Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

इंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का? - फॅक्ट चेक

इंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का? - फॅक्ट चेक
भारतीय युवक काँग्रेसच्या युवा देश या ऑनलाईन मासिकाने नुकतंच एक ट्वीट केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या दोन खासदारांना राजीनामा द्यायला सांगितला आणि अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांसाठी मार्ग मोकळा केला. त्यावेळी भाजपने लोकसभेच्या एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. त्यात कॅप्शन दिलंय, "लोकशाही ही अशी गोष्ट आहे जिथे दुर्बळ आणि सशक्तांना समान संधी मिळते. उदा. इंदिरा गांधींनी अडवाणी आणि वाजपेयींना संधी दिली होती."
 
हा दावा फेसबुकवरही शेअर करण्यात आला होता. त्याला कॅप्शन दिलं आहे, "जेव्हा भाजपला एकही जागा मिळाली नाही तेव्हा इंदिराजींनी त्यांच्या दोन खासदारांना राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागा अटलजी आणि अडवणीजींना दिल्या." लोकांनी या वक्तव्याची पडताळणी करण्यासाठी कोरा या वेबसाईटवरही प्रश्न विचारले. या प्रश्नाला दिलेलं उत्तर 11,000 वेळा लोकांनी पाहिलं आहे. बीबीसीच्या वाचकांनीही या दाव्याच्या पडताळणीसाठी विचारणा केली. आम्हाला हा दावा खोटा असल्याचं लक्षात आलं.
 
दाव्याची पडताळणी
जानेवारी 1980 मध्ये निवडणुका झाल्यानंतर 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पक्षाची अधिकृतरीत्या स्थापना झाली. पक्षाने पहिली निवडणूक 1984 मध्ये लढविली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ही पहिलीच निवडणूक होती.
 
या निवडणुकीत काँग्रेसने 404 जागा जिंकल्या आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या. ही भाजपची सगळ्यात वाईट कामगिरी होती. गुजरातमधील मेहसानामधून डॉ. ए. के. पटेल आणि आंध्र प्रदेशमधील हनामाकोंड येथून चंदुपटाला जंगा रेड्डी या दोन जागांवरच भाजपला विजय मिळाला होता. ग्वाल्हेरमधून 1984 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनाही पराभव पत्करावा लागला होता. मात्र तेव्हा इंदिरा गांधी या जगात नव्हत्या. तर अडवाणी 1970 ते 1984 या काळात राज्यसभेचे खासदार होते.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किदवई बीबीसीशी बोलताना म्हणाले, "प्रथमदर्शनी मला ही फेक न्यूज वाटते. 1984 च्या निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधीची हत्या झाली होती आणि त्या जिवंत असत्या तरी त्यांनी असं काही केलं नसतं." ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनीही हा दावा खोटा असल्याचं सांगितलं.
 
"हा दावा चूक आहे. एखाद्या खासदाराला असं हटवून दुसऱ्या पक्षाच्या खासदाराला नियुक्त करणं इतकं सोपं नाही. तसंही तुम्हाला जर कुणाला अशी जागा द्यायची इच्छा असेल तर त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात." ज्येष्ठ पत्रकार कुमकूम चड्डा यांनी इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीही हा दावा खोटा असल्याचं बीबीसीला सांगितलं. "वाजपेयी आणि अडवाणी त्या काळीही श्रेष्ठ नेते होते. असं काही झालं असतं तर त्यांनी नक्कीच कुठेतरी या घटनेचा उल्लेख केला असता. मी याआधी असं काही ऐकलं नव्हतं हे खोटं आहे." ते म्हणाले.
 
भाजपाची स्थापना
भारतीय जनता पक्ष आधी भारतीय जनसंघ नावाने ओळखला जायचा. त्याची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. त्यानंतर जनता पक्षात विलीनीकरण केलं. इंदिरा गांधी नेतृत्व करत असलेल्या काँग्रेसच्या विरोधकांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली होती. जनसंघ हा त्याचाच एक भाग होता. जनता पक्षाने 1977 साली काँग्रेसचा पराभव केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार स्थापन केलं.
 
जनता पक्षाच्या अनेक सदस्यांनी पक्षत्याग केला. कारण त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ असं दुहेरी सदस्यत्व घेण्यास परवानगी नव्हती. त्याला प्रतिसाद म्हणून जनसंघाच्या काही सदस्यांनी एक नवीन राजकीय पक्ष तयार केला. तोच आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो. इंदिरा गांधींच्या हत्येच्या आधी भारतीय जनता पक्षाने कोणत्याच निवडणुकीत भाग घेतला नव्हता.
 
अडवाणींची कारकीर्द
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना म्हणजेच 1962 आणि 1967 च्या काळात अडवाणी ऑर्गनायझर या मासिकाचे सहाय्यक संपादक होते. हे मासिक म्हणजे जनसंघाचं मुखपत्र होतं. 1970 ते 1984 या काळात अडवाणी राज्यसभेचेही खासदार होते आणि त्या काळात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. ते 1970 मध्ये दिल्लीतील राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्त झाले. त्यानंतकर 1976 मध्ये गुजरातमधून आणि 1982 तसंच 1988 मध्ये ते मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्त झाले. राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहात एखादी व्यक्ती खासदार होऊ शकत नाही.
 
वाजपेयींची कारकीर्द
1977 मध्ये स्थापन झालेलं जनता पक्षाचं सरकार हे केंद्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं. मोरारजी देसाई तेव्हा पंतप्रधान होते आणि वाजपेयी त्यांच्या काळात परराष्ट्र मंत्री होते. इंदिरा गांधींचा 1977 च्या निवडणुकीत पराभव झाला आणि त्या 1980 मध्ये त्या पुन्हा सत्तेवर आल्या. वाजपेयी यांना नवी दिल्ली मतदारसंघातून 1980 मध्ये विजयी झाले होते. 1984 च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयींचा पराभव झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते : केजरीवाल