जगातील सर्वात सुदृढ पासपोर्ट कोणता याची 2021 या वर्षाची यादी हेन्ली अँड पार्टनर्सने जाहीर केली आहे.
2020 साली पर्यटन या क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला. लक्षावधी लोकांनी आपले पर्यटन दौरे रद्द केले. आता मात्र 2021 साली काही लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत.
पासपोर्ट आणि व्हीसा
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दोन प्रकारचे दस्तावेज लागतात. पहिला पासपोर्ट. पासपोर्ट आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागतोच आणि ती व्यक्ती ज्या देशाची नागरिक आहे तो देश पासपोर्ट उपलब्ध करुन देत असतो.
पासपोर्टच्या मदतीने जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास केला जातो तेव्हा एखाद्या देशामध्ये सीमा ओलांडून जाण्यासाठी यजमान देश व्हीसा देत असतो. अर्थात जगभरातल्या सर्व देशातल्या लोकांना सर्व देशांसाठी व्हीसा लागेलच असे नाही. प्रत्येक देशाच्या करारमदारानुसार काही देशांमध्ये त्यांच्या नागरिकांना जाण्यासाठी व्हीसाची आवश्यकता नसते. जसे की काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हीसाची गरज नसते. एखाद्या देशाच्या नागरिकांना किती देशांमध्ये जाण्यासाठी व्हीसा लागत नाही यावरुन पासपोर्टचे हे ऱँकिंग ठरवण्यात आले आहे.
भारताचा नंबर कितवा?
या यादीमध्ये जपानचा नंबर पहिला आहे. जर जपानचा पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर 191 देशांमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. सिंगापूरचे लोक 190 आणि दक्षिण कोरियन लोक 189 देशांमध्ये कोणत्याही एंट्री क्लिअरन्सविना जाऊ शकतात. भारताचा यात 85 वा क्रमांक असून गेल्या वर्षात एका पायरीने भारताची घसरण झाली आहे.
हेन्ली अँड पार्टनर्सच्या माहितीनुसार भारतीय लोक फक्त पासपोर्टच्या बळावर जगातल्या 58 देशांमध्ये जाऊ शकतात. अफगाणिस्तान (110), इराक (109), सीरिया (108), पाकिस्तान (107) हे एकदम तळात आहेत. या देशातले लोक 32 देशांपेक्षा कमी देशांमध्ये एंट्री परमिटविना प्रवेश करु शकतात.
भारतीय कोणत्या देशांमध्ये जाऊ शकतात?
हेन्ले अँड पार्टनर्स आयटा या संस्थेच्या विशेष आकडेवारीवर आधारीत मानांकनं तयार करते. या यादीमध्ये भारत 85 व्या क्रमांकावर आहे, भारतीय पासपोर्ट असलेले लोक जगातल्या 58 देशांमध्ये प्रवास करू शकतात.
एंट्री परमिटशिवाय भारतीय भारतीय लोक भूटान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मकाऊ, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोरमध्ये जाऊ शकतात सर्बियामध्येही भारतीय लोक व्हीसा विना जाऊ शकता.
अफ्रिकेतल्या 21 देशांमध्ये भारतीय सहज प्रवास करू शकतात. त्यामध्ये बोटस्वाना, इथिओपिया, केनया, मादागास्कर, मॉरिशस, युगांडा आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. याचप्रकारे भारतीय लोक नऊ देशांमध्ये व्हिसा विना प्रवास करू शकतात. यामध्ये कुक आय़लंड्स, फिजी आणि ओशनियामधील मार्शल बेटांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, हेनले अँड पार्टनर्स यांनी जाहीर केले आहे की ते अमेरिकेतील जमैका, बोलिव्हिया आणि अल साल्वाडोर यासह 11 कॅरेबियन देशांमध्ये आणि मध्यपूर्वेतील तीन देश, इराण, जॉर्डन आणि कतार या तीन देशांच्या पासपोर्टसह कोणत्याही प्रवेशाच्या परवानगीशिवाय प्रवास करू शकतील.
भारतीय सर्वात जास्त कोणत्या देशात जातात?
परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. आकडेवारीनुसार 2019 मध्ये 2.63 कोटी भारतीयांनी परदेश प्रवास केला. हा आकडा 2000 सालापेक्षा जास्त आहे कारण त्यावर्षी 44 लाख लोकांनी प्रवास केला होता. 2000 ते 2019 या कालावधीत आतंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत दरवर्षी 10 लाखांनी वाढ झालेली दिसून येते.
कोरोनानंतर सिंगापूरला येणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याचं दिसतं. अर्थात 2020 या वर्षात यामध्ये घट झालेली असेल. कारण कोरोनामुळे जगभरातील प्रवास आणि अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या.
बीबीसी तमिळने गुगलने नव्याने लाँच केलेल्या 'डेस्टिनेशन इनसाइट्स विथ गूगल' वरुन माहिती घेतली. त्यामध्ये भारतीय सर्वात जास्त कोणत्या देशांना जाणं पसंत करतात याची सूची दिलेली आहे.
गुगलवर भारतीय लोकांनी सर्च केलेल्या माहितीचा आधार घेतला तर भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मालदिव जास्त सर्च करत असल्याचं दिसतं. तसेच थायलंड, करात, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात या देशांनाही लोक सर्च करत असल्याचं दिसतं. शहरांचा विचार केल्यास मालदिवची राजधानी मालेचा नंबर पहिला लागतो. त्यानंतर बँकॉक, दोहा, क्वालालंपूर, दुबई अशा शहरांचा नंबर लागतो.
देशांतर्गत विचार केल्यास महाराष्ट्र यामध्ये सर्वात वरती आहे. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आहेत, शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये जाण्यासाठी लोक जास्त सर्च करत असल्याचं दिसतं. बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्नई यांचा नंतर नंबर लागतो.