जमैकाची टोनी-अॅन सिंग यंदाच्या 69 व्या 'मिस वर्ल्ड' किताबाची मानकरी ठरली आहे. भारताची सुमन राव आणि फ्रान्सची ओफेली मेझिनो या स्पर्धेच्या रनर अप ठरल्या.
इतिहासात पहिल्यांदाच मिस USA, मिस Teen USA, मिस अमेरिका, मिस युनिव्हर्स आणि आता मिस वर्ल्ड या सर्व नामांकित सौंदर्यस्पर्धांमध्ये कृष्णवर्णीय तरुणींनी छाप उमटवली आहे.
23 वर्षीय टोनी सिंगचा जन्म जमैकातील सेंट थॉमस शहरातला. टोनीला वैद्यकीय शिक्षण करून डॉक्टर व्हायचंय.
तिने शनिवारी ट्वीट करत म्हटलं, "हे लक्षात ठेवा, की आपण आपली स्वप्नं साध्य करण्यासाठी पात्र आणि सक्षम आहोत. आपल्याकडे एक 'उद्देश' आहे."
लंडनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या भव्यदिव्य सोहळ्यात टोनीने ब्रिटनी ह्युस्टन हिचं 'I Have Nothing' हे गाणं सादर करून तसंच परीक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊन सगळ्यांची मनं जिंकली.
मिस वर्ल्ड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना टोनीनं म्हटलं, "हे स्वप्नवत वाटतंय. मी खूप आभारी आहे."
"तुम्ही माझ्यात जे काही बघितलं, त्याबद्दल धन्यवाद. आता मी कामासाठी सज्ज आहे."
यंदाच्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत वेगवेगळ्या देशातील तब्बल 111 तरुणींनी सहभाग नोंदवला होता. या सर्वांना मागे टाकत जमैकाच्या टोनी सिंहने हा किताब मिळवला आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात जमैकाने चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे.
स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक असलेल्या पिअर्स मॉरगन यांनी टोनीला विचारलं, "तू संगीताच्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहेस का?"
त्यावर टोनीनं उत्तर दिलं, "संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेन."
टोनीच्या नावाची घोषणा होताच मिस नायजेरियाने जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली, त्यावरही सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
ज्यावेळी 'मिस वर्ल्ड'च्या नावाची घोषणा झाली तेव्हा स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर असलेली न्येकेची डगलस आनंदाने जोरात किंचाळली. ही प्रतिक्रिया ऑनलाईन व्हायरल झाली आहे.