Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लांडगे हल्ल्यांचं प्रमाण महाराष्ट्रात वाढतंय का? लांगडा कधी हल्ला करतो?

Webdunia
गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (11:56 IST)
राहुल गायकवाड
अमरावतीतील मेळघाटमधील धारणी तालुक्यातील लोकांमध्ये लांडग्यांची दहशत पाहायला मिळते आहे.
 
एका रेबीज झालेल्या लांडग्याने 40 पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतल्याचं समोर आलं आहे. संतापलेल्या नागरिकांनी लांडग्याला ठार केलं आहे.
 
एका मृत लांडग्याचा शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. या अहवालात लांडगा हा रेबीजमुळे चवताळला असल्याचं समोर आलं आहे.
 
ही घटना ताजी असतानाच मेळघाटच्या धूळघाट रेल्वे - धारणी परिक्षेत्रात 20 आणि 21 नोव्हेंबरला दुसऱ्या एका चवताळलेल्या लांडग्याने आठपेक्षा अधिक जणांचा चावा घेतला. त्यात एका बालकाचाही समावेश आहे. नंतर हा लांडगा मृतावस्थेत आढळला. या लांडग्यात देखील रेबीजची लक्षणे असल्याचे समोर आले आहे.
 
त्यामुळे नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांसुद्धा रेबीज झालेल्या लांडग्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांकडून आता या भागात गस्त घालण्यात येत आहे.
 
लांडगा हा प्राणी महाराष्ट्रात सर्वदूर आढळतो. पण, लांडग्याबाबत फारशी माहिती आपल्याला नसते.
 
लांडगा असतो कसा?, तो माणसावर हल्ला करतो का?, त्याची वैशिष्टे काय असतात? या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत.
 
लांडगा नेमका असतो तरी कसा?
लांडगा हा श्वान प्रजातीमध्ये मोडतो. लांडगा हा साधारण कोल्ह्याच्या आकाराचा असतो. त्याची उंची 60 ते 70 सेंटीमीटर इतकी असते. तर वजन हे 20 ते 30 किलो इतकं असतं. त्याचा रंग हा राखाडी असतो.
 
साधारण जबड्याच्या ठेवणीवरुन तसेच डोळ्यावरुन लांडग्याची ओळख पटवता येऊ शकते. हरीण, चितळ, मोर, ससा हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. साधारण 15 ते 20 वर्ष इतकं त्याचं जीवनमान आहे.
 
टोळ्या करुन लांडगा राहतो. पिल्लं झाल्यानंतर नर लांडगा दूर जातो. मादी लांडगाच पिल्लांचं संगोपन करते. लांडगा जंगलाच्या वेशीवर गुहांमध्ये राहणारा प्राणी आहे. विरळ जंगलामध्ये, तसेच गवतीभागात तो प्रामुख्याने आढळतो.
 
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात लांडग्यांची संख्या जास्त आहे. त्यातही सासवड भागात अधिक लांडगे आढळून येतात. लांडग्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांच्याशी संपर्क केला.
तरटे म्हणाले, ''गेल्या काही वर्षांमध्ये लांडग्यांची संख्या कमी झाली आहे. जगभरात लांडग्यांच्या 37 प्रजाती आढळतात. त्यातील केवळ एक प्रजात भारतात दिसून येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा हे सर्व राज्य मिळून केवळ 2 ते 3 हजार लांडगे शिल्लक असण्याची शक्यता आहे.''
 
लांडगा माणसावर हल्ला करतो का?
लांडगा हा शक्यतो माणसापासून लांब राहतो. लांडग्यांच्या सिमेत गेल्यावर तो माणसावर हल्ला करण्याची शक्यता असते. त्यांच्या जीवाला धोका वाटला तर ते हल्ला करतात. स्वतःहून हल्ला ते करत नाहीत, अशी माहिती पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
पाटील म्हणाल्या, ''लांडगा आणि माणूस यांचा फारसा संघर्ष होत नाही. लांडग्याला रेबीज झाला असेल तर तो माणसावर हल्ला करण्याची शक्यता असते. साधारण मुंगुसामुळे लांडग्यात रेबीज पसरू शकतो. रेबीज झालेल्या मुंगसाची शिकार लांडग्याने केली तर त्यामध्ये रेबीज पसरू शकतो.
 
''रेबीजचे दोन प्रकार आहेत. एका याच्यात प्राणी पिसाळण्याची शक्यता असते आणि दुसऱ्या याच्यात ते बधीर होण्याची शक्यता असते. रेबीज झाल्यानंतर प्राणी पाण्याला घाबरतात, त्यांचे डोळे लाल होतात. जे दिसेल त्याला ते चावायला बघतात. रेबीज एका प्राण्याकडून शिकारीच्या माध्यमातून दुसऱ्या प्राण्यामध्ये पसरण्याची शक्यता असते.''
 
मेळघाटची घटना दुर्मिळ घटना असल्याचं यादव तरटे देखील सांगतात. ''लांडगे मेंढ्यांची शिकार करतात त्यामुळे क्वचित प्रसंगी धनगर जमातीमध्ये आणि लांडग्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. पण, लांडगा हा माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो,'' असं देखील तरटे म्हणतात.
 
रेबीज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
'रस्त्यावरील भटकी कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते. तसेच घरातील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून देखील रेबीज पसरू शकतो.
त्यामुळे ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहे किंवा ज्यांचा प्राण्यांशी सातत्याने संपर्क येतो, त्यांनी दर सहा महिन्यांची टीटीचे तसेच अॅण्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यायला हवं, असा सल्ला सुचित्रा पाटील देतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments