Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिटकॉईनबद्दल या 6 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Webdunia
बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (11:18 IST)
डॅन मॅकअॅडम आणि डॅनियल पालुंबो
29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर केलं जाणार आहे. या अधिवेशनात एकूण 26 विधेयकं सादर केली जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी बोलताना जगभरातल्या देशांनी क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
भारतात क्रिप्टोकरन्सी लाँच करण्यासाठी आरबीआयने तयारी सुरू केली असून संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकाद्वारे क्रिप्टोकरन्सीतली गुंतवणूक, डेव्हलपर, मायनिंग याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
आर्थिक विश्वात पहिल्यांदाच बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीची नोंद एका स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. डिसेंबर 2017मध्ये शिकागोच्या CBOE फ्युचर्स एक्स्चेंजमध्ये बिटकॉईनची विक्री 15 हजार डॉलरपासून सुरू झाली.
पहिल्या 20 मिनिटांमध्ये तरी या डिजिटल करन्सीचं स्टॉक मार्केटमधलं भवितव्य प्रचंड अस्थिर होतं. त्याचं मूल्य 16,600 डॉलर्स एवढं वर गेलं आणि नंतर त्याचा दर घसरला.
बिटकॉईनचं मूल्य वर्षाच्या सुरुवातीला फक्त एक हजार डॉलर एवढं होतं. दोन दिवसांपूर्वीच तो आकडा 17 हजार डॉलरच्या टप्प्याला भेदून परत आला होता.
बिटकॉईनमध्ये ट्रेडिंग करून कित्येक लोक कोट्यधीश झालेत. आणि याचे भाव काही कमी होताना सध्या दिसत नसल्याने या चलनाविषयी आकर्षण असणं साहजिकच आहे. पण सावधगिरीही तितकीच महत्त्वाची.
शेअर मार्केटमध्ये नोंद झालेल्या या क्रिप्टो करन्सीचं ट्रेडिंग करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणं अत्यावश्यक आहे.
 
बिटकॉईन म्हणजे काय ?
सोप्या शब्दात सांगायचं तर सध्याच्या चलनी नोटांना पर्याय असलेल्या डिजिटल करन्सीचंच आणखी एक रूप असतं बिटकॉईन.
तुमच्या खिशातली नाणी किंवा नोटा प्रत्यक्ष अस्तित्वात असतात. पण बिटकॉईन हे आभासी चलन आहे. ते ऑनलाईन उपलब्ध असतं.
बिटकॉईनचं वास्तव चलन देणारी काही खास ATM मशीन असली, तरी ते चलन म्हणजे केवळ टोकन म्हणून व्हर्च्युअल धन म्हणून हाती येतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पारंपरिक बँका किंवा सरकार हे चलन छापत नाही.
"म्हणजे ते सर्वमान्य असं हे चलन नाही. तुम्हाला तुमचा कर किंवा इतर कोणतंही शुल्क या बिटकॉईनद्वारे चुकवता येणार नाही," असं केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलचे डॉ. गॅरिक हॅलिमन सांगतात.
'मायनिंग' या अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन्स बनवली जातात. जगभरात काँप्युटरच्या माध्यमातून या बिटकॉईन्सचं नियंत्रण केलं जातं.
दिवसाला 3,600 पेक्षा जास्त बिटकॉईन आभासी आर्थिक विश्वात पसरवली जातात. आजवर एकूण 1.65 कोटी बिटकॉइन्स जगभरात चलनात आहेत.
बिटकॉईनचं मूल्य मात्र इतर चलनांप्रमाणेच मागणीवरून ठरवलं जातं.
 
बिटकॉईनची भरभराट का?
या प्रश्नाचं उत्तर अर्थतज्ज्ञही अजून शोधत आहेत.
काही म्हणतात की, हा आर्थिक बुडबुडा आहे. या गुंतवणुकीच्या लाटेत आपण मागे पडायला नको, या भीतीने गुंतवणूकदार या बिटकॉईन्सच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा जास्त किंमत देण्यासाठीही तयार आहेत.
बिटकॉईनच्या या भरभराटीची तुलना ते 17व्या शतकात झालेल्या 'डच ट्युलिप बल्ब' प्रकरणाशी किंवा इंटरनेट कंपन्यांच्या लाटेनंतर आलेल्या ऑनलाईन व्यावसायांच्या सागरात आलेल्या भरतीशी करतात.
काहींच्या मते बिटकॉईन आता हळूहळू आर्थिक जगताच्या मुख्य प्रवाहात येत असल्यामुळे ही भरभराट होत आहे.
"आतापर्यंत बिटकॉईन्सची वाटचाल केवळ अंदाजांवर सुरू होती. पण आता बिटकॉईन्सचा वापर वाढल्याचंही स्पष्ट होत आहे," असं डॉ. हॅलिमन सांगतात.
एप्रिलमध्ये हे आभासी चलन वापरणाऱ्यांची संख्या 30 ते 60 लाख एवढी होती. आता ती वाढून एक ते दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे.
ही वाढ अत्यंत झपाट्याने होत आहे. हा आकडा नेदरलँड किंवा चिली या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
 
बिटकॉईन्स विकत कशी घेतात?
या व्हर्च्युअल चनलाच्या विश्वात अनेक प्रकारची चलनं आहेत, पण बिटकॉईन हे सगळ्यांत जास्त प्रसिद्ध आहे. बिटकॉईन विकत घेण्यासाठी युजरकडे 27 ते 34 कॅरेक्टरचा एक खास अॅड्रेस असणं गरजेचं आहे.
हा अॅड्रेस एखाद्या आभासी पोस्टबॉक्ससारखं काम करतो. या पोस्टबॉक्स मधूनच बिटकॉईन्सचा व्यवहार होतो. या पत्त्याची नोंद कुठेही नसल्याने वापरकर्त्यांना त्यांची ओळख गोपनीय ठेवता येते.
खासगी बँका बुडाल्यावर तुमचे पैसेही बुडतात. तसंच इथे तुमची माहिती गहाळ झाली, तर तुमची बिटकॉईन्सही गहाळ होतात.
नियमाप्रमाणे फक्त 2.10 कोटी बिटकॉईन तयार केली जाऊ शकतात आणि दिवसेंदिवस ही संख्या जवळ येत आहे. हा आकडा गाठल्यावर बिटकॉईन्सचं मूल्य घसरेल का वधारेल, याबाबत कोणालाच काहीच सांगता येत नाही.
 
बिटकॉईन्सने काय खरेदी करता येईल?
बिटकॉईन्ससारखं आभासी चलन वापरताना ओळख गोपनीय असल्याने इंटरनेटवर वस्तू विकत घेण्याचं आकर्षण असणाऱ्या अनेकांनी ते बेकायदेशीरपणे वापरायला सुरुवात केली.
आता इंटरनेटवरून व्यवसाय करणाऱ्या अनेक छोट्या कंपन्यांनी बिटकॉइन स्वीकारायला सुरुवात केली आहे.
यात मायक्रोसॉफ्ट, एक्सपिडिया अशा मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. तोही काळ जवळच आहे जेव्हा तुमच्या आसपासच्या एखाद्या आर्ट गॅलरीत किंवा तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्येही हे बिटकॉईन स्वीकारलं जाईल.
पण रुपयासारखं किंवा डॉलरसारखं महत्त्व याला नक्कीच मिळणार नाही.
बिटकॉईन्सचं मूल्य एका वर्षात तब्बल 900 टक्क्यांनी वाढलं. त्याचा परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आणि ते चलन स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांवर निश्चितच होईल.
असं असलं, तरी बिटकॉईन वापरणारे अनेक जण त्यांचा उपयोग खरेदी करण्यासाठी करत नाहीत. 80 ते 90 टक्के बिटकॉईनधारक त्याकडे एक गुंतवणूक म्हणूनच बघत असल्याचं डॉ. हॅलिमन यांनी सांगितलं.
 
नियामकांच्या चिंतेचं कारण?
आताच्या घडीला बिटकॉईनवर कोणाचंही नियंत्रण नाही. त्याचे काही नियमही नाहीत, असं अॅशर्स्ट या लॉ फर्ममधले अर्थतज्ज्ञ ब्रॅडले राईस सांगतात.
बिटकॉईनसारखं चलन प्रामु्ख्याने डार्क वेबसारख्या अशा इंटरनेटवरून वापरलं जातं, जिथे एखादी व्यक्ती काहीतरी जुगाड केल्याशिवाय प्रवेश करू शकत नाही.
त्याच्या अस्थिरतेबद्दलही काळजी व्यक्त केली जाते.
खालील तक्त्यात बिटकॉईनची तुलना पाउंड आणि युरो अशा दोन चलनांशी केली आहे. या तीनही चलनांचं मूल्य 100 पासून सुरू केलं आणि वर्षभरातील त्यांच्या मूल्याचा आलेख तपासला, तर लक्षात येतं की बिटकॉईन कितीतरी झपाट्याने वाढलं आहे.
चीन आणि दक्षिण कोरिया यांच्या काळजीचं कारण जास्त गंभीर आहे. त्यांनी कोणत्याही व्हर्च्युअल चलनावर बंदी घातली आहे. तसंच ज्या स्टॉक मार्केटमध्ये या चलनाचं ट्रेडिंग केलं जातं, अशी मार्केटही त्यांनी बंद केली आहेत.
युकेच्या वित्तीय नियामक मंडळाने सप्टेंबरमध्ये असा इशाराही दिला होता की, 'इनिशियल कॉइन ऑफरिंग्ज' नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही निवडक कंपन्यांकडून ही करंसी विकत घेतली तर लोकांचे पैसे बुडू शकतात.
पण बिटकॉईनसाठीचं तंत्रज्ञान हे अभेद्य असल्याने काहीच धोका नाही, असं विधानही अनेक वित्तीय संस्थांनी केलं आहे.
त्यामुळेच युरोपमधील मोठमोठ्या वित्तीय नियामक संस्थांनी 'वेट अँड वॉच'चं धोरण स्वीकारलं आहे.
 
खरंच एक बुडबुडा आहे का?
बिटकॉईन हा आर्थिक बुडबुडा असल्याचं सांगणाऱ्या पत्रकारांना, तज्ज्ञांना काहीच तोटा नाही.
बिटकॉईन विकत घेण्याची अनेक कारणं असतील कदाचित, पण मुख्य कारण म्हणजे त्यांचं वाढतं मूल्य हे आहे, असं द इकॉनॉमिस्टमधल्या एका लेखात म्हटलं आहे.
एका महिन्यात बिटकॉईनचं मूल्य दुपटीने वाढलं आहे. चलनाचा दर एवढ्या झपाट्याने वाढणं अत्यंत स्फोटक आहे. त्यामुळे कधी ना कधी हा बुडबुडा फुटणार, असं अनेक जण सांगतात.
डॉ. हॅलिमन यांच्यामते बिटकॉईन संपलं, अशा घोषणाही याआधी अनेकदा झाल्या आहेत. पण प्रत्येक वेळी बिटकॉईनने उसळी मारत पुन्हा उच्चांक गाठले आहेत.
सध्या पुन्हा एकदा बिटकॉईनचा बुडबुडा फुगला आहे. लवकरच हा बुडबुडा फुटेल, असा अंदाजही डॉ. हॅलिमन यांनी व्यक्त केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments