वर्षअखेर जवळ आल्यानं विविध कामं तातडीनं आटोपण्यासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. मात्र, या घाईत आयकर विभागाच्या सूचनेकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.
या वर्षअखेरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. 'Building a better tomorrow!' असं म्हणत आयकर विभागानं हे आवाहन केलंय.
खरंतर पॅन-आधार जोडण्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली असून, आता 31 डिसेंबरपर्यंत अवधी देण्यात आलाय. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) हा निर्णय घेतलाय.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टानं आधार योजनेची घटनात्मक वैधता मान्य केली होती. तसेच, आयकर भरताना बायोमेट्रिक आयडी म्हणून आधार कार्ड आवश्यक असल्याचेही नमूद केले होते.
आधार कार्ड हे यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून देण्यात येते.
पॅन-आधार कसा लिंक कराल?
• भारतीय आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा.
• त्यानंतर तिथे डाव्या बाजूस तुम्हाला विविध पर्यायांची यादी दिसेल. त्यातील 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.
• त्यानंतर ऑनलाईन फॉर्म उघडा. त्यात आवश्यक माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर 'Link Aadhar' वर क्लिक करा.
• पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी याच ठिकाणी 'तुमचं पॅन-आधार लिंक झालंय का ते इथं पाहा' अशा आशयाचं इंग्रजी/हिंदीत लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.