मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयाने बॉम्बस्फोट, दंगल आणि दहशतवादी हल्यात जखमी झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार केलेत. पण, लाखो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या रुग्णालयात अंडरवर्ल्डने रक्तपातही घडवून आणलाय.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरूण गवळीच्या दुश्मनीत जे.जे रुग्णालयाने रक्तपाताचा थरार पाहिलाय.
12 सप्टेंबर 1992ला दाऊदने त्याची बहिण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळीच्या शूटर्सची रुग्णालयात घुसून हत्या केली होती.
या प्रकरणातील आरोपी यासीन फारूख उर्फ फारूख टकल्यावर मुंबई सेशन्स कोर्टात खटला सुरू झालाय. यासीन फारूखला 2018 मध्ये दुबईतून डिपोर्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली होती.
कधी झालं जे. जे. शूटआऊट?
12 सप्टेंबर 1992 चा दिवस. पहाटेचे पावणेचार वाजले होते. मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात नाईट शिफ्टला आलेले डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्यात व्यग्र होते.
जे.जे. सरकारी रुग्णालय. त्यामुळे रुग्णांची आणि पोलिसांची वर्दळ नेहमीचीच. पण, त्या दिवशी रुग्णालयातील एका वॉर्डवर पोलिसांचं विशेष लक्ष होतं. या वॉर्डबाहेर जागता पहारा होता. सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र लक्ष ठेऊन होते. वॉर्डमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाच सोडलं जात नव्हतं.
याचं कारण, जे. जे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वॉर्ड नंबर 18 मध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे आरोपी उपचार घेत होते. नावं होती शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे. दोघेही अंडरवर्ल्डशी संबंधित, त्यामुळे त्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची होती.
शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरेवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरच्या हत्येचा आरोप होता.
12 सप्टेंबर 1992च्या पहाटे पावणेचारच्या सुमारास AK-47, पिस्तूल, रिव्हॉल्वर आणि ग्रेनेड घेऊन 20 पेक्षा जास्त लोक वॉर्ड नंबर 18 मध्ये घुसले. त्यांनी शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरेच्या दिशेने अंधाधूंद गोळीबार सुरू केला. ज्यात शैलेशचा जागीच मृत्यू झाला. तर, बिपीन शेरे गंभीर जखमी झाला.
सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस पुढे सरसावले. पण, हल्लेखोरांच्या AK-47 च्या फायरिंगपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात शैलेश हळदणकरच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस शिपाई चिंतामण जैस्वाल आणि केवलसिंग भानावत ठार झाले.
जे. जे. रुग्णालयातील या हत्याकांडाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार हादरलं होतं. मुंबई अंडरवर्ल्डच्या टोळीयुद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच रुग्णालयाला टार्गेट करण्यात आलं होतं.
पण, जे. जे. रुग्णालयातील हे महाराष्ट्र आणि देशाला हादरवून सोडणारं हत्याकांड का झालं? यामागे कोण होतं?
का झालं जे. जे. शूटआऊट?
1990 चं दशक टोळीयुद्धाचं होतं. अरूण गवळी, छोटा राजन आणि दाऊद गॅंगकडून मुंबईवरील वर्चस्वासाठी रस्त्यावर खुलेआम रक्ताचे पाट वाहिले जात होते. जे.जे. हत्याकांडाला गवळी आणि दाऊदमधील वर्चस्वाच्या लढाईची किनार होती.
'मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया' या पुस्तकात पत्रकार प्रभाकर पवार यांनी जे.जे हत्याकांड का झालं? कोणी घडवून आणलं? याला कोणती घटना कारणीभूत ठरली? याबाबतची सविस्तर माहिती दिलीये.
मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये दाऊदच्या गुडांनी केलेल्या अंधाधूंद गोळीबारात गवळी गॅंगचे रवींद्र फडके आणि जोसेफ परेराची हत्या झाली. त्याचा बदला घेण्यासाठी आणि दाऊदला धडा शिकवण्यासाठी गवळीने दाऊदची बहिण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरच्या हत्येचा प्लान आखला. गवळीने आपले खास शार्प शूटर शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरेवर ही जबाबदारी सोपवली.
तारीख होती 26 जुलै 1992. दाऊदचा मेहुणा इब्राहिम पारकर, नागपाडा भागात होता. इतक्यात शैलेश आणि बिपीन तिथे पोहोचले आणि त्यांनी इब्राहिम पारकरवर गोळीबार केला.
इब्राहिम पारकरची हत्या केल्यानंतर शैलेश आणि बिपीन पळून जाऊ लागले. लोकांनी आरडा-ओरड सुरू केली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना लोकांनी पकडून खूप चोपलं. शैलेश आणि बिपीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रभाकर पवार सांगतात, "बहिणीच्या पतीच्या हत्येने दाऊदला चांगलाच धक्का बसला. या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने जे.जे. हत्याकांड घडवून आणलं."
AK-47, 500 गोळ्या आणि लाल दिव्याची गाडी
मुंबई अंडरवर्ल्डचा तो काळ बलजीत परमार यांनी क्राइम रिपोर्टर म्हणून खूप जवळून पाहिलाय. जे. जे. हत्याकांडाबाबत बोलताना ते म्हणतात, "जे. जे. हत्याकांड हे रुग्णालय प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, राजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांबाबत जे प्रश्न उपस्थित केले जात होते यांचं एक उत्तम उदाहरण होतं."
जे. जे. रुग्णालयात गवळी टोळीतील शूटर्सना मारण्यासाठी दाऊद गॅंगमधील 24 लोकांनी 500 गोळ्या फायर केल्या होत्या.
प्रभाकर पवार सांगतात, "शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे यांच्यावर कोणत्या बेडवर उपचार सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी दोन बुरखाधारी महिलांनी रेकी केली होती. सुरक्षेसाठी किती पोलीस तैनात आहेत. बंदोबस्त कुठे आणि कसा असतो याची माहिती गोळा करण्यात आली होती."
इब्राहिम पारकरच्या हत्येचा आरोप असलेले शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे रुग्णालयातून पळून जाऊ नयेत यासाठी एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.
"दाऊदचे शूटर सुनील सावंत, सुभाषसिंग ठाकूर, शामकिशोर गरिकापट्टी आणि इतरांनी रुग्णालयात घुसून शैलेशला जागीच गोळ्या घातल्या," प्रभाकर पवार पुढे सांगतात.
शूटर्स गाडीतून रुग्णालयात आले होते. काहींनी पायऱ्यांवर पोजिझन घेतली. तर सुभाषसिंग ठाकूर आणि इतर सहा आरोपी वॉर्डच्या दिशेने गेले आणि फायरिंग सुरू केली.
जे. जे. हत्याकांडाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. या हत्याकांडात आरोपींनी एक लाल दिव्याची गाडी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
'मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया' पुस्तकात प्रभाकर पवार लिहीतात, "शूटर्स लाल दिव्याच्या अॅम्बेसेडर गाडीतून पळाल्याची माहिती एका साक्षीदाराने क्राइम ब्रांचला दिली. या गाडीचा तपास करत पोलीस भिवंडीचे नगराध्यक्ष जयसूर्य राव यांच्यापर्यंत पोहोचले."
जे. जे. हत्याकांड प्रकरणी ज्या 24 आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. त्यात राव यांचंही नाव होतं. टाडा कोर्टाने सूर्यराव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली होती.
अरूण गवळी आणि दाऊदची दुश्मनी का झाली?
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात भायखळ्याचा रमा नाईक अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होता. अरूण गवळीने रमा नाईकसोबत गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. बलजीत परमार सांगतात, "मुंबईतील एका जागेवरून रमा नाईक आणि दाऊद यांच्यात जोरदार भांडणं झालं." या वादातून पुढे रमा नाईकची हत्या झाली. त्यानंतर टोळीची सूत्र अरुण गवळीकडे आली.
अरूण गवळी आणि दाऊदचं कधीच पटलं नाही. अंडरवर्ल्डमधील वर्चस्वासाठी दोन्ही टोळ्यांमध्ये दुश्मनी होती. गवळीने मध्य मुंबईत दहशत पसरवण्यास सुरूवात केली होती.
बलजीत परमार पुढे म्हणाले, "1990 मध्ये दाऊदच्या शूटर्सनी अरूण गवळीचा मोठा भाऊ पापा गवळीची माहिममध्ये हत्या केली. तेव्हापासून दाऊद आणि गवळी गॅंगची दुश्मनी वाढू लागली."
भावाच्या हत्येचा बदला घेण्याची संधी गवळी शोधत होता. म्हणून त्याने दाऊदची बहिण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरवर नजर ठेवण्यास सुरूवात केली.
बलजीत परमार सांगतात, "इब्राहिम पारकरचा पाठलाग करत गवळीचे शूटर्स टेमकर मोहल्लामध्ये पोहोचले. त्यांनी इब्राहिमला रस्त्यातच दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या. पण, या भागातील रस्ते छोटे असल्याने शूटर्स पळून जात असताना लोकांनी त्यांना पकडलं."
जे. जे. शूटआऊटसाठी यूपीतून आणले शूटर्स
जे. जे. रुग्णालयाच्या आसपासचा परिसर गजबजलेला आहे. एका बाजूस दाऊदचा दबदबा असलेला डोंगरी आणि नागपाडा. तर दुसऱ्या बाजूला गवळीचा भायखळा परिसर आहे.
बलजीत परमार पुढे सांगतात, "जे. जे. रुग्णालयाच्या जवळपास दोन पोलीस स्टेशन, अतिरिक्त पोलीस आयुक्तांचं कार्यालय आहे. त्यामुळे हे ऑपरेशन खूप कठीण होतं. स्थानिक लोक घेतले असते तर ऑपरेशनची माहिती लिक होण्याची शक्यता होती. त्यामुळे यूपीतून लोक आणण्यात आले."
मिळालेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनसाठी एक टीम फारूख टकल्याच्या घरी ठेवण्यात आली होती. याच यासीन फारूखवर आता मुंबई सेशन्स कोर्टात खटला सुरू झालाय. 2017 मध्ये दुबईमधून डिपोर्ट केल्यानंतर फारूखला सीबीआयने अटक केली.
तर, जे. जे. हत्याकांडात यूपीच्या विरेंद्र राय नावाच्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर यूपीतून बंदुका आणि शूटर्स पाठवण्याचा आरोप होता. पुढे टाडा कोर्टाने त्याला पुराव्याअभावी मुक्त केलं.
बलजीत परमार पुढे म्हणाले, "जे.जे. हत्याकांडातील काही आरोपींना सूर्यराव यांच्या लाल दिव्याच्या सरकारी गाडीतून भिवंडीहून हल्ला करण्याच्या दिवशी मुंबईत आणण्यात आलं होतं."
वॉर्ड नंबर 18 हा कैदेत असलेल्या गुन्हेगारांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी राखीव होता. बलजीत परमार सांगतात. "कैदी पळून जाऊ नयेत यासाठी 12 ते 14 पोलीस कर्मचारी वॉर्डमध्ये सुरक्षेसाठी तैनात असत. त्यामुळे शूटर्सना इतकी हत्यारं घेऊन पाठवण्यात आलं होतं की, पोलीस प्रतिकार करण्याआधीच अंधाधूंद फायरिंग करायची."
जे. जे. हत्याकांडात किती आरोपींना शिक्षा झाली?
रेडीफ.कॉमच्या माहितीनुसार, जे. जे. रुग्णालय हत्याकांड प्रकरणी साल 2000 मध्ये टाडा कोर्टाने गॅंगस्टर सुभाषसिंह ठाकूर, शामकिशोर गरिकापट्टी आणि सूर्यराव यांना दोषी ठरवलं होतं. सुभाषसिंह ठाकूरला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
41 आरोपींपैकी 9 आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. काही आरोपींना पुराव्यांअभावी दोषमुक्त करण्यात आलं. काही आरोपी फरार तर काहींची हत्या झाली होती.
तर आता या प्रकरणातील आरोपी यासीन फारूख उर्फ फारूख टकल्यावर मुंबई सेशन्स कोर्टात खटला सुरू झालाय. यासीन फारूखला 2018 मध्ये दुबईतून डिपोर्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली. या प्रकरणातील एका साक्षीदाराने कोर्टात फारूखची ओळख पटवल्याची माहिती आहे.
Published By -Smita Joshi