गेल्या वर्षी भारतासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांवर टीका करण्याच्या आरोपाखाली एका चिनी ब्लॉगरला 8 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
'नायक आणि शहीदांचा' अपमान केल्याच्या आरोपाखाली 38 वर्षांच्या चियो जिमिंग यांना दोषी ठरवण्यात आलं. ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर, या कलमाखाली शिक्षा होणारे जिमिंग हे पहिले व्यक्ती आहेत.
या कायद्यानुसार दोषींना 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. यासोबतच जिमिंग यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, असंही सांगण्यात आलंय. आपल्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटत असल्याचं जिमिंग यांनी चीनमधली सरकारी वाहिनी CCTV वरच्या एका वृत्तात म्हटलंय.
"माझं वागणं मर्यादांचं उल्लंघन करणारं होतं," असं त्यांनी म्हटल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलंय.
गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भारत आणि चीन दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला. गलवान खोऱ्यामध्ये दोन देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. आपलेही सैनिक मारले गेल्याचं चीनने कबुल केलं, पण याविषयीची अधिक माहिती दिली नाही.
आपले 4 जवान मारले गेल्याचं त्यांनी काही काळानंतर म्हटलं होतं.
'नायकांचा अपमान'
चीनमधली सोशल मीडिया वेबसाईट विबो (Weibo) वर जिमिंग यांचे 25 लाख फॉलोअर्स आहेत. 10 फेब्रुवारीला जिमिंग यांनी विबोवर ही पोस्ट लिहीली होती.
त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. 'इंटरनेटवर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण बेकायदेशीर काम केलं, तथ्य नसलेल्या गोष्टी विबोवर पोस्ट केल्या आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या नायकांचा अपमान केल्याचं,' असं त्यांनी नंतर मान्य केलं.
यानंतर जिमिंग यांचा सोशल मीडिया अकाऊंट एक वर्षभर बंद करत असल्याचं विबोने जाहीर केलं.
भारत आणि चीनमध्ये गेली अनेक दशकं सीमा वाद सुरू आहे.
3,440 किलोमीटर्स लांबीच्या LAC (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) वर अनेकदा दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर येतात. अशावेळी हत्यारांचा वापर न करण्याचा करार दोन्ही देशांदरम्यान करण्यात आलाय.
सिक्कीममध्येही दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झटापट झाली होती, ज्यात अनेक जवान जखमी झाले होते.
पण त्यानंतर दोन्ही देशांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती दर्शवली होती.