Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नीरज चोप्रा: भालाफेकीसाठी लांब केसांना तिलांजली देणारा 'मोगली'

नीरज चोप्रा: भालाफेकीसाठी लांब केसांना तिलांजली देणारा 'मोगली'
, शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (18:14 IST)
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरत इतिहास घडवला.
 
2008 मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशाला पहिलंवहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नीरज आता या मांदियाळीत दाखल झाला आहे.
 
अॅथलेटिक्स प्रकारातलं हे भारताचं पहिलंवहिलं पदक आहे.
 
पहिल्या प्रयत्नात नीरजने 87.03 अंतरावर भाला फेकत आघाडी मिळवली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 87.58 अंतरावर भाला फेकत पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत सुधारणा केली.
 
तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला 76.79 अंतरावर गेला.
 
नीरजचा चौथा प्रयत्न अवैध ठरला. मात्र नीरजने आघाडी कायम राखली. नीरजचा पाचवा प्रयत्नही अवैध ठरला. मात्र बाकी स्पर्धकांची कामगिरी सर्वसाधारण राहिली. त्यामुळे नीरजची आघाडी कायम राहिली.
 
सहाव्या प्रयत्नात नीरजने 84.24 अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या मोजक्या भारतीय अॅथलिट्सकडून पदकाच्या अपेक्षा आहेत त्यात नीरज चोप्राचाही समावेश होता. सातत्यपूर्ण प्रदर्शनासह नीरजने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
 
याच वर्षी मार्चमध्ये झालेल्या इंडियन ग्रां प्री-3 स्पर्धेत नीरजने 88.07 मीटर भालाफेक करत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
 
अंजू बॉबी जॉर्जनंतर कुठल्याही मोठ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू आहे.
 
नीरजची कहाणी सुरू होते पानीपतच्या एका छोट्याशा खेड्यातून. लहानपणी नीरजचं वजन खूप जास्त होतं. जवळपास 80 किलो. गावात सगळे त्याला सरपंच म्हणायचे.
 
शारीरिक तंदुरुस्तीसाठी नीरजने पानीपतच्या स्टेडियममध्ये जायला सुरुवात केली. तिथेच भालाफेक खेळाची ओळख झाली आणि इथूनच करिअरची सुरुवातही झाली.
 
खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नीरज पानीपतहून पंचकुलाला शिफ्ट झाला. पंचकुलामध्ये पहिल्यांदा त्याचा सामना राष्ट्रीय खेळाडूंशी झाला. तिथे खेळासाठीच्या अधिक चांगल्या सोयी-सुविधा होत्या. राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केल्यावर हातात उत्तम दर्जाचा भालाही आला. हळूहळू नीरजच्या खेळात सुधारणा होऊ लागली.
 
2016 साली एकीकडे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता त्याचवेळी अॅथलेटिक्स विश्वास भारतातच एका कोपऱ्यात नवीन ताऱ्याचा उदय होत होता.
 
याच वर्षी नीरजने पोलंडमध्ये अंडर-20 जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं.
 
बघता बघता या खेळाडूचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झळकू लागलं.
 
नीरजने गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86.47 मीटर भालाफेक करत गोल्ड मेडल पटकावलं. तर 2018 साली एशियन गेम्समध्ये 88.07 मीटर भालाफेक करत राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि गोल्ड मेडलही पटकावलं.
webdunia
मात्र, 2019 साली नीरज चोप्रासाठी आव्हानात्म ठरलं. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो खेळापासून दूर गेला आणि सर्जरीनंतर अनेक महिने सक्तीचा आराम करावा लागला. 2020 ची सुरुवातच कोरोनाच्या जागतिक संकटाने झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या.
 
मात्र, दुखापतीमुळे खेळापासून काही काळ दूर राहण्याची नीरजसाठी ही पहिलीच वेळ नव्हती.
 
2012 साली बास्केटबॉल खेळताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली होती. या मनगटाच्याच जोरावर नीरज भालाफेक करत. त्यामुळे मनगटाला दुखापत झाल्यावर यापुढे आपण कधीच भालाफेक करू शकणार नाही, अशी भीती वाटल्याचं नीरज सांगतो.
 
मात्र, नीरजने घेतलेले परिश्रम आणि त्याच्या टीमच्या प्रयत्नांमुळे नीरजने त्या संकटावरही मात केली.
 
आज त्याच्याकडे परदेशी प्रशिक्षक आहेत, बायोमेकॅनिकल एक्सपर्ट आहेत. मात्र, 2015 सालापर्यंत नीरजने एकप्रकारे स्वतःच स्वतःला ट्रेन केलं. अशावेळी दुखापतीची जोखीम जास्त असते. त्यानंतरच त्याला उत्तम प्रशिक्षक आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या.
 
रियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी जो थ्रो नीरजला करायचा होता तो करायला उशीर झाल्याने नीरजची ती संधी हुकली. नीरजसाठी हा अत्यंत दुःखद अनुभव होता. मात्र, टोकियो ऑलिम्पिकवेळी त्याने ही संधी गमावली नाही.
 
भालाफेकसोबतच नीरजला बाईक रायडिंगचा छंद आहे. तसंच हरियाणवी रागीनी या विशिष्ट संगीत प्रकाराचीही आवड आहे.
 
शाकाहारी असणारा नीरज खेळ सुधारण्यासाठी आता मांसाहारही करतो.
webdunia
खेळाडूंना आपल्या डाएटवर विशेष आणि कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं. पण, पानीपुरी आपलं आवडतं जंक फूड असल्याचं नीरज सांगतो.
 
लांब केसांमुळे नीरजला सोशल मीडियावर मोगली म्हणूनही संबोधलं जातं. लांब केसांसोबतच नीरज मोगलीसारखाच चपळही आहे.
 
याच चपळाईने नीरजला ऑलिम्पिकपर्यंत आणलं आहे. नीरज आज 23 वर्षांचा आहे आणि टोकियोनंतर त्याचं लक्ष 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकवरही आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिलं वहिल सुवर्ण पदक हे