"आम्ही एकत्र येऊ आणि अशी जोडी होईल की सगळे म्हणतील फेव्हिकॉल का मजबूत जोड है. आंबेडकर म्हणत आहेत तुमच्यासाठी आमची दारं उघडी आहेत तर आम्ही त्यांना म्हणतो की आमची दारंच नाही तर सर्व गेट उघडे आहेत. त्यांनी फक्त आमच्या जागा वाढवाव्यात," हे म्हणण आहे इम्तियाज जलील यांच.
बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी एकत्र येतील की नाही याबाबत गेली बरेच दिवस चर्चा होती. पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष MIM इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून सांगितलं दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाही.
त्यानंतर हा निर्णय इम्तियाज जलील यांनीच परस्पर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यावेळी नेमकं काय झालं ही गोष्ट कळू शकली नव्हती. पण बहुजन आघाडी आणि MIM यांची बोलणी कशी फिस्कटली हे इम्तियाज जलील यांनी बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात सांगितलं. त्याचवेळी त्यांनी ते एकत्र येण्यात अजूनही वाव अल्याचं स्पष्ट केलं आहे.
"महाराष्ट्रात युती करण्याबाबत असदुद्दीन औवेसी यांनी माझ्याकडे अधिकार सोपवले होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी तीन जणांना पाठवलं होतं. या वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा मी वंचितच्या प्रतिनिधींना विचारलं की तुम्ही आम्हाला नेमक्या किती जागा सोडू शकता. त्यावर वंचितचे प्रतिनिधी म्हणाले की जागा ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही तो प्रकाश आंबेडकरांना आहे. त्यावेळी मी म्हटलं की मग आपण चर्चा नेमकी कशावर करत आहोत.
महाराष्ट्राच्या किती जागा आम्ही लढवायच्या, कुणासोबत आघाडी करायची सीट शेअरिंग कसं असावं याचे सर्व अधिकार MIM चे अध्यक्ष असदुद्दीन यांनी दिली पण वंचितच्या प्रतिनिधींकडे नव्हते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींना पत्र लिहलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी ८ जागा सोडू. गेल्या वेळी आम्ही २४ जागा लढवल्या होत्या. मग आता ८ कशा लढणार असं ओवेसींनी मला विचारलं. त्यानंतर मी प्रसिद्धिपत्रक लिहिलं. त्यात आमची आणि वंचितची युती होणार नाही असं म्हटलं तेव्हा लोकांनी मला म्हटलं की हा निर्णय ओवेसींना न विचारताच घेतला आणि युती तोडली.
पण मी इतका मोठा नाही की मी स्वतः युती तोडेन असं जलील यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर म्हणत होते की मी फक्त ओवेसींशीच बोलणार आणि तुम्ही देखील म्हणत होता की मी प्रकाश आंबेडकर व्यतिरिक्त इतर प्रतिनिधींशी चर्चा करणार नाही. हा प्रश्न इगोचा बनला असं वाटत नाही का? असा प्रश्न बीबीसी प्रतिनिधीने विचारल्यावर जलील सांगतात हा प्रश्न इगोचा नाही.
"प्रकाश आंबेडकरांचा मी आदर करतो. त्यांना मी हे पण सांगितलं की आमचे जे आमदार निवडून येतील ते आम्ही तुमच्या झोळीत टाकू पण इतक्या कमी जागा आम्ही कशा लढवणार हा प्रश्न होता.वंचित बहुजन आघाडीचा धसका सर्वांनीच घेतला आहे . याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की वंचितचा विरोधी पक्ष नेता होईल, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ही वंचितचा धसका घेतला आहे. पण ही युती होऊ शकली नाही याबाबत खेद आहे असं जलील म्हणाले. गेल्या काही वर्षांत आमच्या पक्षाचा विस्तार झाला. तेव्हा इतक्या कमी जागा आम्ही कशा लढवणार? पण दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.
इम्तियाज जलील मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला का हजर नव्हते?
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन हा मराठवाड्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा असतो आणि त्या दिवशी लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहन करावं अशी लोकांची एक सर्वसाधारण अपेक्षा असते पण इम्तियाज जलील हे आमदार असताना आणि आता देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यावरून तर्क वितर्क होऊ लागले. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर इम्तियाज जलील यांनी बीबीसीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात उत्तर दिलं. उत्तराच्या सुरुवातीलाच जलील यांनी स्पष्ट केलं की मी कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही पण पुढच्या वर्षी मी नक्की या कार्यक्रमाला हजर राहील. पुढे ते म्हणाले की औरंगाबाद-शिर्डी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे आणि त्या संदर्भात मुंबईत मीटिंग होणार होती म्हणू मी हजर राहू शकलो नाही. पण स्थानिक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले. माझा थेट संबंध रझाकारांशीच लावला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला अनेक नेते त्यांच्या जिल्ह्यात नव्हते पण त्यांना हा प्रश्न कुणीच विचारला नाही. मी मात्र मुसलमान असल्यामुळे वारंवार हा प्रश्न विचारला जातो. मला आज हे सांगावसं वाटतं की रझाकार हे सत्तर वर्षांपूर्वी होते आणि भारत स्वतंत्र्य झाल्यावर ते पाकिस्तानला निघून गेले. ते इथं थांबले नाहीत. इथल्या मुसलमानांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही इथून निघून पाकिस्तानला जाणार का? तेव्हा आमच्या वाड-वडिलांनी हा निर्णय घेतला की आपण भारतातच राहू. हा देश आमचा आहे आणि या देशाचा आम्हाला अभिमान आहे. पण काही लोकांना सर्टिफिकेट वाटायची आणि आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उचलायची खोडच आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा लोकभावनेचा प्रश्न आहे तेव्हा विरोधकांना सर्वांत चांगलं उत्तर तुम्ही या कार्यक्रमाला हजर राहून देऊ शकला नसता का? असा प्रश्न बीबीसी प्रतिनिधीने विचारल्यावर जलील म्हणाले की मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणं पसंत करतो. तेच तेच प्रश्न विचारून काही मिळू शकत नाही. मी सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पुढच्या वर्षी मी कार्यक्रमाला जाणार देखील आहे. आणि नुसतंच जाणार नाही तर वाजत गाजत जाऊ. सर्व तरुणांना घेऊन जाणार आहे. या वर्षी मी तिथं हजर नसल्याची बातमी झाली पुढील वर्षी मी हजर असल्याची बातमी होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाड्यात फक्त भावनिक मुद्द्यांवरच राजकारण होत आहे. इथं महानगरपालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे त्यामुळे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलणं अडचणीचं ठरतं. त्यामुळेच ते असे भावनिक प्रश्न उकरून काढतात पण माझा हा प्रश्न आहे की जर तुम्ही स्वतःला मराठवाड्याचे भूमीपुत्र म्हणवून घेता तर या भागासाठी तुम्ही काय केलं?