"पहिल्या वेळेस जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी प्रचंड घाबरलेले होते. मला वाटलं की मी आयुष्यात अपयशी ठरलेय आणि वाटायचं की मी काहीतरी चूक करतेय." हे शब्द आहेत आयेशा मुखर्जी (धवन) हिचे.
भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन याची पत्नी आयेशाने आपण घटस्फोट घेत असल्याचं इंस्टाग्रामवर शेअर केलं. तिने भावनिक पोस्ट लिहून तिच्या मनात काय चालू आहे ते व्यक्त केलं. भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आपल्या आठ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होत आहेत.
कोण आहे आयेशा मुखर्जी?
आयेशाचं कुटुंब ती आठ वर्षांची असताना ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये स्थायिक झालं. आयेशाला लहानपणापासूनच खेळात रूची होती आणि ती स्वतः किकबॉक्सर आहे. शिखर धवनशी लग्न व्हायच्या आधी आयेशा मुखर्जीचं आधीही एक लग्न झालं होतं. पहिल्या लग्नातून तिला दोन मुली आहेत.
शिखर आणि आयेशाची ओळख सोशल मीडियावर झाली 2012 साली त्यांनी लग्न केलं. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे. भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या, घटस्फोटित, दोन मुलींची आई असलेल्या महिलेशी लग्न करतोय यावरून त्यावेळेस बरीच चर्चा झाली होती. शिखरने आयेशाच्या दोन मुलींनाही दत्तक घेतलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत शिखरने या मुलींना आयुष्यात स्वीकारणं जड गेलं का, याचं उत्तर दिलं होतं.
तो म्हणाला, "अजिबात अवघड नव्हतं. जी गोष्ट नैसर्गिक असते ती तुमच्या आयुष्यात सहजपणे सामावून जाते. माझ्या नशिबात होत्या माझ्या दोन मुली, त्या बरोबर माझ्या आयुष्यात आल्या. इट जस्ट क्लीक्ड. आता त्या माझ्यावर इतकं प्रेम करतात, मी स्वतःला भाग्यवान समजतो."
पण गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.
शिखर आणि आयेशा दोघांनीही आपले एकमेकांसोबचे फोटो सोशल मीडियावर टाकणं बंद केलं होतं.
आयेशाने तिच्या 9 जूनला केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "जेव्हा काही महिला घटस्फोट किंवा नवऱ्यापासून वेगळं होण्याच्या गोष्टी ऐकतात तेव्हा म्हणतात की अरेरे, वाईट झालं! मला त्यांची गंमतच वाटते. या बायकांना कशाबद्दल वाईट वाटतंय? की मी आनंदात आहे, की मला मुक्त झाल्यासारखं वाटतंय, की मी इतरांना प्राधान्य देण्याऐवजी स्वतःला दिलं?"
शिखरपासून वेगळं झाल्यानंतर आयेशा काय म्हणाली?
आयेशा मुखर्जीने आपल्या घटस्फोटाबद्दल दोन पोस्ट केल्या आहेत. पण याआधीही तिने घटस्फोटबदद्ल चर्चा केली आहे.
एकदा तिने एक पॉडकास्टव्दारे घटस्फोटित महिलांचे अनुभव जाणून घेतले होते.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "घटस्फोट हा एकदम घाणेरडा शब्द आहे असं मला वाटायचं, पण आता माझाच दुसऱ्यांदा घटस्फोट होतोय. पहिल्या घटस्फोटाच्या वेळेस मला वाटलं मी स्वार्थी होतेय. मी माझ्या आईवडिलांना नाराज करतेय. मला अगदी असंही वाटलं की देवही माझ्यावर नाराज होईल. माझ्या दृष्टीने घटस्फोट हा इतका वाईट शब्द होता."
कल्पना करा, आता त्याच सगळ्या मानसिक, भावनिक आंदोलनातून मला पुन्हा जायचं आहे. आधीच एकदा घटस्फोट झाल्यामुळे दुसऱ्या लग्नाच्या वेळेस माझ्यावर जास्त प्रेशर होतं. मला स्वतःला नव्याने सिद्ध करायचं होतं. त्यामुळे दुसरा घटस्फोट अजून घाबरवणारा आहे. पहिल्यावेळी असलेली असुरक्षितेतची भावना, भीती, अपयश, आणि खिन्नता हे सगळं शंभरपटीने वाढून अंगावर आदळलं. वाटलं, माझ्यासाठी याचा अर्थ काय? एक माणूस म्हणून कशी प्रतीत होते यातून? लग्न आणि मी यांचं नातं काय?"
पण आता मी खूश आहे असंही तिने लिहिलं आहे. आयेशा म्हणते. "घटस्फोट म्हणजे तुम्ही तुमच्या परीने पूरेपुर प्रयत्न केला तरीही गोष्टी म्हणाव्या तशा झाल्या नाहीत, पण ते ठीक आहे. घटस्फोट म्हणजे माझ्याकडे एक सुंदर आणि मस्त नातं होतं आणि आता वेगळं होताना मी या नात्यातून जे शिकले त्याने नवी सुरुवात करू शकेन. घटस्फोट म्हणजे मी फक्त लग्न टिकवायचं म्हणून तडजोडी केल्या नाहीत. घटस्फोट म्हणजे मी अजून कणखर झालेय."
घटस्फोट झाला की अनेक महिलांचे जुने मित्रमैत्रिणी तुटतात. आयेशाने त्या अनुभवाविषयी ही पोस्ट केलं आहे.
ती लिहिते की, "आता आपण एकटे पडू, आपले जुने मित्रमैत्रिणी तुटतील ही भीती वाटणं साहजिक आहे. असं फक्त तुमच्याच बाबतीत होतं असं नाही. घटस्फोट झाला आणि काही मैत्र सोडून गेलं तर त्यात तुमची चूक नाही. याचा अर्थ फक्त असा की एकतर ती नाती तुमच्या दांपत्यांच्या नात्यावर अवलंबून होती, किंवा ती मैत्री घट्ट नव्हती, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या घटस्फोटानंतर तुमच्याशी कसं वागायचं ते कळलं नाही."
या गोष्टीलाही संधी समजा आणि आयुष्यात नवीन नाती बनवा असंही ती म्हणते.