलो पीठ, 1 किलो डाळ, 1 किलो साखर, 100-100 ग्राम लाल मिर्ची, हळद, मीठ, साबण इत्यादी साहित्य आम्ही द्यायचो."
रमजान सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत आणि या दोन दिवसात आम्ही अडीच ते तीन हजार लोकांना जेवणासह इतर गरजेचे साहित्य दिले आहे.
दोघं भाऊ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी तजम्मुल चार वर्षांचे होते तर मुजम्मिल तीन वर्षांचे होते. वडिलांच्या निधनाच्या 40 दिवसातच त्यांची आईपण गेली. त्यांच्या आजीनेच त्यांना लहानाचं मोठं केलं.
मशिदीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना मशिदीत राहण्याची जागा दिली.
मशिदीजवळच्या भाजीपाल्याच्या दुकानावर दोघांनी काम करायला सुरुवात केली.
मुजम्मिल सांगतात, "आम्ही फार शिकलो नाहीत. 1995-96 मध्ये आम्ही दररोज 15-18 रुपये कमवत होतो. काही वर्षांनी माझ्या भावाने भाजीपाल्याचं दुकान टाकायचं ठरवलं."
काही काळातच दोन्ही भावांनी आणखी काही अनेक दुकानं सुरू केली. आता ते आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या ठिकाणाहून केळी आणून व्यापार करतात.
गरीबांना जेवण देण्याचा विचार कुठून आला?
मुजम्मिल सांगतात, "आमची आजी आम्हाला सांगायची की आम्हाला अनेकांनी मदत केली आहे. कुणी पाच रुपयाची मदत करायचं तर कुणी दहा रुपये."
"धर्म हा फक्त पृथ्वीवर आहे. देवाकडे नाही. तो आपल्या सगळ्यांवर लक्ष ठेवतो तो फक्त आपली भक्ती पाहतो. बाकी काही नाही," असं मुजम्मिल यांना वाटतं.