नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशातील लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी आणि शाह तरूणांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहेत, असं ट्विट गांधी यांनी केलं आहे.
"भारताच्या प्रिय तरूणांनो, मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तुमच्या मनातल्या रागाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण केल्याबद्दलच्या तुमच्या संतापालाही ते सामोरे जाऊ शकत नाहीत म्हणून ते आपल्या देशात दुही माजवत आहेत, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. प्रियंका गांधी यांनी रविवारी (22 डिसेंबर) उत्तर प्रदेशमधील बिजनोरमध्ये जाऊन सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्धच्या आंदोलनात जीव गमावलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला, अशी बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने दिली आहे.