अमरावतीचे रवी राणा आणि नवनीत राणा हे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि पुन्हा एकदा मुंबईत 'मातोश्री'वर येऊन शिवसेनेला आव्हान देण्याच्या तयारी आहेत.
शनिवारी (23 एप्रिल) ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या वांद्र्यातल्या 'मातोश्री'वर हनुमानचालिसा वाचणार असल्याचं राणांनी जाहीर केलं आहे. तसंही 'मातोश्री'वर येऊन आंदोलन करण्याची राणा यांची ही पहिलीच वेळ नाही.
2020 च्या ऐन दिवाळीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत 'मातोश्री' वर धडक देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पण, पोलिसांनी त्यांना अमरावतीतच ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे यावेळेस राणा 'मातोश्री'पर्यंत पोहोचणार का हा प्रश्न आहेच.
राज्यात राज ठाकरे यांच्या सभेनंतर भोंगा आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन वातावरण तापल्यावर त्यात राणा दाम्पत्यानं उडी घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांच्या टीकेचा रोख आहे.
"जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली. म्हणून आम्ही म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी हनुमानजयंतीला 'मातोश्री'वर हनुमान चालिसाचं वाचन करावं. पण मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही. म्हणून 22 तारखेला आम्ही अमरावतीवरुन निघू आणि तिथे येऊन शांततेच्या मार्गानं हनुमान चालिसा पठण करु," असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना जाहीर केलं. शिवसेनेनं त्यांना 'मातोश्री'बाहेर येऊन दाखवाच असं आव्हान दिलं आहे.
पण गेल्या काही काळात राणा दाम्पत्य हे महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत राहिलं आहे. सध्या त्यांनी भाजपाच्या जवळ जाणारी आणि हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली पहायला मिळते आहे. आमदार असलेले रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. पण 2019 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अमरावतीच्या खासदार झालेल्या नवनीत राणा यांनी निवडून आल्यावर मात्र भाजपाला पाठिंबा दिला.
विविध मुद्द्यांवरुन गेल्या काही काळात अमरावतीमध्ये तणावाचं वातावरणही पहायला मिळालं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्रिपुरा इथल्या धार्मिक घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यावेळेस अमरावतीमध्ये दंगलपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांनी लावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं परवानगीच्या मुद्द्यावरुन हलवल्यानंतर मोठा वाद झाला.
सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या वाद राणांनी लोकसभेपर्यंत नेला, पण रोख महाविकास आघाडीवर राहिला. सध्या अमरावती जिल्ह्यात झेंड्यांच्या मुद्द्यावर अचलपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे. त्यात आता राणांनी हनुमान चालिसा थेट 'मातोश्री'वरच येऊन वाचतो असं म्हणून उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे.
'राजकीय पटलावर कसं चमकत रहायचं याचं पूर्ण ज्ञान'
जर राणा हे 'मातोश्री'पर्यंत आले तर त्यांच्या आणि शिवसेनेतला 'सामना' कसा रंगतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण गेली काही वर्षं सातत्यानं चर्चेत असणा-या राणा दाम्पत्याच्या राजकारणाशी ते सुसंगत आहे. त्यांनी यापूर्वीही लोकांचं लक्ष असं वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता 'मातोश्री'वर येऊन आंदोलन करण्याच्या या त्यांच्या पवित्र्याला गेली अनेक वर्षं राणांचं अमरावतीतलं राजकारण जवळून पाहणारे पत्रकार याच मालिकेतला एक भाग म्हणून पाहतात.
"रवी राणा यांना आपण राजकीय पटलावर कसं चमकत रहायचं याचं पूर्ण ज्ञान आहे. एकीकडे त्यांच्या पत्नीच्या जात प्रमाणपत्राबद्दल बोललं जात असतांनाच दुसरीकडे आपली लोकप्रियता लोकांमध्ये कशी रुजवली जाऊ शकते हे परिश्रम घेत हे दाम्पत्य दाखवून देत आहे. त्यांच्या अगोदर बच्चू कडू होते विदर्भातले, ज्यांनी अशी लोकांच्या पसंतीस उतरतील अशा अंदोलनांची सुरुवात केली होती.
"कधी ते कार्यालयात साप सोडायचे, कधी जमिनीत अर्ध्यापर्यंत स्वत:ला गाडून घ्यायचे, असे त्यांचे स्टंट्स असायचे. पण बच्चू कडू हे जरी लोकप्रिय आंदोलनांचे जनक असले तरीही सध्याच्या काळाबरहुकूम एखाद्या मतदारसंघाची मशागत तुलनेनं जातीय किंवा धार्मिक समीकरणं आपल्या बाजूला नसतांना कशा पद्धतीनं वळवायला हवी याचं ज्ञान पूर्णपणे राणा दाम्पत्याला आहे," असं 'महाराष्ट्र टाईम्स'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित म्हणतात.
"एखादा इश्यू तयार करणे आणि त्याच्या आधारावर आपल्याकडे मतं वळवून घेणं ही कला या दोघांनी साधली आहे. पण यांना दोन गुण मी अधिकचे देईन कारण आपल्या मतदारसंघाच्या शेतीची मशागत करण्याच्या पर्याय सगळ्यांसाठी खुला असतांनाही परिश्रमात कुठलीही काटकसर हे दाम्पत्य करत नाही. त्यासाठी मागेपुढे ते पाहात नाहीत.
"मग अलिकडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा यांचा इव्हेंट असेल, महापालिका अधिका-यांना काळं फासण्याचे डावपेच असतील जरी त्यांनीच केलं असं अजून सिद्ध झालं नसलं तरीही, असं काही वेळेला धूर्त बनून आणि काही वेळेला लोकानुनय करुन हे दोघं आपल्या बाजूनं परिस्थिती कशी राहिल याची तजवीज करत असतात,"असं अपराजित पुढे म्हणतात.
अमरावतीत सध्या असलेली परिस्थिती आणि चालू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हनुमान चालिसा 'मातोश्री'वर येऊन म्हणण्याची भूमिका राणा यांच्या राजकारणाचं वरील विश्लेषणातून पाहता येईल. राणा दाम्पत्याच्या आजवरच्या राजकीय वाटचालीतूनही ते दिसतं.
जेव्हा आमदारांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं...
रवी राणा यांना राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी नाही. पण अमरावती आणि त्यांच्या बडनेरा मतदारसंघात त्यांनी मोठा जनसंपर्क केला. 'युवा स्वाभिमान संघटना' ही त्यांची संघटना जिच्या माध्यमातून त्यांनी राजकारण सुरू केलं. ते तसे इतर प्रस्थापित पक्षांमध्ये सहभागी झाले नाहीत, पण सगळ्याच पक्षांशी गरजेप्रमाणं जवळीक हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ते प्रत्येक टप्प्यावर दिसतं.
2009 मध्ये ते बडनेरामधून पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सातत्यानं निवडून येत राहिले. कधी कॉंग्रेस राष्ट्रवादीचं समर्थन मिळवणारे राणा आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या जवळचे मानले जातात.
आमदार झाल्यावर रवी राणांना त्यांच्या आयुष्याचा साथीदार मिळाला. राणा हे योगगुरु बाबा रामदेव यांच्यासोबतही होते. रामदेव यांच्या अशाच मुंबईतल्या एका योगशिबिरामध्ये त्यांची नवनीत कौर यांच्याशी ओळख झाली. नवनीत कौर या पंजाबी कुटुंबातल्या पण मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या. अभिनेत्री म्हणून दक्षिणेच्या चित्रपटांमध्ये त्यांचं काम वाढलं होतं. राणा स्वत:च 'झी 24तास'च्या एकदा मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाची हकीकत सांगितली होती.
"आमचं एकमत झाल्यावरच आम्ही लग्न केलं. रामदेव बाबांच्या योगशिबिरामध्ये आम्ही भेटलो. जी त्यांची आवड होती योगाची, तीच माझी पण होती. आमची भेट झाली, आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. मात्र त्यानंतर दोन्ही परिवारांचा एकत्र निर्णय झाल्यावर पुढे गेलो," असं त्या सांगतात.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एका आमदाराचं लग्न हा प्रसिद्धीचा विषय होताच, पण त्यांचं लग्न ज्याप्रकारे झालं त्याचीही राज्यभर चर्चा झाली.
2011 मध्ये रवी राणा आणि नवनीत कौर यांनी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतर साडेतीन हजार जोडप्यांसोबत लग्न केलं.
अमरावतीचा हा सामुदायिक विवाह सोहळा बाबा रामदेवांच्या संस्थेनंच आयोजित केला होता. या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नारायण राणे, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि 'सहारा'चे प्रमुख सुब्रतो रॉय हेही उपस्थित होते. राणा दाम्पत्याला तेव्हापासूनच प्रसिद्धी मि.ळू लागली आणि ते चर्चेत राहिले.
नवनीत राणांचा राजकारण प्रवेश आणि शिवसेनेबरोबर संघर्ष सुरू
2011 मध्ये लग्न झाल्यानंतर अमरावतीला आलेल्या नवनीत राणा 2014 मध्ये त्यांनी अमरावतीतून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली.
अमरावती हा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा गड. पहिल्या प्रयत्नात राणा यांना अडसुळांकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्या थांबल्या नाहीत.
"त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यासाठी नवनीत राणा एखाद्या गरीबाच्या झोपडीत जाऊन जेवतील, कधी त्यांच्या घरात जाऊन भाकरी थापतील. अनेकांना मातीशी मिसळून घेणं जमत नाही. अनेक व्हाईट कॉलर नेत्यांसाठी मतदारांची मशागत ही दुरापास्त झाली आहे. राणा मात्र अशा इव्हेंटमध्ये आघाडीवर राहिल्या. नवनीत राणांची मातृभाषा ही काही मराठी नाही.
"विदर्भातले अनेक लोकप्रतिनिधी मराठीतून बोलतांना दिसत नाही. मात्र थोडी मोडकीतोडकी का होईना पर मराठी बोलून मी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करते त्यांचीच भाषा बोलणार हा आग्रह नवनीत यांचा राहिला. लोकांसोबत मिसळून ते जे खातात ते खाणे, अभिनेत्री असूनही आपण लोकांसारखा पेहराव करणे आणि लोकांच्याच भाषेत बोलणे हे त्यांनी केलं. म्हणून त्यांन लोकांचा पाठिंबा मिळाला," श्रीपाद अपराजित सांगतात.
2019 मध्ये लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला आणि मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडूनही आल्या. अमरावतीतून खासदार होणा-या त्या पहिल्या महिला होत्या.
खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र 2014 मध्येच सुरु झाला होता. 2014 मध्ये राणा यांनी अडसूळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता ज्याचा अडसूळांनी इन्कार केला. हे आरोप प्रत्यारोप चालू राहिले.
2019 मध्ये पराभवानंतर अडसूळ यांनी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोप केला आणि ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानंही राणा यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि त्यांना दंडही ठोठावला. राणा यांची खासदारकी धोक्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयात त्या गेल्या आणि तूर्तास दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण अंतिम निकाल येईपर्यंत राणांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे.
खासदार होण्याअगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादी, झाल्यानंतर मात्र भाजपा
नवनीत राणा खासदार कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष अशा झाल्या, पण त्यानंतर लोकसभेत मात्र त्यांनी भाजपालाच पाठिंबा दिला आहे. रवी राणा यांचीही भूमिका तीच आहे. पण अमरावतीच्या आपल्या मतदारांचा अंदाज घेऊन कायम राजकीय भूमिका घेणा-या राणा यांची कायम भूमिका कोणती असेल हे मात्र कोणालाही सांगता येत नाही.
"हे निवडून आले तेव्हा यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजपधार्जिणं राहिलेलं आहे. पुतळाप्रकरणात त्यांना स्थानिक भाजपाकडून जो पाठिंबा मिळाला तो वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानं मिळाला. पण निवडणुकांना जर अजून दोन अडीच वर्षं वेळ असेल, तर तोपर्यंत राणांची भूमिका हीच राहिल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही," असं श्रीपाद अपराजित म्हणतात.
रवी राणांना कायम सत्तेसोबत रहाण्याची सवय आहे. मात्र, 2019 साली भाजपला समर्थन देऊन त्यांचा अंदाज चुकला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राणा सत्तेजवळ रहाण्यात अपयशी ठरलेल्याचं राजकीय जाणकारांच मत आहे.
राणा यांचं राजकारण जवळून पहिलेले मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांनी काही दिवसांपूर्वी आमच्याशी बोलतांना सांगितलं होतं की, "राणांना कोणतीही राजकीय भूमिका नाही. ते कायम सत्तेजवळ रहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांमुळे त्यांना संधीसाधू राजकारणी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही."
भाजपाच्या जवळ गेल्यावर शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेही राणांच्या टीकेचे लक्ष्य सातत्यानं राहिलेले आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत म्हणूनही त्यांनी टीका केली होती. शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलनही 'मातोश्री'पर्यंत नेण्याची घोषणा त्यांनी केली होती. आता राणा बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन देत उद्धव यांच्यावर टीका केली आहे. 'मातोश्री'वरच्या आंदोलनाचा त्यांचा इशारा म्हणूनच यंदाही राज्यभर चर्चेत आहे.