केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाद्वारे विरोध करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत सांगितलं आहे.
शेतकऱ्यांचे नेते केंद्र सरकारबरोबर चर्चा करतील. या निमित्ताने पंजाबचे शेतकरी नेते कोण आहेत याबाबतची ही बातमी.
नवीन कृषी कायदे रद्द व्हावेत किंवा नव्याने कायदा करून हमीभाव (एमएसपी) लागू करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे.
दिल्ली-हरियाणा, दिल्ली-पंजाब सीमेवर जे शेतकरी निदर्शनं करत आहेत त्यांना बुराडी मैदानात आंदोलन करावं, जेणेकरून वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी सगळ्या मुद्यांवर चर्चा करेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
या आंदोलनात हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांसह पंजाबमधील 30 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील नेतृत्वाचं आंदोलन करणाऱ्या नेत्यांविषयी जाणून घेऊया.
शेतकऱ्यांचे नेते- जोगिंदर सिंह उगराह
जोगिंदर सिंह उगराह हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील सुनाम शहरात ते राहतात. शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या लढ्यात उतरले. 2002 मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराह)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत.
जोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी उभारलेली संघटना पंजाबमधल्या प्रमुख शेतकरी संघटनांपैकी एक आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे.
"गेली वीस ते पंचवीस वर्ष मी जोगिंदर यांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना पाहतो आहे. ते लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतात. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचं काम नसतं," असं संगरुरचे स्थानिक पत्रकार कंवलजीत लहरागागा यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांचा वैचारिक आधारस्तंभ-बलबीर सिंह राजेवाल
77 वर्षीय बलबीर सिंह राजेवाल भारतीय किसान युनियनच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत. पंजाबमधल्या खन्ना जिल्ह्यातील राजेवाल हे त्यांचं मूळ गाव. इथल्याच एएस महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले होते.
भारतीय किसान युनियनची घटनाही राजेवाल यांनीच लिहिली होती. लुधियानाचा परिसर म्हणजेच मध्य पंजाब हे त्यांच्या संघटनेचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं.
बलबीर सिंह राजेवाल मालवा कॉलेज प्रबंधन समितीचे अध्यक्षही आहेत. समराला भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे.
"पंजाबमधील सगळ्यांत प्रभावशाली शेतकरी नेते अशी राजेवाल यांची प्रतिमा आहे. शेतकऱ्यांचं नेतृत्व करणे आणि त्यांची बाजू मांडणे यातून ते शेतकऱ्यांचा चेहरा झाले आहेत," असं समरालाचे रहिवासी गुरमिंदर सिंह ग्रेवाल यांनी सांगितलं.
राजेवाल यांनी राजकारणात प्रवेश केला नाही. कोणतंही राजकीय स्वरुपाचं पदही स्वीकारलं नाही. याच कारणांमुळे मध्य पंजाबात त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे.
सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आंदोलनकर्त्यांची डिमांड चार्टर म्हणजेच मागण्यांची सूची तयार करण्यात राजेवाल यांची भूमिका निर्णायक आहे.
शेतकऱ्यांच्या संघटनांमधील दुवा- जगमोहन सिंह
भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या फिरोजपूर जिल्ह्यातील करमा गावचे रहिवासी आहेत.
भारतीय किसान युनियन डकौंदाचे ते नेते आहेत. उगराहा संघटनेनंतरची ही मोठी संघटना मानली जाते.
शेतकऱ्यांमधील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक आहेत. 1984 मध्ये शिखांच्या संहारानंतर ते पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरले. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये ते सक्रिय आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी प्रामाणिक असल्याने सर्व संघटनांमध्ये त्यांच्याप्रति आदराची भावना आहे.
तीसहून अधिक शेतकरी संघटनांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे.
डॉ. दर्शनपाल, समन्वयक
डॉ. दर्शनपाल हे क्रांतिकारी किसान युनियनचे नेते आहेत. पटियाला शहराजवळ त्यांचं काम आहे. संख्याबळाच्या दृष्टीने त्यांची संघटना लहान आहे मात्र डॉ. दर्शनपाल तीसहून अधिक शेतकरी संघटनांच्या समन्वयाचं काम करतात. म्हणूनच शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे.
1973 मध्ये त्यांनी एमबीबीएस आणि एमडी अर्थात डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन काळातही विद्यार्थी संघटना आणि डॉक्टर संघटनेच्या कामात ते सक्रिय असायचे.
"शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचं खाजगीकरण करण्याच्या डॉ. दर्शनपाल विरोधात आहेत. म्हणूनच त्यांनी खाजगी वैयक्तिक प्रॅक्टिस केली नाही," असं त्यांचे चिरंजीव अमनिंदर यांनी सांगितलं.
2002मध्ये त्यांनी सरकारी डॉक्टर म्हणून काम सोडलं आणि तेव्हापासून ते शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यात आहेत. या कामात झोकून दिल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही.
शेतकऱ्यांचा आवाज-सरवन सिंह पंधेर
पंजाबमधल्या माझा भागातील प्रमुख शेतकरी नेतृत्व अशी सरवन सिंह पंधेर यांची ओळख आहे. किसान मजदूर संघर्ष समितीचे ते महासचिव आहेत.
या संघटनेची स्थापना 2000 मध्ये सतनाम सिंह पन्नू यांनी केली होती. आताही संघटनेचं नेतृत्व त्यांच्या हाती आहे मात्र सरवन सिंह पंधेर यांच्याकडे मोठी भूमिका देण्यात आल्याचं दिसतं.
संघटनेचं कार्यक्षेत्र दोआबा आणि मालवा या भागातील दहा जिल्ह्यांमध्ये आहे. माझा मधील चार जिल्ह्यांचाही समावेश होतो. आंदोलनकर्त्यांचे नेते म्हणून ते प्रस्थापित होत आहेत.
सरवन सिंह यांचं मूळ गाव अमृतसर जिल्ह्यातलं पंधेर आहे. ते पदवीधर आहेत आणि विद्यार्थी दशेपासूनच आंदोलनात सहभागी होत आहेत असं किसान संघर्ष समितीचे हरप्रीत सिंह यांनी सांगितलं.
सरवन सिंह 42 वर्षांचे असून, सार्वजनिक हितासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं आहे. त्यांनी लग्न केलंलं नाही.