Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नरेंद्र मोदी वाढदिवस : देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींवर किती अवलंबून?

नरेंद्र मोदी वाढदिवस : देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींवर किती अवलंबून?
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:12 IST)
ओंकार करंबेळकर
वर्ष 2014. मे महिन्यात केंद्रात सत्तांतर झाल्यावर काही महिन्यातच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपचे तेव्हाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अख्खा देश पिंजून काढला होता. त्यानंतर या राज्यांच्या विधानसभांसाठीही त्यांनी सर्वत्र प्रचार केला होता.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत नव्याने पंतप्रधानपदी आलेल्या नरेंद्र मोदी यांची 'ब्रँड व्हॅल्यू' चांगलीच जाणवत होती. नरेंद्र मोदी यांनीच राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी केलेल्या प्रचाराचा फायदाही भाजपाला झाला होता.
 
आता पाच वर्षांनंतर पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक प्रचारसभा घेतल्या आणि त्यांना भरघोस यश मिळालं. पण आता विधानसभेसाठी भाजपाला नरेंद्र मोदी या ब्रँडची कितपत गरज लागेल, याकडे पाहाणं गरजेचे आहे. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील भाजपाची स्थिती अत्यंत वेगानं बदलली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांचा उदय
2014 साली भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी संभाव्य उमेदवारांमध्ये अनेक महत्त्वाचं नावं होती. त्यापैकीच एक प्रमुख नाव होतं ते म्हणजे गोपिनाथ मुंडे यांचं. पण मोदी सरकार केंद्रात येताच अवघ्या काही दिवसांतच मुंडेंचं अपघाती निधन झालं. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीनंतर भाजपचं नेतृत्व कोण करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं.
 
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काहीकाळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र मोदी सरकारमध्ये एक प्रमुख खातं मिळाल्यानंतर आता मुंबईत परतणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं.
 
तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडेही संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण या सगळ्या शक्यतांना मागे टाकत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
 
विधानसभा सुरू झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार थोडा काळ राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर अस्तित्वात होतं. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली.
 
सत्तेत असून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या मित्रपक्षाला सांभाळणं, पक्षांतर्गत विरोधाला मवाळ करणं, दिल्लीमधील केंद्रीय नेत्यांशी सुसंबंध साधणं, यासर्व जमेच्या बाजू असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आपलं सरकार पाच वर्षं चालवता आलं.
 
1975 साली वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
webdunia
या मधल्या प्रदीर्घ काळामध्ये काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही मुख्यमंत्री झाले, परंतु कोणालाच पाच वर्षं पूर्ण करता आली नव्हती. तसंच शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
 
त्यामुळे गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस नावाचं एक नवं नेतृत्व राज्यात अस्तित्वात आलेलं सर्वांना दिसून आलं. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी झालेल्या निवडणुकांत भाजपच्या प्रचाराचं नेतृत्व केलं होतं. राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीला आजवरचं सर्वांत मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाची राज्यातली सूत्र असल्याचं दिसून आलं.
 
प्रशासनावर ताबा
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदाचीही एक वेगळी परंपरा गेल्या चार दशकांमध्ये तयार झाली होती. 1995 साली युती सरकार सत्तेत आल्यापासून 2014 पर्यंत सलग 19 वर्षं राज्यात उपमुख्यमंत्री कार्यरत होते. या कालावधीत गोपिनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांच्यासारखे नेते उपमुख्यमंत्री झाले.
 
आघाडी आणि युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद एका पक्षाला गेलं तर उपमुख्यमंत्रिपद दुसऱ्या क्रमांकाच्या मित्रपक्षाला मिळत होतं. परंतु मावळती विधानसभा यालाही अपवाद ठरली.
 
सरकारमधलं महत्त्वाचं गृहमंत्रालय ज्येष्ठ मंत्र्यांकडे किंवा मित्रपक्षांकडे न देता फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं. अशा अनेक संकेतांमधून महाराष्ट्र भाजप आणि सरकारमध्ये नंबर वन असल्याचं सिद्ध होत गेलं.
 
इतर पक्षांमधून भाजपात आलेले नेते
2014च्या तुलनेत भाजपची राज्यभरात परिस्थिती सुधारल्याचं दिसतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक आजी-माजी नेते पक्षात आले आहेत. हे सर्व नेते त्यांच्या प्रदेशातील बलवान नेते आहेत. अनेक माजी मंत्रीही या यादीत आहेत.
गेली पावणेपाच वर्षं विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये गेले आणि मंत्रीही झाले. त्यांचा मुलगा सुजयही भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आला. विखे-पाटील घराण्याचा अहमदनगर जिल्ह्यावर मोठा प्रभाव आहे आणि त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा भाजपला नक्की होईल, असं दिसतं.
 
विखे पाटील यांच्याप्रमाणे मोहिते-पाटिल पितापुत्रही भाजपमध्ये आले आहेत. साताऱ्यामध्ये उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे, उसमानाबादमध्ये राणा जगजितसिंह, नवी मुंबईत गणेश नाईक-संदीप नाईक, अहमदनगरमध्ये मधुकर पिचड-वैभव पिचड, मुंबईत कालिदास कोळंबकर, माणमध्ये जयकुमार गोरे, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील असे अनेक स्थानिक प्रभाव असणारे नेते भाजपमध्ये आलेले आहेत.
 
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. इतर प्रदेशांमध्ये भाजपला यश मिळतं तसं राष्ट्रवादी काँग्रेसमुळे या प्रदेशात मिळत नसे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदललं.
 
राष्ट्रवादीचा घरचा मतदारसंघ मानला जाणारा माढा हा मतदारसंघही भाजपकडे गेला. जो सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला होता, त्याचे प्रतिनिधी उदयनराजेच भाजपमध्ये गेले आहेत.
 
कोल्हापूर मतदारसंघात शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारानं राष्ट्रवादीच्या ज्या खासदारांना पराभूत केलं होतं त्या धनंजय महाडिक यांनाही भाजपने पक्षात घेतलं आहे.
 
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपने 19 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 13 जागा जिंकल्या होत्या. संपूर्ण देशभरात मोदी प्रभाव असूनही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या 16 जागा टिकवून ठेवल्या होत्या. आता हे चित्र पूर्ण कायम राहण्याची शक्यता कमीच दिसते.
 
सोलापुरात दिलीप सोपल आणि दिलीप माने शिवसेनेत गेले आहेत. तसंच करमाळ्यातील माजी आमदार शामल बागल यांच्या कन्या रश्मी बागलही शिवसेनेत गेल्या. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातही युती मजबूत स्थितीत दिसतेय आणि त्यातही भाजप आघाडी मिळवणारा असेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 
मग येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नरेंद्र मोदी ब्रँडवर तितकंच अवलंबून राहावं लागणार का?
 
'नरेंद्र मोदींना टाळता येणार नाही'
महाराष्ट्रात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला असला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणुकीच्या प्रचारात गरज भासणार. त्यामुळे नरेंद्र मोदींना भाजप टाळू शकणार नाही, असं मत 'लोकमत'चे पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
webdunia
ते म्हणाले, "मोदी फॅक्टर भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं काही पातळ्यांवर काम केलं असलं तरी ठळकपणे लक्षात राहील, असं फारसं काही त्यांनी केलेलं नाही. तर तिकडे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर नरेंद्र मोदी यांनी पहिल्या शंभर दिवसांमध्ये ट्रिपल तलाख, काश्मीरचे 370 कलम रद्द करणे, चांद्रयानाच्या अपयशानंतरही नवा मार्ग दाखवणे, अशा प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदी महत्त्वाचे असतीलच. "
 
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना पूरक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकमेकांना पूरक आहोत, अशी प्रतिमा तयार केल्याचंही दीक्षित यांनी सांगितलं. ते सांगतात, "एकूण प्रशासन आणि कारभारात कौशल्य, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरक असल्याचे संकेत दिले आहेत.
 
"आपल्याला केंद्रीय नेतृत्त्वाचा पक्का आधार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी दाखवणं आणि माझेच शिष्य राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवत असल्यामुळे दोघाची प्रतिमा एकमेकांना पूरक असल्याचा संदेश त्यातून जातो. त्याचा निवडणुकीत भाजपला फायदा होईल," ते सांगतात.
 
'मुख्यमंत्र्यांनी आपल्या जमेच्या बाजू समोर आणल्या'
येत्या निवडणुकीत भाजप 2014 प्रमाणेच पंतप्रधानांवर अवलंबून असेल का, याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर पहिल्या दोन वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचा संप अशा अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु ते त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले.
 
"पुढे घेतलेल्या अनेक निर्णयांमधून त्यांनी आपलं स्थान पक्कं केलं. तसंच तरुण मुख्यमंत्री ही प्रतिमाही त्यांनी लोकांच्या समोर आणली. त्यामुळे भाजप 2014 इतका पंतप्रधानांवर आता अवलंबून असेल, असं वाटत नाही. महाजनादेश यात्रेच्या समाप्तीच्यावेळेस पंतप्रधान येणारच आहेत.
 
"छत्तीसगडमध्ये रमणसिंह आणि मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांना पहिल्या टर्ममध्ये केंद्रीय नेतृत्वाची गरज लागली होती, पण नंतर एकदा जम बसल्यानंतर त्यांनी स्वतःच्या बळावर सर्व करण्यास सुरुवात केली, तसंच आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस अगदीच दुबळी झाली असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यताच दिसून येते.
 
'भावनिकतेच्या सूत्रात बांधायला मोदी लागतीलच'
महाराष्ट्र भाजपचं 2014च्या तुलनेत नरेंद्र मोदींवरील अवलंबित्व कमी झालं असलं तरी मतदारांना भावनिकतेच्या सूत्रात बांधायला पंतप्रधान नरेंद्र मोदी लागतीलच, असं मत 'पुण्यनगरी'च्या समूहसंपादक राही भिडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
त्या म्हणाल्या, "मतदारांना आकर्षित करण्यासाठी भावनिकतेचं सूत्र लागतं आणि ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ते चांगलं जमतं. त्यामुळे प्रचारामध्ये त्यांची मदत भाजपला लागेलच.
 
"परंतु देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये आपण कोणते प्रकल्प सुरू केले आहेत, विकासाला कशी चालना देत आहोत, याची माहिती द्यायला सुरुवात केली आहे. तसंच आपली स्वच्छ प्रतिमाही लोकांसमोर ठळकपणे मांडली आहे. त्यांची प्रतिमा आणि नरेंद्र मोदी यांची मदत या दोन्हीची भाजपला मदत होईल."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?