महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे कुटुंब संसदीय राजकारणात उतरणार की नाही, अशी आधी चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले.
आता आदित्य ठाकरे यांच्या रुपानं ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्तीही मंत्रिपदावर विराजमान झाली.
पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असणं, ही गोष्ट काही महाराष्ट्रातच घडत नाहीय. भारतातल्या इतर राज्यात अनेकदा पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात दिसले होते.
1. करुणानिधी आणि स्टॅलिन
तामिळनाडूत 2006 ते 2011 या काळात डीएमके आणि मित्रपक्षांचं सरकार होतं. यावेळी करुणानिधी हे मुख्यमंत्री होते, तर त्यांचे पुत्र स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते.
खरंतर स्टॅलिन 2006 पासूनच करुणानिधी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. ग्रामविकास, पंचायत राज अशी खाती त्यांच्याकडे होती. मात्र, 2009 साली त्यांची निवड उपमुख्यमंत्री म्हणून झाली आणि ते तामिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री ठरले. करुणानिधी आणि स्टॅलिन यांच्या रूपानं एकाच मंत्रिमंडळात बाप-लेक दिसले.
2. चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश
2014 साली आंध्र प्रदेशात टीडीपीची सत्ता आल्यानंतर चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले. चंद्राबाबूंनी 2017 साली त्यांच्या मुलाला म्हणजे नारा लोकेश यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले. नारा लोकेश हे विधानसभेत निवडून आले नव्हते.
त्यांना विधानपरिषदेवर घेऊन, कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं. माहिती तंत्रज्ञान, पंचायत राज आणि ग्रामविकास ही खाती नारा लोकेश यांच्याकडे देण्यात आली होती. 2019 साली म्हणजे यंदा लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेशच्या निवडणुका झाल्या, त्यात टीडीपीची सत्ता गेली.
3. प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल
प्रकाश सिंह बादल हे शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत. ते चारवेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल यांनी 2009 साली पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यावेळी त्यांचे वडील म्हणजेच प्रकाश सिंह बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. 2012 साली पुन्हा शिरोमणी अकाली दलाचे सरकार पंजाबमध्ये आल्यानंतर प्रकाशसिंह बादल हे मुख्यमंत्री, तर त्याचवेळी सुखबीर सिंह बादल हे उपमुख्यमंत्री होते.
4. के. चंद्रशेखर राव आणि के टी रामा राव
तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे नव्यानं निर्मिती झालेल्या तेलंगणा राज्याचे 2014 साली मुख्यमंत्री झाले. याच मंत्रिमंडळात के. चंद्रशेखर यांचे पुत्र के टी रामा राव हेही मंत्री होते. त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज ही खाती होती.
त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 20018 साली पुन्हा तेलंगणात टीआरएसचंच सरकार आलं. यावेळीही के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळात के टी रामा राव हे कॅबिनेट मंत्री आहेत.
5. देवीलाल आणि रणजित सिंह चौटाला
भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल हे दोन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. ज्यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा म्हणजे 1987 साली मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सरकार स्थापन केलं.
तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे पुत्र रणजित सिंह चौटाला हे सुद्धा होते. त्यांच्याकडे कृषिमंत्रिपद हे खातं देण्यात आलं होतं.