Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डोनाल्ड ट्रंप विरुद्ध जो बायडन: ट्रंप आणि बायडन यांनी एकमेकांना 'शटअप' का म्हटलं?

डोनाल्ड ट्रंप विरुद्ध जो बायडन: ट्रंप आणि बायडन यांनी एकमेकांना 'शटअप' का म्हटलं?
, बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:00 IST)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 साठी प्रेसिडेंशिएल डिबेटला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार समोरा-समोर येऊन वादविवाद करतात. एकूण तीन डिबेट होतात.
 
वॉशिंग्टन डीसीमध्ये आज पहाटेच (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आज पहिला वादविवादाचा कार्यक्रम झाला. डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांनी आपली मतं मांडली.
 
डोनाल्ड ट्रंप या कार्यक्रमावेळी म्हणाले की भारताने कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवले आहेत.
 
कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत दोन लाखांहून अधिक लोकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी केला.
 
त्यावर ट्रंप म्हणाले अमेरिकेत 70 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आणि 2 लाखांचा मृत्यू झाला. भारताने कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याची शक्यता आहे. पण माझ्या जागी तुम्ही असता राष्ट्राध्यक्ष असता तर जास्त मृत्यू झाले असते असं डोनाल्ड ट्रंप म्हणाले.
 
हा वाद इतका चालला की दोघेही हार मानायला तयार नव्हते. दोघांनी एकमेकांना शटअप म्हटलं त्यानंतर कार्यक्रमाचे होस्ट क्रिस वॉलेस यांनी दोघांच्या मध्ये पडावे लागले.
 
कोरोना विषाणूवर चर्चा
कोरोना विषाणूचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून जो बायडेन यांनी ट्रंप प्रशासनावर टीका केली. तर यावर उत्तर देताना कोव्हिड-19 चा सामना करताना आमच्या सरकारने उत्तम काम केल्याचं ट्रंप म्हणाले.
 
ते म्हणाले, "आमच्या सरकारने कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी मास्क, पीपीई किट आणि औषधं आणली. कोरोनावर लस तयार करण्यापासून आम्ही काहीच आठवडे दूर आहोत. मी कंपन्यांशी चर्चा केली आहे आणि मी हे सांगू शकतो की आम्ही लवकरच लस तयार करू."
 
अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूविषयी बोलताना ट्रंप म्हणाले की, "भारत, रशिया आणि चीन कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू लपवत आहेत."
 
दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मास्क, लस, शारिरीक अंतर यासारख्या मुद्द्यांवरून लक्ष्य केलं.
 
बायडन यांनी ट्रंप मास्क वापरण्याविषयी गंभीर नसल्याचं म्हणाले. तर बायडन यांची थट्टा करत ट्रंप म्हणाले, "बायडेन 200 फूट अंतरावर असले तरी मोठा मास्क लावून येतात."
 
कोरोनाचं संकट असताना ट्रंप मोठी गर्दी जमेल अशा निवडणूक रॅली का करत होते, असा प्रश्न प्रेसिडेंशिअल डिबेटचे सूत्रसंचालक क्रिस वॉलेस यांनी विचारला. यावर ट्रंप म्हणाले, "बायडन यांना एवढी गर्दी खेचता आली असती तर त्यांनीही हेच केलं असतं."
 
यावर शालजोडीतून देत बायडन म्हणाले, "तुम्ही तुमच्या दंडावर ब्लीचचं इंजेक्शन घ्या. कदाचित याने कोरोना बरा होईल."
 
यावर ट्रंप म्हणाले, "मी हे गमतीत म्हणालो होतो आणि हे तुम्हाला माहिती आहे."
 
ट्रंप पुढे म्हणाले की आज बायडन त्यांच्याजागी असते तर अमेरिकेत 2 कोटी लोकांचा मृत्यू झाला असता. यावर ट्रंप खोटारडे असल्याचं सर्वांनाच ठावूक असल्याचं बायडन म्हणाले.
 
मी लाखो डॉलर कर भरला- ट्रंप
 
अर्थव्यवस्था या विषयावर क्रिस वॉलेस यांनी दोघांनाही प्रश्न विचारला की कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी तुम्ही काय कराल?
 
याचं उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "लॉकडाऊननंतर अमेरिकी अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. मी अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक सशक्त अर्थव्यवस्था तयार केली आहे."
 
याविषयावर चर्चा सुरू असताना टॅक्सचा मुद्दाही आला. वॅलेस यांनी न्यू यॉर्क टाईम्सचा दाखला देत विचारलं, "तुम्ही 2016-17 या वर्षात केवळ 750 डॉलर्स इतकाच कर भरला, हे खरं आहे का?"
 
याचं उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "मी लाखो डॉलर्स कर भरला आहे. एका वर्षी मी 38 दशलक्ष डॉलर कर भरला होता. तर त्याच्या पुढच्या वर्षी 27 दशलक्ष डॉलर्स."
 
न्यूयॉर्क टाईम्सची बातमी 'फेक न्यूज' असल्याचं ट्रंप म्हणाले.
 
वर्णभेद
सूत्रसंचालक क्रिस वॉलेस यांनी जॉर्ज फ्लॉईड यांची श्वेतवर्णीय पोलिसांच्या हातून झालेली हत्या आणि त्यानंतर अमेरिकेभर पेटलेला हिंसाचार आणि वर्णभेद यावर प्रश्न विचारला.
 
याचं उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "ओबामा-बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत वर्णभेद होता आणि त्याअनुषंगाने हिंसाचारही व्हायचा. मात्र, आता याचं प्रमाण कमी झालं आहे."तर गेल्या काही वर्षात अमेरिकेत कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं बायडेन म्हणाले. यावर उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "बायडेन यांचा कायदा-सुव्यवस्थेवर विश्वासच नाही. आमचा या व्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र, तुमचा नाही. या देशातल्या लोकांना कायदा-सुव्यवस्था हवी आहे."
 
अमेरिकेत अनेक ठिकाणी 'ब्लॅक लाईव्ह मॅटर' निदर्शनांना हिंसक वळण आलं. यावर बायडेन म्हणाले की निदर्शनं वाईट नाहीत. मात्र, हिंसाचार स्वीकार्ह नाही.
 
हवामान बदलावर तुमचा विश्वास आहे का?
 
याचं उत्तर देताना ट्रंप म्हणाले, 'आमचं सरकार सर्वोत्तम प्रशासकीय सरकार आहे. कोरोना येण्याआधी आम्ही विकासाच्या मार्गावर होतो. मात्र, आता त्याला धक्का बसला आहे."
 
ते पुढे म्हणाले, "कार्यकाळ संपण्यापूर्वी आम्ही अधिक न्यायाधीशांची नेमणूक केली. मला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली त्यावेळी न्यायाधीशांच्या 128 जागा रिक्त होत्या. यापूर्वीचं सरकार दुबळं होतं. पण आमचं नाही."
 
बायडन म्हणाले की ट्रंप यांच्या नेतृत्वात अमेरिका अधिक असुरक्षित आणि गरीब होईल. ते म्हणाले, "ट्रंप यांच्या शासनकाळात श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब अधिक गरीब होईल."
 
हवामान बदलावर तुमचा विश्वास आहे का, असा प्रश्न वॉलेस यांनी ट्रंप यांना विचारला. यावर ट्रंप म्हणाले, "मला स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा हवी. याबाबतीत आम्ही उत्तम काम करतोय आणि उद्योग-व्यवसायांवरही त्याचा परिणाम झालेला नाही. दरवर्षी लागणाऱ्या वणव्याविषयी सांगायचं तर एका उत्तम फॉरेस्ट मॅनेजमेंटची गरज आहे."
 
शटअप का म्हटलं?
 
या डिबेटमध्ये अनेकवेळा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले. दोघंही एकमेकांना 'गप्प बसा'सुद्धा (शटअप) म्हणाले. दोघांमधलं हे शाब्दिक युद्ध इतकं रंगलं की सूत्रसंचालक क्रिस वॉलेस यांना बरेचदा मध्यस्थीही करावी लागली.
 
बरेचदा तर दोघंही एकमेकांना त्यांचा मुद्दाही पूर्ण करू देत नव्हते. वाद इतका वाढला की वॉलेस यांना दोघांनाही 'बोलू नका' (स्टॉप टॉकिंग) म्हणावं लागलं.
 
ट्रंप बोलत असताना बायडन यांनी मधेच त्यांचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर वॅलेस त्यांना म्हणाले, "त्यांना (ट्रंप) बोलू द्या."
 
तर ट्रंप म्हणाले, 'बायडन यांना हे येतच नाही.'
 
इतकंच नाही तर ट्रंप आणि बायडेन दोघांनीही कार्यक्रमादरम्यान बरेचदा एकमेकांची टरही उडवली. आपण अमेरिकेच्या इतिहासातले सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष असल्याचं ट्रंप म्हणाले. तर ते आतापर्यंतचे सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचं बाायडन म्हणाले. ट्रंप खोटारडे असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे, असंही बायडेन म्हणाले.
 
चर्चेच्या मध्ये एकदा ट्रंप बायडेन यांना उद्देशून म्हणाले, "तुम्ही माझ्यासमोर स्वतःला स्मार्ट म्हणू नका. तुम्ही माझ्यासमोर स्मार्ट शब्द वापरूच नका."
 
हस्तांदोलनही नाही
कोरोना विषाणूची साथ बघता यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केलं नाही.
 
ओहायो प्रांतातल्या क्लीव्हलँडमध्ये ही 'प्रेसिडेंशिअल डिबेट' रंगली. सोशल डिस्टंसिंगच्या नियमामुळे कार्यक्रमाला मर्यादित संख्येतच लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली होती.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्रिस वॉलेस यांनी दोन्ही नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचे नव्या न्यायाधीशांच्या नामांकनाविषयी विचारलं.
 
ट्रंप यांनी याधीच ऐमी कोनी बॅरेट यांचं नाव जाहीर केलं आहे. ट्रंप म्हणाले, 'सर्वच बाबतीत त्या सरस आणि उत्तम आहेत.'
 
डिबेटमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया आणि बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन दोघीही उपस्थित होत्या. डोनाल्ड ट्रंप यांच्या मुली इवांका आणि टिफनी या दोघींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
 
कार्यक्रम सुरू असताना कुठल्याच प्रकारचा गोंधळ, आरडा-ओरड करायला प्रेक्षकांना मनाई होती.
 
सूत्रसंचालक कोण होते?
डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या पहिल्या 'प्रेसिडेंशिअल डिबेट' कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी फॉक्स न्यूज या अमेरिकी न्यूज चॅनलचे 72 वर्षीय अँकर क्रिस वॉलेस यांनी पार पाडली.
 
पत्रकारिता क्षेत्रात वॉलेस यांचं नाव मोठं आहे. फॉक्स न्यूजच्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा त्यांची प्रतिमाही वेगळी आहे.
 
फॉक्स न्यूजमधल्या अनेक पत्रकारांवर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या बाजूचे असल्याचा आरोप होत असतो. मात्र, वॉलिस यांची प्रतिमा यापेक्षा खूप वेगळी आहे.
 
एक गंभीर आणि संवेदनशील पत्रकार म्हणून ते ओळखले जातात.
 
क्रिस वॉलिस यांनी यापूर्वीही 'प्रेसिडेंशिअल डिबेट' घेतल्या आहेत. यापूर्वी 2016 मध्येही त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. मात्र, 'प्रेसिडेंशिअल डिबेट'चं सूत्रसंचालन करणारे फॉक्स न्यूजचे ते पहिलेच पत्रकार आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची मुलाखतही घेतली होती.
 
बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडेन उप-राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची हीच ओळख आजही लोकप्रिय आहे. मात्र, खरंतर बायडेन 1970 सालापासून अमेरिकेच्या राजकारणात सक्रीय आहेत.
 
मतदानाचा दिवस जवळ येतोय. त्यामुळे मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे, जगाच्या महाशक्तीचा नेता म्हणून कोणता उमेदवार अधिक सक्षम असल्याचं जनतेला वाटतं, हे जाणून घेण्याचा निवडणूक सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांचा प्रयत्न आहे.
 
आतापर्यंतच्या सर्व्हेमधून डेमोक्रेटिक जो बायडेन हे विद्यमान ट्रंप यांच्या पुढे असल्याचं दिसतंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन