Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

exact look of Chhatrapati Shivaji Maharaj
- जान्हवी मुळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात अक्षय कुमार महाराजांची भूमिका साकारतोय. पण तो महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे.
 
तसंच शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. महाराजांचा बांधा, रूप, वेश नेमका कसा होता? याविषयी इतिहास काय सांगतो?
 
साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वीची एखादी व्यक्ती कशी दिसायची, हे आज नेमकं सांगता येणं खरंतर कठीण आहे. कारण त्या काळात फोटोग्राफी नव्हती.
 
पण त्या काळातली दुर्मीळ पत्रं, अधिकृत दस्तावेज, परदेशी व्यक्तींनी लिहिलेली प्रवासवर्णनं, युरोपियन आणि गोवळकोंड्याच्या संग्रहातली चित्रं, एकोणिसाव्या शतकात एम व्ही धुरंदर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटनं यावरून शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहतं.  
 
शिवाजी महाराजांविषयी प्रवाशांची वर्णनं
फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो 1666 साली सुरतमध्ये आला होता आणि तिथून त्यानं दख्खनचा प्रवास केला. शिवाजी महाराजांना पाहिल्यावर तो लिहितो, 
 
‘राजे उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे आहेत, त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धीमत्ता दर्शवणारे आहेत. ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे.’ 
 
 सुरत मोहीमेच्या वेळेस त्या शहरात उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी, व्यापारी आणि प्रवाशांनीही शिवाजी महाराजांची वर्णनं केली आहेत.
 
अँथनी स्मिथनं केलेलं वर्णन जॉन ल’एस्कॉलिएट यांनी लिहून ठेवलं आहे. 
 
त्यानुसार ‘राजे काहीसे लहान चणीचे आहेत, मला वाटतं उभे राहिले तर माझ्यापेक्षा त्यांची  उंची कमी आहे. ते ताठ बांधेसूद शरीरयष्टीचे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे दिसतात. ’
 
राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कविंद्र परमानंद अशा कवींनी राजांचं वर्णन केलं आहे.
 
साधारण मध्यम उंची, भेदक नजर, दाढी, धारदार नाक, भव्य कपाळ अशी वैशिष्ट्यं आणि जिरेटोप, अंगरखा, तलवार अशी वस्त्रप्रावरणं त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवलेली दिसतात. 
 
शिवाजी महाराजांचं मूळ चित्रं
त्या काळातल्या इतर राज्यकर्त्यांसारखे शिवाजी महाराजांच्या दरबारात चित्रकार किंवा कलाकार नव्हते.  सुरत, गोवळकोंडा अशा ठिकाणी राजांनी भेटी दिल्या तेव्हा तिथल्या कलाकारांनी राजांची चित्रं काढली होती आणि त्यावरूनच राजांचं रूप कसं होतं, हे दिसून येतं. 
 
गेल्या शतकाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांची अनेक चित्रं प्रचलित होती, पण त्यातली अनेक संदर्भहीन होती. मनुची नावाच्या चित्रकारानं काढलेलं इब्राहीम खान नामक व्यक्तीचं चित्रं शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून छापलं गेलं होतं. 
 
शिवाजी महाराजांचं खरंखुरं विश्वासार्ह चित्र शोधून काढण्याचं श्रेय इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांना दिलं जातं.
exact look of Chhatrapati Shivaji Maharaj
वा. सी. बेंद्रे यांनी प्रकाशित केलेलं शिवाजी महाराजांचं चित्र

बेंद्रे काही काळ भारत इतिहास संशोधन केंद्रात काम करत होते आणि त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले. बेंद्रे यांनी युरोपातून मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रं मिळवली होती.
 
डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना एक रेखाचित्र सापडलं, जे शिवाजी महाराजांचं असल्याचा उल्लेख होता.
 
सुरत मोहीमेदरम्यान तिथल्या डच वखारीचे गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली होती, तेव्हा दोघांची चित्रं रेखाटण्यात आली होती आणि शिवाजी महाराजांचं चित्रं व्हॅलेंटिननं एका पत्रासोबत जोडलं होतं.
 
या चित्रात महाराजांनी अंगरख्यावर एक उपरणं आणि मराठी पद्धतीचे दागिने परिधान केलेले दिसतात.
 
सगळे पुरावे आणि ते मूळ पत्र शोधल्यावर बेंद्रे यांनी 1933 साली पुण्यात ते चित्रं लोकांसमोर मांडलं. महाराजांना प्रत्यक्ष समोर पाहून काढलं गेलेलं हे एक दुर्मिळ चित्र मानलं जातं.
 
गोवळकोंडा शैलीतील शिवाजी महाराजांची चित्रं
गोवळकोंडा भेटीदरम्यान कुतुबशहाच्या दरबारातील चित्रकारानं राजांचं चित्र रेखाटलं होतं आणि त्या अनुशंगानं पुढे इतर चित्र काढली गेली.
 
त्यातलंच व्यक्तीचित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातही पाहायला मिळतं.  
 
शिवाजी महाराजांची त्या काळातली साधारण 27 चित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यातील बहुतांश चित्रं ही परदेशात आहेत.  
 
सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील अभ्यासक आणि इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांनी 2021 साली प्रकाशात आणली.
 
जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तुसंग्रहालय आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात असलेली ही चित्रं दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली आहेत.
exact look of Chhatrapati Shivaji Maharaj
या चित्रांबाबत माहिती देताना तारे सांगतात, ''युरोपमधील व्यापारी भारतात व्यापारासाठी येत असत. त्यांचा भारतातील राजधान्यांशी संबंध होता. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारात देखील ते जात असत.
 
तारे पुढे सांगतात, "17 व्या शतकात काढल्या गेलेल्या चित्रांना राजाश्रय मिळाला. गोवळकोंड्याला अनेक कलाकार होते. त्यांनी अनेक राजांची चित्रे काढली. महाराज दक्षिणेच्या दौऱ्यावर होते, तेव्हा कुठल्यातरी कलाकाराने महाराजांचे चित्र काढले असावे."
 
"त्या चित्राच्या आधारे इतर चित्रकारांनी चित्रं काढली असावीत. ज्या संग्रहालयात ही चित्रं मिळाली तेथेही शिवाजी महाराजांची चित्रे असल्याचा उल्लेख आहे,'' असं तारे सांगतात.
 
जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालायत मिळालेल्या चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार दाखवण्यात आली आहे. तर पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा शस्त्र दाखविण्यात आले आहे.
 
अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा या शस्त्राबरोबरच कमरेला कट्यार लावल्याचे दिसून येत आहे.
 
इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सांगतात की, ''शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते. त्यांचं नाक बाकदार होतं. भव्य कपाळ होतं. त्यांचे डोळे बाणेदार होते. चेहऱ्याची उभी ठेवण होती. या तिन्ही चित्रांमध्ये शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्ये दिसतात.
 
"या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांचं वय साधारण 40 ते 50 असेल. राजस्थानी शैलीची मोठी व्यक्ती ज्या पद्धतीचा पेहराव करत असे तसा तो या चित्रांमध्ये देखील दिसून येत आहे. एका चित्रात दांडपट्टा, एकात तलवार दिसतायेत. मोजडी, जिरोटोपसुद्धा या चित्रांमध्ये दिसून येत आहे.''
 
एम. व्ही. धुरंधर यांनी रेखाटलेले शिवाजी महाराज
चित्रपट आणि टीव्हीचा विचार केला, तर ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात सूर्यकांत मांढरेंपासून ते टीव्हीवर अमोल कोल्हे आणि अगदी अलीकडे शरद केळकर यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.
 
तर इतर काहीवेळा चित्रपट पाहून हे शिवाजी महाराज वाटत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली.
exact look of Chhatrapati Shivaji Maharaj
शिवराज्याभिषेकाचं एम. व्ही. धुरंधर यांनी काढलेलं चित्र

पण आज शिवाजी महाराज म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर जे रूप उभं राहतं, त्यावर चित्रकार एमव्ही धुरंदर यांनी काढलेल्या चित्रांचाही प्रभाव आहे.
 
औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी धुरंधर यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रं काढून घेतली होती.
exact look of Chhatrapati Shivaji Maharaj
पुरंदर किल्याकडे जाताना शिवाजी महाराज, एम. व्ही. धुरंधर यांनी काढलेलं चित्र

धुरंधर यांनी काढलेली शिवाजी राजांच्या जीवनावरची चित्रं नंतर अनेक पुस्तकांमध्येही छापली गेली.
 
2018 साली मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयातील एका प्रदर्शनात यातली काही चित्रं मांडण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vijaya Ekadashi 2023 विजया एकादशी, या राशींचे भाग्या उजळेल