पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोव्हिड 19ची लागण झाल्याचं पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
68 वर्षांचे इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचं फैसल सुलतान यांनी ट्वीट केलंय.
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे माजी कप्तान असणारे इम्रान खान राजकारणात उतरले आणि ऑगस्ट 2018मध्ये देशाचे पंतप्रधान झाले.
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोव्हिडच्या लशीचा पहिला डोस घेतला होता.
पण लस घेतल्यानंतरही त्या व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती तयार व्हायला काही काळ लागतो. त्यामुळे लस घेतलेल्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याचा धोका असतोच.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात कोव्हिड 19च्या जागतिक साथीच्या काळात आतापर्यंत एकूण 13,799 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत, तर एकूण 6,23,135 जणांना कोव्हिडची लागण आतापर्यंत झालेली आहे.
पंतप्रधान इम्रान खान नियमितपणे सगळ्या बैठकांना हजेरी लावत होते. राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या सुरक्षा विषयक कॉन्फरन्सही ते हजर होते. या कॉन्फरन्सला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय.
शुक्रवारी त्यांनी मास्क न घालता कॉन्फरन्सला हजेरी लावली आणि गरीबांसाठीच्या घरकुल प्रकल्पाचं उद्घाटनंही केल्याचं रॉयटर्सने म्हटलंय.
त्यांना खोकला येऊ लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आल्याचं बीबीसीचे पाकिस्तानचे प्रतिनिधी सिकंदर किरमाणी सांगतात.
पाकिस्तानात 10 मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू झाली असून सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येतेय.
सायनोफार्म सोबतच पाकिस्तानात कॅनसिनोबायो, ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनका आणि स्पुटनिक 5 लशींना मान्यता देण्यात आलीय.