Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रंप : फेसबुक अकाऊंटवर कंपनीनं घातली दोन वर्षांची बंदी

Webdunia
शनिवार, 5 जून 2021 (18:39 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर फेसबुकने दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
 
जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या कॅपिटॉल बिल्डिंगवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रक्षोभक पोस्ट केल्यामुळे ट्रंप यांच्या दोन्ही अकाऊंट्सवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती.
 
पण फेसबुकच्या या निर्णयावर कंपनीच्या देखरेख मंडळाने 'अनिश्चित काळ' असं म्हटल्याबद्दल या निर्णयावर टीका केली.
 
फेसबुकने बंदी घालताना म्हटलं की, "ट्रंप यांनी आमच्या नियमांचं गंभीररित्या उल्लंघन केलं आहे."
 
तर ट्रंप यांनी म्हटलं की, "ही कृती म्हणजे त्या लाखो लोकांचा अपमान आहे ज्यांनी गेल्या वर्षीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रंप यांना मतदान केलं होतं."
राजकीय नेत्यांना त्यांच्या चुकीच्या किंवा अपमानजनक पोस्टसाठी सूट देणारं फेसबुकचं धोरण संपुष्टात आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे.
 
अशा राजकीय नेत्यांच्या कमेंट किंवा पोस्ट बातमीमूल्य असलेल्या असल्यामुळे फेसबुक त्यांना सुट देत होतं. पण आता असं केलं जाणार नाही, असं या सोशल मीडिया कंपनीने म्हटलं आहे.
ट्रंप यांच्यावर घातलेली बंदी 7 जानेवारीपासूनच लागू होईल, असं फेसबुकच्या ग्लोबल अफेअर्सचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं.
 
त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "त्या गंभीर परिस्थितीत आम्हाला ट्रंप यांच्या अकाऊंटवर बंदी घालावी लागली त्यानुसार आम्हाला वाटतं की त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. जर आम्हाला वाटलं की यानंतरही त्यांच्या कृतीमुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका आहे तर आम्ही बंदीची मर्यादा वाढवू शकतो आणि जोपर्यंत धोका कमी होत नाही तोपर्यंत बंदीचा पुर्नविचार करत राहू."
 
ट्रंप यांची प्रतिक्रिया काय?
आपल्या 'सेव्ह अमेरिका' या संस्थेव्दारे जारी केलेल्या पत्रकात ट्रंप यांनी म्हटलं की, "फेसबुकचा निर्णय त्या साडेसात कोटी लोकांचा अपमान आहे ज्यांनी आमच्यासाठी मतदान केलं."
 
या पत्रकात पुढे म्हटलंय, "अशा प्रकारे मुस्कटदाबी करून आणि सेन्सॉरशिप लादून ते सुटता कामा नयेत आणि सरतेशेवटी विजय आमचाच असेल. आमचा देश आता आणखी अत्याचार सहन करू शकत नाही."
 
ट्रंप यांनी जारी केलेल्या दुसऱ्या पत्रकात त्यांनी फेसबुकच्या संस्थापकांवर निशाणा साधला आहे.
 
"पुढच्या वेळी जेव्हा मी व्हाईट हाऊसमध्ये असेल तेव्हा त्यांनी कितीही विनंती केली तर मी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नीला जेवणाचं आमंत्रण देणार नाही. फक्त कामाशी काम ठेवेन."
 
फेसबुकची बंदी 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी उठेल आणि ट्रंप यांना पुन्हा फेसबुकवर येता येईल.
ट्रंप आता मोठ्या प्रमाणावर सभा घेण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी अशाच सभा घेतल्या होत्या. स्थानिक माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार ते जुलै महिन्याच्या सुरूवातीला डलास, टेक्सासमध्ये पहिली सभा घेणार आहेत. अशातच फेसबुकची बंदी आलेली आहे.
 
ट्रंप यांच्यावरच्या सोशल मीडिया बंदीमुळे त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधायला नवीन प्लॅटफॉर्म तयार केला होता ज्याचं नाव होतं - फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रंप. तो प्लॅटफॉर्मही आता कायमचा बंद झाला आहे.
 
फेसबुकबरोबरीने ट्विटर, युट्यूब, स्नॅपचॅट, ट्विच आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही ट्रंप यांच्यावर बंदी घातली आहे.
 
गेल्या महिन्यात फ्लोरिडाचे रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर रॉन डी-सँटिस यांनी सोशल मीडिया कंपन्यांनी राजकीय नेत्यांवर बंदी घातली तर त्यांना शिक्षेची तरतुद करणारा अमेरिकेतला पहिला कायदा संमत केला.
 
'फेसबुकचं मोठं पाऊल'
बीबीसीचे माध्यम संपादक अमोल रंजन याबद्दल बोलताना म्हणतात, "ट्रंप यांच्याबदद्ल काय निर्णय घ्यावा यावरून फेसबुक द्विधा मनस्थितीत सापडलं होतं. त्यामुळे लाखो लोक नाराज होतील याची खात्री होती. त्यांनी काहीही निर्णय घेतला असता तरी त्यामुळे वाद होणारच होते.
 
"पण एक गोष्ट स्पष्ट आहे. फेसबुकने, जगातल्या सगळ्यात मोठ्या सोशल नेटवर्कने, ट्रंप यांच्यावर बंदी घातली आहे. या व्यक्तीला साडेसात कोटी लोकांनी मत दिलं होतं. अशात हे पाऊल उचलणं धाडसाचं आहे."
 
फेसबुकची नवी पॉलिसी काय आहे?
फेसबुकने म्हटलंय की, ज्या प्रसिद्ध व्यक्ती फेसबुकच्या नियमांचा भंग करून लोकांमध्ये अशांतता पसरवतील किंवा हिंसेला उत्तेजन देतील त्यांचं अकाऊंट एका महिन्यासाठी निलंबित केलं जाईल. गंभीर प्रकरणांमध्ये हे निलंबन दोन वर्षांसाठी असेल.
 
याआधीच्या धोरणानुसार अशा राजकीय व्यक्तींच्या पोस्ट, ज्यांना बातमीमुल्य असेल, त्या हटवल्या जात नव्हत्या, भले मग त्यामुळे अशांतता पसरेल अशी शक्यता का असेना.
 
तरीही काही पोस्ट इशारा देऊन पोस्ट करायची परवानगी असेल. फेसबुकचं म्हणणं आहे की आता ते "राजकीय व्यक्तींच्या पोस्टला वेगळं महत्त्व देणार नाहीत."
 
"आम्ही त्या पोस्टचं बातमीमूल्य तपासून पाहू आणि त्या बातमीमुल्याचा लोकांच्या हितासाठी किती उपयोग आहे हे पडताळून पाहू. ज्या पोस्टमध्ये लोकांचं हित साधलं जात असेल तिथे थोड्याफार प्रमाणात अशांततेचा धोका असला तरी अशा पोस्टला परवानगी मिळेल."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments