Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा 2019: उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उत्तर मुंबईतून उमेदवार, गोपाळ शेट्टींना आव्हान देणार

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2019 (13:17 IST)
दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसवासी झालेल्या चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत. काँग्रेसनं थोड्याच वेळापूर्वी अधिकृत घोषणा केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे.
 
उर्मिला मातोंडकर या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ग्रीन्डलेज बँकेत काम करत होते. मातोंडकर यांचा मोठा भाऊ केदार इंडियन एअरफोर्समध्ये आहे.
 
उर्मिला मातोंडकर यांनी बालअभिनेत्री म्हणून 1980 साली श्रीराम लागूंच्या 'झाकोळ'मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या कलयुग आणि शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्येही त्यांनी काम केलं होतं. मात्र 1995 साली राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'रंगीला' आणि 1997 मध्ये आलेल्या 'सत्या' या चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धी दिली.
 
उर्मिला मातोंडकर यांनी तामीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. मात्र 2005 नंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्याचं दिसतंय. मात्र त्यानंतर त्यांनी 'वार परिवार', 'चक धूम धूम' आणि 'डान्स महाराष्ट्र डान्स' अशा रिअॅलिटी शोजच्या होस्ट आणि जज म्हणूनही काम केलं आहे.
 
मातोंडकर कुटुंबाची पार्श्वभूमी
उर्मिला मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे भारतातील एकेकाळची आघाडीची बँक ग्रीन्डलेज बँकेत काम करत होते. या बँकेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या संघटनेचं नेतृत्वही त्यांनी केलं. ही बँक नंतर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत विलीन झाली. यानंतर काही काळाने श्रीकांत मातोंडकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
 
श्रीकांत मातोंडकर हे 'राष्ट्रसेवा दला'शी संबंधित आहेत. त्यांनी आणीबाणीच्या विरोधातही भूमिका घेतली होती. मृणाल गोरे आणि इतर दिग्गजांसोबत त्यांनी कामगार वर्गासाठी सक्रीयपणे काम केलं आहे, अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ऑल इंडिया बँक वुमेन फेडरेशनच्या अंधेरीत पार पडलेल्या पहिल्या अधिवेशनात उर्मिला या प्रमुख पाहुण्या म्हणूनही उपस्थित होत्या.
 
कामगार संघटना मातोंडकरांचा प्रचार करणार
श्रीकांत मातोंडकर आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही चळवळीशी संबंधित होते. मृणाल गोरेंसोबतही त्यांनी काम केलं आहे. 'राष्ट्रसेवा दला'तही ते कार्यरत होते. त्यांची सर्वसमावेशक भूमिका आणि विचार पाहता कामगार संघटना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारात सक्रियपणे भाग घेणार असल्याचं कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितलं आहे.
 
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
उत्तर मुंबई मतदारसंघात दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातल्या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. तर प्रत्येकी एका मतदारसंघात शिवसेनेचा आणि काँग्रेसचा आमदार आहे.
 
1952 ते 1984 पर्यंत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि डाव्या पक्षांचं वर्चस्व होतं. श्रीपाद अमृत डांगे, मृणाल गोरे अशा दिग्गजांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र 1989 मध्ये निवडून आलेल्या राम नाईक यांनी उत्तर मुंबईत भाजपची पाळंमुळं घट्ट केली. त्यांची लोकांशी असलेली जवळीक आणि ग्राऊंडवर असलेलं काम यामुळे ते लोकप्रिय राहिले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम काम केलं.
 
मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत दिग्गज नेते राम नाईक यांना सिनेअभिनेता गोविंदानं कडवी लढत दिली. विशेष म्हणजे नाईकांचा उत्तम जनसंपर्क, चांगलं काम आणि स्वच्छ इमेज असतानाही गोविंदानं या मतदारसंघात बाजी मारली. त्यानंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांनी 2009 मध्ये इथून निवडणूक जिंकून लोकसभा गाठली.
 
2014च्या मोदी लाटेत मात्र उत्तर मुंबई पुन्हा एकदा भाजपनं जिंकून घेतला. माजी आमदार गोपाळ शेट्टी यांना भाजपनं आखाड्यात उतरवलं होतं. त्यांच्याविरोधात संजय निरुपम मैदानात होते. मात्र गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी पराभव केला.
 
गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकर यांचं आव्हान
गोपाळ शेट्टी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी बोरिवली मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेत केलं आहे. मुंबईचं अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली. मात्र जुलै 2018 मध्ये मालवणीत एका कार्यक्रमात बोलताना 
 
त्यांनी "देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचं योगदान नव्हतं" असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पक्षाच्या श्रेष्ठींकडून बोलणीही खावी लागली. त्यानंतर दुखावलेल्या शेट्टींनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र नंतर हा वाद शमला.
 
उर्मिला मातोंडकर या मराठी आहेत. सिनेसृष्टीत काम केल्याने स्टारडमचा फायदाही प्रचारात होऊ शकतो, असं राजकीय पत्रकार सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments