Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदींचं 'ते' वक्तव्य खूपच आक्रमक होतं - डोनाल्ड ट्रंप

Narendra Modi's 'That' statement was very aggressive - Donald Trump
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (10:54 IST)
हाऊडी मोदी कार्यक्रमातलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काश्मीरसंदर्भातील वक्तव्य खूपच आक्रमक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ट्रंप यांची सोमवारी भेट झाली. भेटीपूर्वी इम्रान आणि ट्रंप यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रंप म्हणाले, "ह्यूस्टनमध्ये आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 59 हजार माणसांसमोर मोदी आक्रमक भाषेत वक्तव्य केलं. मी तेव्हा तिथे उपस्थित होते. ते असं बोलतील याची मला कल्पना नव्हती. तिथे उपस्थित लोकांना मोदींचं बोलणं आवडलं. परंतु ते बोलणं आक्रमक होतं."
 
रविवारी हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले,"भारताने घेतलेल्या निर्णयांना (काश्मीरप्रश्नी) ज्यांना आक्षेप आहे, त्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाहीये. ते कट्टरतावादाला खतपाणी घालतात."
 
दरम्यान भारत आणि पाकिस्तान एकत्र येतील आणि दोन्ही देशांसाठी चांगलं असेल असं काहीतरी घडेल असा आशावाद ट्रंप यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रश्नावर काही ना काही उत्तर असतं, यावरही उत्तर असेल, असं ट्रंप यांनी सांगितलं.
 
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी तयार-ट्रंप यांचा पुनरुच्चार
भारत आणि पाकिस्तान यांना वाटत असेल तर काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायला तयार आहे याचा पुनरुच्चार ट्रंप यांनी केला.
 
'मध्यस्थी करण्यासाठी सांगितलं तर मी तयार आहे. मध्यस्थी करण्यासाठी मी सक्षम आहे. काश्मीर प्रश्न क्लिष्ट आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. मी मध्यस्थी करावी यासाठी भारताची तयारी असायला हवी', असं ट्रंप म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "कट्टरतावादाचं निर्मूलन करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. इम्रान खान याप्रश्नी आगेकूच करू इच्छित आहेत. याप्रश्नी दुसरा कोणताही उतारा नाही. कर्ज आणि गरिबी अन्य दोन समस्या आहेत."
 
ट्रंपकडून इम्रान यांच्या अपेक्षा
"डोनाल्ड ट्रंप जगातल्या सगळ्यांत शक्तिशाली देशाचं नेतृत्व करतात. जगातल्या सगळ्यांत ताकदवान देशाचं उत्तरदायित्व असतं. आम्ही मध्यस्थीसाठी विचारणा केली. त्यावर दोन्ही देशांची तयारी आवश्यक आहे असं अमेरिकेने स्पष्ट केलं. दुर्देवाने भारत काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यास तयार नाही. एका मोठ्या संकटाची ही सुरुवात आहे," असं इम्रान खान म्हणाले.
 
"मला मनापासून वाटतं की काश्मीर प्रश्न आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. अमेरिका शक्तिशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेने हा मुद्दा उचलून धरावा अशी आमची अपेक्षा आहे," असं ते पुढे बोलत होते.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सहभाही होण्यासाठी अमेरिकेत आहेत.
 
संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांसमोर काश्मीरचा प्रश्न मांडणार असल्याचं इम्रान यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
 
ट्रंप-इम्रान भेटीनंतर महमूद कुरेशी काय म्हणाले?
ट्रंप-इम्रान यांची भेट झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
 
ते म्हणाले, ही भेट पूर्वनियोजित होती, इम्रान यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले.
 
"काश्मीर, अफगाणिस्तान आणि इराणप्रश्नी चर्चा झाली. काश्मीरप्रश्नी इम्रान यांनी मनमोकळेपणाने ट्रंप यांच्याशी चर्चा केली. काश्मीरच्या निमित्ताने मानवाधिकारांचं संकट उभं राहिलं आहे. 80 लाख नागरिक तुरुंगात आहेत. त्यांना मूलभूत हक्क नाकारले गेले आहेत. परिस्थिती बिघडली आहे," असं कुरेशी म्हणाले.
 
कुरेशींनी पुढे सांगितल,"भारत फक्त अमेरिकेचं ऐकू शकतो. अमेरिकेला भारताला हे सांगायला हवं. दोन्ही देशांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला हवा यावर त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. प्रकरणाला हिंसक वळण लागू नये यासाठी अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यायला हवा. असं इम्रान यांनी स्पष्टपणे ट्रंप यांना हे सांगितलं."
 
दोन्ही नेत्यांमध्ये इराणच्या मुद्यावरही चर्चा झाली. पुरेशा विचाराअंती इराणवर कारवाई झाली तर त्याचे परिणाम भयंकर असतील असं इम्रान यांनी ट्रंप यांना सांगिल्याचं कुरेशी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा 2019 : शिवसेना-भाजप महायुतीच्या घोषणेला खरंच उशीर की हा 'सायकॉलॉजिकल गेम'?