Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

41 वर्षांनंतर भारतानं हॉकीमधलं पदकाचं स्वप्न कसं साकार केलं?

How did India realize its dream of a medal in hockey after 41 years?
, गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (12:29 IST)
तब्बल 41 वर्षांनंतर भारताची हॉकीमधली पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदक मिळवलं आहे. भारतानं हॉकीमधलं शेवटचं सुवर्णपदक मॉस्कोमध्ये 1980 साली जिंकलं होतं. तेव्हापासून भारताला हॉकीमध्ये पदकाची प्रतीक्षा होती. सामना सुरू झाल्यानंतर काही काळ पिछाडीवर राहिलेल्या भारतानं नंतर संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखलं.
 
दोन्ही संघांनी उत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. मात्र भारताचा बचाव सरस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं अभिनंदन करणारं ट्वीट करून म्हटलं आहे की, ऐतिहासिक! हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहिल. कांस्य पदक मिळविल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन. या यशानं आपल्या देशातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भारताला आपल्या हॉकी संघावर गर्व आहे.
 
अत्यंत चुरशीचा सामना
दोन्ही संघांमध्ये अत्यंत रंजक आणि उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळाला. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने भारताविरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर भारताने सामन्यात आपली कामगिरी उंचावत नेली.
 
भारताने आपली रणनिती बदलून जर्मनीवर हल्ला चढवला. त्यामुळे जर्मनीला आपला आक्रमक खेळ थांबवून बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडलं.
 
सर्वप्रथम सिमरनजीत सिंहने गोल करून भारताचं खातं उघडलं. पण जर्मनीने त्याचा कडवा प्रतिकार करत आणखी दोन गोल केले. सामन्याचा पूर्वार्ध संपण्यास अवघ्या काही मिनिटांचा कालावधी उरलेला असताना भारत जर्मनीविरुद्ध 3-1 अशा फरकाने मागे होता. पण, भारताने पराभव पत्करला नाही. बिकट परिस्थितीतून उसळी घेत भारतीय संघाने जर्मनीला प्रत्युत्तर दिलं.
 
हार्दिक सिंह आणि पेनल्टी कॉर्नरवेळी हरमनप्रीत सिंह यांनी केलेल्या गोलमुळे सामन्याचं चित्रंच पालटलं. त्यामुळे पहिला हाफ संपला तेव्हा सामन्यात 3-3 अशी बरोबरी होती.
 
सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवातीपासूनच भारताने खेळावर वर्चस्व राखलं. तिसऱ्या क्वार्टमध्ये रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर एक गोल केला. त्यानंतर काही वेळाने सिमरनजीत सिंहने आपला दुसरा गोल केला.
 
पण दुसरीकडे जर्मनीला या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपला तेव्हा भारत 5-3 अशा फरकाने आघाडीवर होता.
 
सामन्याच्या अखेरच्या क्वार्टरमध्ये सामना अतिशय रंजक अवस्थेत पोहोचला. जर्मनीने एक गोल करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या गोलकिपर श्रीजेशने उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. अखेरीस, भारताने 5-4 अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला.
 
अखेरच्या सहा सेकंदांनी उत्कंठा शिगेला पोहोचवली
सामन्याचा खेळ समाप्त होण्यापूर्वी साडेचार मिनिट आधी जर्मनीच्या संघाने आपला गोलकिपर स्टॅडलरला बाहेर पाठवून दिलं. त्यांनी गोलकिपरऐवजी 11वा खेळाडू मैदानावर उतरवला.
 
खेळ समाप्तीपूर्वी सहा सेकंद आधी जर्मनीला सामन्याचा दहावा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यामुळे भारतीय खेळाडू आणि कोट्यवधी प्रेक्षकांच्या छातीतील धडधड वाढली होती.
 
पण, भारताने या परिस्थितीतही शानदार बचाव करून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
यापूर्वीही अडीच मिनिटांआधी जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण भारताने त्यावेळीही गोल होऊ दिला नव्हता.
 
अखेरच्या क्षणी बाजी कोणत्याही बाजूला पलटणार असं वाटत असताना भारतीय संघाच्या शिलेदारांनी अतिशय चतुराईने खेळ दाखवला. त्यांनी जर्मनीला 4 गोलवरच रोखून धरलं.
 
टिच्चून खेळ करत भारताने अखेरीस आपला विजय साकार केला आणि कांस्य पदकाची कमाई केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Mandir राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण, अयोध्येत भव्य कार्यक्रम होणार