कॉल टॅपिंगसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी गौप्यस्फोट केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.
रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फोन टॅपिंगची कार्यवाही ही पोलीस महासंचालक आणि मुख्य अतिरिक्त सचिवांच्या परवानगीनंतर झाली आहे असा दावा फडणवीस यांनी केला आहे. तसंच आपल्याकडे फोन टॅपिंगचा 6.3 जीबीचा डेटा असल्याचंही ते म्हणाले आहेत.
यात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केला आहे की नाही याचा उल्लेख मात्र देवेंद्र फडणवीसांनी टाळला.
याप्रकरणी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी आपण दिल्लीला रवाना होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"फोन टॅपिंगचा डेटा मी सार्वजनिक करणार नाही कारण तो अत्यतं संवेदनशील आहे. यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आहे. ही सर्व माहिती केंद्रीय गृह विभागाला देणार आहे. यासाठी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फोन टॅपिंगचे सर्व पुरावे दिले गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
फोन टॅपिंग बेकायदेशीर - मलिक
"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसंच रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे.
"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. केंद्रीय समितीच्या मान्यतेनंतरच बदल्या होतात. सरकार यात हस्तक्षेप करत नाही. खोट्या रिपोर्टच्या आधारे फडणवीस कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सत्यपरिस्थिती बाहेर आल्यानंतर सरकारने त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.
बहुमत असेपर्यंत आम्हाला कोणीही सत्तेपासून दूर करू शकत नाही, फडणवीस दिल्लीत जाऊन कट-कारस्थान करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही मलिक म्हणालेत.
शरद पवारांना चुकीची माहिती दिली - फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे ,असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये किंवा विलगीकरणात नव्हते. तर ते खासगी विमानाने मुंबईला आले होते असा दावाही फडणवीस यांनी केला. एवढेच नव्हे तर या दरम्यान त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या असून आपल्याकडे त्याचे कागदपत्र आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली.
पोलिसांच्या रेकॉर्ड्सचा हवाला देऊन अनिल देशमुख यांनी 17 फ्रेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 3 वाजता काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
ते म्हणाले, "या प्रकरणी शरद पवारांना चुकीची माहिती मिळाली आहे. देशमुखांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पवारांचा हा प्रयत्न फसला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनिल देशमुख 17 फेब्रुवारीला सह्याद्री अतिथिगृह येथे येणार अशी नोंद आहे. ते त्याठिकाणी गेले नाही याची मला कल्पना नाही. अनिल देशमुख यांना त्या काळात कोण कोण भेटलं याची माहिती काढता येणं सहज शक्य आहे."
"फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली आहे. अनिल देशमुख नागपुरात होते असं आम्ही कधीही म्हटलं नव्हतं. विलगीकरणात असताना अनिल देशमुख कुठेही गेलेले नाहीत. ते काही काळ व्यायाम करण्यासाठी बाहेर पडत. पण हे वगळता कोणतीही मुव्हमेंट नव्हती," असा दावा मलिक यांनी केला आहे.