Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या लढतीकडे देशाचं लक्ष का लागलंय?

लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या लढतीकडे देशाचं लक्ष का लागलंय?
, मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:57 IST)
सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. केवळ हाय-प्रोफाईल उमेदवार या राखीव असणा-या मतदारसंघातून उभे आहेत म्हणून ती महत्वाची आहे असं नाही. तर देशभरात चर्चिल्या जाणा-या धार्मिक मुद्द्यांवरवरच्या ध्रुवीकरणाचं आणि सोबतच महाराष्ट्रात महत्त्वाचं ठरत असलेल्या जातीय मुद्द्यांवरच्या मतविभागणीचं चित्रं एकत्रितपणे या निवडणुकीत दिसतं आहे.
 
एका बाजूला दलित समाजातून आलेलं पण नंतर प्रस्थापितांमधलं झालेलं सुशीलकुमार शिंदेंचं जुनं नेतृत्व, दुस-या बाजूला वंचितांच्या अस्मिता गेल्या सरकारच्या काळात दाबल्या गेल्या असं म्हणत आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रस्थापितांविरोधातल्या रागाचा आधार घेऊन नव्यानं उभं राहिलेलं प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व आणि त्यांच्यासमोर राजकारणात नवखे, पण धार्मिक गुरु असलेले जयसिद्धेश्वर स्वामी अशी सोलापूरात लढत आहे. त्यामुळेच समकालीन भारताचं सामाजिक आणि राजकीय चित्र सोलापूरच्या निवडणुकीत दिसतं आहे.
 
सोलापूर हा सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीचाही मतदारसंघ आहे. आंबेडकरवादी चळवळीचं सोलापूर कायमच एक केंद्र राहिलेलं आहे. दलित समाजातील विविध वर्गांची इथली लोकसंख्याही मतांच्या गणितात निर्णायक आहे.
 
बिडी कामगार असतील वा सूतगिरणी कामगार, आता बहुतांशी कमी होत गेलेल्या या उद्योगांतला कामगारवर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे मार्क्सवादी चळवळीचंही केंद्र होतं आणि कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम हे मध्य सोलापूरातून विधानसभेत निवडूनही जायचे. सोलापूरमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्याही निर्णायक आहे. दीर्घ काळ कॉंग्रेसचा समर्थक राहिलेला हा सोलापुरातला समाज २०१४च्या विधानसभा निवडणुकीत 'एमआयएम'च्या मागे राहिल्याने काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंसाठी लढत अत्यंत चुरशीची झाली होती.
 
कर्नाटक आणि आंध्र-तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या सोलापुरात लिंगायत समाजाची मोठी लोकसंख्या आहे. शिवयोगी सिद्धेश्वरांच्या वास्तव्यामुळे लिंगायत समाजासाठी सोलापूरचं महत्व अधिक आहे. सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीचंही मोठं केंद्र राहिलेलं आहे. सोलापूरसोबतच जवळचा पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा हा सगळाच सहकाराचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सोलापूरच्या मतांच्या गणितात मराठा समाजाची भूमिकाही निर्णायक मानली जाते. यासोबतच, सोलापूर शिक्षणाचं केंद्र असल्यानं सुशिक्षित आणि पांढरपेशा वर्गही मोठ्या संख्येनं आहे. अशा या वेगवेगळ्या प्रवाहांची यंदाच्या निवडणुकीतली भूमिका महत्वाची बनली आहे.
 
सोलापूरात ४० वर्षांपासून अधिक काळात ज्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं, राज्याचे ते मुख्यमंत्री झाले आणि देशाचे गृहमंत्री झाले असे सुशीलकुमार शिंदे एका बाजूला आहेत. काँग्रेसनं कायमच दलित समाजातलं नेतृत्व म्हणून त्यांचा चेहरा राष्ट्रीय स्तरावरही पुढे केला. सुशीलकुमार कायम सोलापूर शहरातून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जात राहिले आणि नंतर लोकसभेत. २०१४ च्या अगोदर हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असतांनाही, अनेकदा निवडून गेले आहेत. अर्थात सुभाष देशमुखांच्या विरोधात लोकसभा पोटनिवडणुकीत शिंदेंच्या पत्नी उज्वला शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: सुशीलकुमार शिंदेंना पराभूत व्हावं लागलं होतं. २०१४ नंतर आपण निवडणूक आता लढवणार नाही असं शिंदेंनी म्हटलं होतं, पण तो निर्णय बदलून वयाच्या ७८ व्या वर्षी ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
 
दुस-या बाजूला प्रकाश आंबेडकर आहेत जे 'वंचित बहुजन आघाडी'च्या स्थापनेनंतर आक्रमक झाले आहेत आणि राज्यभरात त्यांनी उमेदवार दिले आहेत. ते विदर्भातल्या अकोल्यातून यापूर्वी निवडूनही गेले आहेत आणि यंदाही तिथून निवडणूक लढवताहेत. पण त्याचवेळेस सोलापूरातूनही शिंदेंना आव्हान देत निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेवटपर्यंत सोलापूरातून ते निवडणूक लढवतील का नाही याबद्दल संदिग्धता होती. पण शेवटच्या क्षणी ते इथून उभे राहिले. या निवडणुकीत दलित समाजातील मतांचं संघटन हा महाराष्ट्रात महत्वाचा फॅक्टर झाला आहे, म्हणूनच 'वंचित आघाडी'ची सोलापुरातली एन्ट्री निर्णायक ठरली आहे.
 
लढतीचा हा त्रिकोण पूर्ण होतो भाजपचे उमेदवार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामींमुळे. त्यांना राजकारणाचा पूर्वानुभव नाही. पण ते लिंगायत समाजासाठी या परिसरातले मोठे धार्मिक नेते आहेत. लिंगायत समाजाचं या भागातलं लोकसंख्येतलं प्राबल्य पाहता त्यांना भाजपानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यासोबतच धर्मगुरु या त्यांच्या प्रतिमेचाही त्यांच्या समाजाबाहेर उपयोग करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
अशा स्थितीत सोलापुरात काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. "१९९४ पासून सोलापूर मतदारसंघात जरी पराभव होत राहिला असला तरीही भाजपाला ३८ टक्के मतदान कायम झालं आहे. काँग्रेसची तशी ५४ ते ५५ टक्के मतं त्यांची म्हणून आहेत. जेव्हा 'भाजप'चे सुभाष देशमुख जेव्हा सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्वला शिंदे यांचा पराभव करून निवडून आले होते, तेव्हा मतं वाढली होती. २०१४ ला शरद बनसोडे जेव्हा निवडून आले, तेव्हा मात्र उलटी परिस्थिती झाली होती. त्यामुळं भाजपाचा ३८ टक्के मतांचा बेस जो आहे तो कायम असतो, ते पराभूत जरी झाले तरीही. यावेळेस मोदीलाट जरी नसली तरीही तो कायम राहील. त्यामुळे उरलेली ६२ टक्के जी मतं आहेत त्यात सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांना किती आणि कशी मतं पडतात यावर सोलापूरचा निकाल अवलंबून असेल," असं सोलापूर 'लोकमत'चे निवासी संपादक सचिन जवळकोटे म्हणतात.
 
सगळ्याच पक्षाच्या आणि उमेदवारांच्या पारंपारिक मतांची सरमिसळ झाल्यानं सोलापूरचा निकाल सहजसोपा असणार नाही असंही निरीक्षकांना वाटतं. "लिंगायत समाजाचा इथला बराचसा भाग हा 'भाजपा'सोबतही असतो आणि सुशीलकुमारांसोबतही असतो. पण 'भाजपा'चे यंदाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी हे जरी राखीव जातींमधले असले तरीही, लिंगायत समाजाला ते महाराज वाटतात, गुरु वाटतात. १९६१-६६ या दरम्यान आप्पासाहेब्ब पटादी हे सोलापूरचे खासदार होते. त्यांच्यानंतर लिंगायत समाजाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. त्यामुळे या मुद्द्यावर लिंगायत समाज एकत्र येऊ शकतो. पण सुशीलकुमार शिंदेंनीही हा समाज आपल्यासोबत रहावा यासाठी प्रयत्न केले आहेत आणि काँग्रेसच्या दुस-या फळीतल्या लिंगायत नेत्यांनीही त्यासाठी काम केलं आहे," जवळकोटे पुढे म्हणतात.
 
ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या मते २०१४ प्रमाणे याही निवडणुकीत नवमतदार निर्णायक भूमिका बजावेल. "गणितं जातीवर आधारित मतांची सुरु आहेत. मराठा समाज इथे कोणाच्या बाजूनं जाणार याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पण जातींची गणितं काहीही असू द्या, जो एक नवा मतदार आहे नव्यानं नाव नोंदणी केलेला, तो मतदार जातीच्या बाहेर विचार करणारा आहे. ते काय करतात याचा निवडणुकीवर जास्त परिणाम करणारा असेल," जोशी म्हणतात.
 
पण सोलापूरात जे चित्रं दिसतं आहे ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहायला मिळतं आहे आणि त्यामुळे नवी समीकरणंही तयार होत आहेत. सचिन जवळकोटेंच्या मते, "भीमा कोरेगांवच्या घटनेनंतर आंबेडकरी चळवळीतल्या मतदारांचं जे ध्रुवीकरण झपाट्यानं झालं आणि अजून होतं आहे ते महत्वाचं ठरेल. त्यात प्रकाश आंबेडकर इथून उभे राहिल्यावर 'बाबासाहेबांचं रक्त' असं म्हणून ज्या भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, त्यानंतर 'रिपब्लिकन पार्टी'चे गट असतील, 'बसपा'असेल, वा अगदी 'माकपा'-'भाकपा' असतील, हेसुद्धा 'वंचित बहुजन आघाडी'कडे आले. हे चित्रं सोलापुरात, आणि कदाचित महाराष्ट्रातही, पहिल्यांदा पहायला मिळतं आहे."
 
"मोदी सध्या प्रचारात 'हिंदू दहशतवादा'चा उल्लेख करताहेत. तो शब्द प्रचारात आणण्याचा आरोप ते ज्यांच्यावर करताहेत तेच सोलापूरात उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांच्यासमोर एक भगवी वस्त्रं परिधान केलेला उमेदवार उभा आहे. त्यामुळे जे टिपिकल भारताच्या ध्रुवीकरणाचं एक छोटंसं रूपच सोलापुरात पाहायला मिळतं आहे. विकासाच्या मुद्द्याबरोबरच धार्मिक मुद्द्यावर इथे निवडणूक होते आहे. प्रकाश आंबेडकरांचं अपिल जे आहे ते जातीय वा वंचित घटकांचं आहे, पण भाजपच्या महाराजांचं जे अपिल आहे ते हिंदू विरुद्ध हिंदूंना तथाकथितपणे विरोध करणा-या पुरोगामी शक्ती असं आहे," अरविंद जोशी म्हणतात.
 
त्यामुळेच पारंपारिक धार्मिक आणि सामाजिक समीकरणांना देशात आणि राज्यात जे नवे राजकीय आयाम मिळाले, ते सोलापूरच्या निवडणुकीत पहायला मिळताहेत. त्याचा परिणाम केवळ या लोकसभा निवडणुकीवर नव्हे तर पुढच्या सहा महिन्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक एवढी महत्वाची झाली आहे.

मयुरेश कोण्णूर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉंग्रेससाठी रितेश मैदानात भाजपवर टीका म्हणाला ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते