कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो.
गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात.
मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे.
कोल्हापूर शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा नदीच्या काठावर झाली असं ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगता येतं.
राष्ट्रकुटांनी ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर या मूळ सहा गावांना सांधून त्यांच्या मध्यवर्ती महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे देऊळ नवव्या शतकात पूर्णत्वास नेलं अशी मराठी विश्वकोशात नोंद आहे.
दहाव्या-बाराव्या शतकात हे गाव शिलाहारांची राजधानी होती. मधल्या काळात वेगवेगळ्या शाह्यांचं राज्य अनुभवल्यावर मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर या गावास विशेष महत्त्व प्राप्त झालं.
मराठा साम्राज्यात दोन भाग झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन वेगवेगळ्या गाद्या निर्माण झाल्या. कोल्हापूरच्या गादीचा वारसा आजपर्यंत सुरू आहे.
आज या अंबाबाई, महालक्ष्मी मंदिराचा इतिहास विचार करायला गेलं तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे यांचा दोन्हीचा विचार करावा लागतो.
पुराणातही त्याचे उल्लेख आहेत आणि काही कागदोपत्री पुराव्यांवरही इतिहास लिहिला गेला आहे.
ख्यातनाम संपादक अरुण टिकेकर यांनी 'स्थलकाल' या पुस्तकात या मंदिराबद्दल काही माहिती दिली आहे. ते लिहितात, 'मंदिराचं गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदारानं 624 मध्ये बांधलं आणि नंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला व त्याच्याच वंशातल्या गंडरादित्यानं मंदिरावर कळस चढवला, असं मानलं जातं.'
'यादवांच्या राजवटीत तेराव्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली. खरं तर महालक्ष्मी मंदिराच्या आसमंतात अनेक देवतांची मंदिरं आहेत. मुसलमानी राजवटीत या मंदिराला वाईट दिवस आले होते, पण छत्रपतींचं राज्य स्थिरावल्यावर या मंदिराचा तसंच तिथल्या देवतांच्या मूर्तीचाही अज्ञातवास संपला असं म्हणतात,' टिकेकर लिहितात.
लक्ष्मीबद्दल मराठी विश्वकोशात पुढील नोंद सापडते. "ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता 'श्री' म्हणजेच 'लक्ष्मी' होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे.
"ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिक्लीत ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसूक्तात निर्दिष्ट आहेत. श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात.
"तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे. ती विष्णुमनोनुकूला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय. धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपांतही ती पूजनीय मानली जाते. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इ. लक्ष्मीचीच रूपे आहेत." अशी नोंद विश्वकोशात सापडते.
वासुदेव शरण यांच्या दुर्गासप्तशती (देवीमहात्म्य) या ग्रंथानुसार, 'त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापक महालक्ष्मी ही जगाचे आदिकारण आहे. तिची सगुण आणि निर्गुण अशी दोन रुपे आहेत.
सगुण रुपामध्ये तिच्या हातात म्हाळुंगाचे फळ, गदा, चर्म व पानपात्र असते तर मस्तकावर नाग, लिंग, योनी ही प्रतिकं असतात. चतुर्भुज आणि अष्टादशभुज अशी तिची दोन रुपं आहे.
महालक्ष्मी तमोगणयुक्त रुप धारण करुन महाकाली झाली आणि सत्वगुणयुक्त रुप घेऊन महासरस्वती झाली अशी कथा आहे. पुढे तिने स्वतः ब्रह्मदेव आणि लक्ष्मी यांना जन्म दिला तसेच तिच्या सांगण्यावरुन महाकालीने शंकर व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने विष्णू आणि गौरी यांना जन्म दिला. अशाप्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकारण ठरली.'
त्यात पुढे म्हटले आहे, 'भारतीय परंपरेत लक्ष्मी हे विष्णुपत्नीचे नाव आहे परंतु महा हे विशेषण लावून बनलेला महालक्ष्मी हा शब्द मात्र कधी विष्णुपत्नी या अर्थाने, तर कधी शिवपत्नी या अर्थाने तर कधी शिवपत्नी या अर्थाने वापरला असल्याचे आढळते. हे दोन अऱ्थ वर उल्लेखलेल्या अर्थापेक्षा काहीसे वेगळे आहेत.
'वाचस्पत्य या संस्कृत शब्दकोशात हे दोन्ही अर्थ दिले आहेत. लक्ष्म या शब्दाचा अर्थ चिन्ह असा असल्यामुळे लक्ष्मी या शब्दाचा अर्थ शुभ चिन्हे असलेली म्हणजेच कल्याण करणारी असा होतो. या दृष्टीने पाहाता महालक्ष्मी हे विशेषण विष्णुपत्नी व शिवपत्नी या दोघांच्याही बाबतीत अन्वर्थक ठरते. कारण त्या दोघीही कल्याणकारक देवता असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.'
प्र. कृ. प्रभुदेसाई यांच्या देवीकोश ग्रंथातील माहितीनुसार, 'ऋग्वेदातील खिलसूक्तांपैकी श्रीसूक्तात ही विष्णूपत्नी मानल्याचे आढळते. पुराणांतुनही विष्णूपत्नीचा महालक्ष्मी म्हणून निर्देश येतो. कोल्हापूरखेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णुपत्नी आहे, असे मानून मूर्ती बनवली जाते.' महालक्ष्मीचे मंदिर गोवा, झाशी, मुंबई येथेही आहे.
आजच्या महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली तर सुरुवातील महाद्वार, चारही दिशांनी द्वार, आत गेल्यावर मेंढा व बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती महालक्ष्मी-महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि चारही अनेक देवतांची मंदिरं दिसतात.
महालक्ष्मीच्या सध्याच्या मंदिराबद्दल विचारले असता मंदिर अभ्यासक डॉ. योगेश प्रभुदेसाई यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.
महालक्ष्मी समग्र दर्शन या पुस्तकात ते लिहितात, "हे मंदिर कोणी बांधले यासंबंधी काही पुरावे उपलब्ध नाहीत आणि केव्हा बांधले याबद्दल अनेक प्रवाद आहेत. जसे एका मतानुसार हे इसवी सनाच्या 8 व्या शतकात सिंद राजवटीत बांधले गेले. पण मंदिर बांधणीतंत्र पाहिले असता ते अंदाजे इ.स. 11 व्या शतकातील असावे."
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "महालक्ष्मी मंदिराचे 1055 च्या आधी आणि नंतर असे दोन टप्पे आढळतात. चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे त्याला बहुतांश भाग लाकडाचा असावा."
या मंदिराची वैशिष्ट्ये सांगताना प्रभुदेसाई म्हणाले, "हे महालक्ष्मी मंदिर एकमेवाद्वितिय असं म्हटलं पाहिजे. यात दोन मजले असून दोन गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलिकडची म्हणजे 18 व्या किंवा 19 व्या शतकातली असावीत."
मंदिराच्या रचनेबद्दल ते सांगतात, "श्रीमहालक्ष्मीच्या गर्भगृहाच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर आद्यलिंग किंवा मातृलिंग आहे. श्रीमहालक्ष्मीची मूर्ती ब्रह्मस्थानावर अून गर्भगृहाला आत न्हाणीघर, कोठार व शेजघर अशी दालने आहेत पूर्वी याचे काय प्रयोजन होते हा सांगता येत नाही. या मंदिराच्या छताचा आतला भाग पाहिला असता लाकडामध्ये जे स्थापत्य बनवले जात असे त्याचीच नक्कल दगडामध्ये घडवल्याचे दिते. एकमेकांना छेदणाऱ्या छोट्या रिपा, रिपांच्या छेदाच्या ठिकाणी बसवलेले खिळे या सर्वांतीत दगडामध्ये हुबेहूब नक्कल झाल्याचे दिसते."
महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते सांगतात, "ही मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्टपासून तयार झालेली आहे. ती स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे. तिच्या हातात म्हाळुंग म्हणजे बीजपूरक, गदा, ढाल, पानपत्र आहे. अशाप्रकारची रचना असलेल्या मूर्ती कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसात आढळतात. देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापासून प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात त्यामुळे येथे दर्शनासाठी गर्दी असते."