गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले कॅफे कॉफी डेचे मालक आणि माजी परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे.
मंगळुरूमधील होईगे बाजारजवळ नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळून आला.
"सकाळी साडेसहाच्या सुमारास व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह हाती लागला आहे, त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे, कायद्यानुसार पुढची सर्व कारवाई केली जाईल," असं मंगलुरूचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
मंगळुरूमधील होईगे बाजारजवळ नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर बुधवारी (31 जुलै) सकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धार्थ यांचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना सापडला.
ज्या ठिकाणहून सिद्धार्थ बेपत्ता झाले होते, तिथून अगदी थोड्याच अंतरावर सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला. सिद्धार्थ यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे, अशी माहिती माजी मंत्री युटी खादेर यांनी बीबीसीला दिली.
त्यांच्या चेहऱ्यावर रक्त आहे, मात्र शरीराच्या अन्य भागावर जखम किंवा माराच्या कोणत्याही खुणा नसल्याची माहिती खादेर यांनी दिली.
दरम्यान, सिद्धार्थ यांनी आत्महत्येबद्दल लिहिलेली चिठ्ठी ही खरी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी हे पत्र 'कॅफे कॉफी डे' परिवार आणि संचालकांना उद्देशून लिहिलं आहे. "मी खूप लढलोय. पण आज मी हार मानतोय. कर्जदारांकडून येणारा दबाव आणि इन्कम टॅक्स विभागाच्या संचालकांकडून होणारा त्रास मी यापुढे सहन करू शकत नाही."
इन्कम टॅक्स विभागानं आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सिद्धार्थ यांच्या चिठ्ठीवरील सही ही विभागाकडे असलेल्या वार्षिक अहवालातील सहीशी जुळत नसल्याचं इन्कम टॅक्स विभागानं म्हटलं आहे.
सिद्धार्थ यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिलं आहे, "हे खूप अन्याय्य आहे. आणि आता खरंच पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सगळ्या चुकांसाठी मी एकटाच जबाबदार आहे. माझा कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. कधीतरी ही गोष्ट सर्वांच्या लक्षात येईल."
पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, कोस्टल पोलिसांसह 400 जण सिद्धार्थ यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते.
कोण आहेत व्ही. जी. सिद्धार्थ?
कॅफे कॉफी डे उद्योगाचे संस्थापक तसंच माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवार (29 जुलै) संध्याकाळपासून मंगलोर शहरातून बेपत्ता झाले होते.
सिद्धार्थ त्यांच्या गाडीतून बाहेर गेले होते. त्यांनी मंगलोर शहरातील नेत्रावती नदीच्या पुलावर ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्यांनी त्याला पुढे जायला सांगितलं. मी चालत येईन असंही त्यांनी सांगितलं. पण तिथून ते गायब झाले, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
सिद्धार्थ मागून परत न आल्यानं ड्रायव्हरनं पोलिसांना ही माहिती दिली.
सिद्धार्थ यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.
सिद्धार्थ यांचा 'कॅफे कॉफी डे' हा देशातला सगळ्यांत मोठा कॉफी उद्योग समूह आहे. सीसीडी या नावाने प्रसिद्ध या उद्योगाच्या देशभरात 1,750 शाखा आहेत. मलेशिया, नेपाळ आणि इजिप्तमध्येही त्यांची काही आऊटलेट आहेत.
वाढत्या स्पर्धेमुळे गेल्या दोन वर्षांत कॅफे कॉफी डे समूहाच्या वाढीचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे.
काही छोटे आऊटलेट बंदही करण्यात आले होते.
कॅफे कॉफी डे उद्योगातील मोठ्या प्रमाणावर समभाग कोका कोला कंपनीला विकण्यासाठी सिद्धार्थ उत्सुक असल्याच्या बातम्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र दोन्ही कंपन्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही.