Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Karim Lala: दाऊद इब्राहिम कधी करीम लालांच्या नादी का लागला नाही?

Karim Lala: Why Dawood Ibrahim has never been a Karim Lala
, शनिवार, 18 जानेवारी 2020 (11:00 IST)
वेल्ली थेवर
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या डॉन करीम लालांना भेटायच्या, असा दावा महाराष्ट्रातले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आणि नकळतपणे एका अशा विषयाला हात घातला, ज्यावर सहसा कुणी बोलत नाही.
 
त्यामुळे एकेकाळी मुंबईचा डॉन राहिलेल्या लालांच्या आठवणी त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा ताज्या होत आहेत, त्यांचे कारनामे अचानक चर्चेत आले आहेत.
 
दक्षिण मुंबईतल्या पायधुनी गेटवर करीम लालाच्या ऑफिसमध्ये लावलेल्या एका फोटोवर अचानक चर्चा सुरू झाली आणि या फोटोच्या आधारेच प्रत्येक जण हा दावा करतोय की इंदिरा गांधींनी करीम लालांची भेट घेतली होती.
 
दाउद इब्राहिम मुंबईचा एल कपोन (एल कपोन जगातला सर्वांत कुख्यात माफिया गुंड मानला जातो) होण्याआधी करीम लाला आणि त्यांच्यासारख्या लोकांना समाजात तुच्छ समजलं जायचं.
 
सोन्याचे तस्कर हाजी मस्तान मंत्रालयात जाऊन सरकारमध्ये बसलेल्या लोकांना भेटायचे. हिंदू-मुस्लीम तणाव कमी करण्यासाठी झालेल्या अनेक चर्चांमध्ये ते सहभागी झाले होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात करीम लाला आणि हाजी मस्तान दोघांनीही स्वतःला आपापल्या संघटनांसाठी समर्पित केलं होतं.
Karim Lala: Why Dawood Ibrahim has never been a Karim Lala
हाजी मस्तानने दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ नावाने राजकीय संघटना स्थापन केली होती, तर करीम लालाने 'पख्तून जिरगा-ए-हिंद' या नावाने संघटना स्थापन केली होती. ही संघटना अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या पश्तून किंवा पठाण लोकांसाठी काम करायची.
 
करीम लाला स्वतः पठाण होते. लहानपणीच ते भारतात आले होते. त्यांच्यावर 'फ्रंटियर गांधी' म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान यांचा प्रभाव होता. मात्र त्यांनी जो मार्ग निवडला तो फ्रंटियर गांधी यांचे आदर्श किंवा विचारसरणीशी सुसंगत नव्हता.
 
व्याजावर पैसे द्यायला सुरुवात केली
भारतात आल्यानंतर सुरुवातीच्या वर्षांमध्ये अब्दुल करीम खान ऊर्फ करीम लालांने सट्ट्याचे क्लब सुरू केले. जे लोक या क्लबमध्ये पैसा गमवायचे, ते घरखर्च चालवण्यासाठी खानच्या माणसांकडून पैसे उसने घ्यायचे.
 
हे बदलण्यासाठी लालाने विचार केला की उधारीवर व्याज घ्यायला सुरुवात केली तर लोक उधार घेणं बंद करतील. मात्र व्याज घ्यायला सुरुवात केल्यानंतर लालाच्या लक्षात आलं की दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्याकडे व्याजाचेच बक्कळ पैसे येऊ लागले होते. आणि अशा पद्धतीने लालाने व्याजावर पैसे देणं सुरू केलं.
 
त्यानंतर लालांनी त्यांच्या माणसांकडून लोकांची भाड्याची घरं रिकामी करण्यास सुरुवात केली, जे घर सोडायला तयार नव्हते.
 
वयाच्या पन्नाशीपर्यंत लालांचं नाव मोठं झालं होतं. याच दरम्यान लालाच्या एका चाहत्याने त्यांना चालण्यासाठी सोन्याचं नक्षीकाम असणारी एक अँटीक काठी भेट म्हणून दिली.
 
लाला कुठल्याही पार्टी किंवा सामाजिक समारोहासाठी ही काठी आवर्जून घेऊन जायचे. काठी विसरले तरी त्या काठीला हात लावायचं धाडस कुणी करायचं नाही. काठी असलेली जागा लालांची आहे, असं समजून लोक तिथे बसायचेही नाही.
 
इथूनच लालांच्या पंटरांना युक्ती सुचली आणि घर रिकामी करण्यासाठी लालांच्या काठीचा वापर करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर भाडेकरूने घर सोडायला नकार दिला की त्याच्या दाराबाहेर लालांची ही काठी ठेवली जायची.
 
'लालांशी वैर नको' म्हणून घाबरून भाडेकरू तात्काळ घर रिकामं करायचे. त्यामुळेच ही काठी म्हणजे घर सोडण्याची नोटीसच मानली जाऊ लागली.
 
गंगूबाईने बांधली करीम लालांना राखी
 
धाकदपटशाहीची कामं करूनही दक्षिण मुंबईत लालांची ख्याती एक प्रामाणिक आणि न्यायप्रिय व्यक्ती अशी होती.
 
गंगूबाई कोठेवाली दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा रेड लाईट भागात बरीच प्रसिद्ध होत्या. शौकत खान नावाच्या एका पठाणाने त्यांच्यावर दोन वेळा बलात्कार केला. तेव्हा ती करीम लालांकडे गेली. करीम लालांनीही या प्रकरणात स्वतःहून लक्ष घातलं आणि त्यांना शौकत खानपासून वाचवलं, आपल्या गुंडांना पाठवून शौकत खानला मारहाणही केली.
 
तेव्हापासून आपलं रक्षण करणाऱ्या करीम लालांना गंगूबाई राखी बांधू लागल्या.
 
बॉलिवुड दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा याच गंगूबाईवर एक सिनेमा येतोय, ज्यात आलीया भटने गंगूबाईची भूमिका साकारली आहे.
 
मुंबईत माफियांचा सुळसुळाट होण्यात करीम लालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे फारसं कुणाला माहिती नाही. करीम लालांनीच हाजी मस्तानशी जवळीक वाढवली आणि सोन्याच्या तस्करीत स्वतःची ताकद हाजी मस्तानच्या पाठीशी उभी करण्याचं आश्वासनही दिलं.
 
करीम लालांच्या मदतीशिवाय हाजी मस्तानला सोन्याच्या तस्करीत एवढं यश मिळवणं शक्यच नव्हतं. इतकंच नाही तर करीम लाला आणि हाजी मस्तान यांची दाऊद इब्राहिमचे वडील पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर यांच्याशी मैत्री नसती तर दाऊदला कधीच त्यांच्यासारखं बनण्याची प्रेरणा मिळाली नसती.
 
इब्राहिम कासकर यांनी कधीच हाजी मस्तान किंवा करीम लाला यांच्याकडून आर्थिक मदत घेतली नाही. मात्र, दाऊदला यात काहीच गैर वाटत नव्हतं. दाऊदने या दोन डॉनचं अनुकरण केलं आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करत या दोन डॉननाही मागे टाकलं.
 
आणीबाणीनंतर हाजी मस्तान आणि करीम लाला या दोघांनाही अटक झाली. त्यामुळे एक नवीन पर्व सुरू झालं.
 
हाजी मस्तानला बॉलीवुमध्ये प्रवेश करायचा होता. तर करीम लालांना स्वतःच्या प्रतिमेची काळजी होती. त्यामुळे त्यांनी पुढे जाण्याची तयारी सुरू केली.
 
सात फुटांचे करीम लाला त्यांची उंची, ट्रेड मार्क सफारी सूट आणि गडद काळ्या रंगाच्या चष्म्यासाठी ओळखले जायचे.
 
एव्हाना दाऊद इब्राहिम पठाणांना लक्ष्य करणारा गँगस्टर म्हणून ओळखला जाऊ लागला होता. दाऊदने करीम लालांची पुतणी समद खान आणि इतर जवळच्या लोकांचा खून केला होता. मात्र, त्याने कधीच करीम लालांना लक्ष्य केलं नाही.
 
अखेर या दोघांची भेट झाली मक्केत. तिथे दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेत समझोता केला.
 
मुस्लीम समाज हाजी मस्तान आणि करीम लाला यांचा आदर करायचा. त्यांना सर्व कार्यक्रमांचं निमंत्रण असायचं. हे दोन्ही डॉन सोशली खूप active होते. कदाचित अशाच एखाद्या प्रसंगी त्यांची इंदिरा गांधींशी भेट झाली असावी आणि तो क्षण कॅमेऱ्याने टिपला असावा.
 
करीम लाला यांनी कायद्यापासून ना कधी पळ काढला आणि त्यांच्या नावावर फारसे गंभीर गुन्हेही नव्हते.
 
नव्वदीच्या दशकात त्यांना एकदा बळजबरीने घर रिकामं करण्याच्या एका प्रकरणात अटक मात्र झाली होती.
 
(ज्येष्ठ पत्रकार वेल्ली थेवर शोध पत्रकार आहेत. मुंबईतली वेगवेगळी वर्तमानपत्रं आणि मॅगेझिन्ससाठी गेली 30 वर्षं त्यांनी क्राईम बीट कव्हर केला आहे.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा